स्पेशल बसने ३१ मजूर नागपूरसाठी रवाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2020 05:01 IST2020-05-05T05:00:00+5:302020-05-05T05:01:25+5:30
सिरोंचा तालुक्यात मेडीगड्डा सिंचन प्रकल्पाचे काम सुरू आहे. याशिवाय नदीनाल्यावरील छोटे-मोठे पूल व शासकीय इमारतीचे बांधकाम सुरू आहे. या कामांवर हे सर्व मजूर दैनिक मजुरीने कार्यरत होते. कोरोनाच्या संचारबंदीमुळे ही सर्व कामे बंद पडली. त्यामुळे रिकाम्या हाताने किती दिवस जगायचे, असा प्रश्न या मजुरांना सतावत होता.

स्पेशल बसने ३१ मजूर नागपूरसाठी रवाना
लोकमत न्यूज नेटवर्क
सिरोंचा : उत्तर प्रदेशातील लखनौ येथील ३१ कामगार व मजूर कोरोनाच्या संचारबंदीमुळे सिरोंचा शहरात अडकून पडले होते. महसूल व पोलीस प्रशासनाने लगबगीने कार्यवाही करून सदर ३१ मजुरांना स्व:गावी पोहोचण्यासाठी नागपूरपर्यंत स्पेशल बसची व्यवस्था करून दिली. रविवारी हे सर्व मजूर नागपूरकडे रवाना झाले.
सिरोंचा तालुक्यात मेडीगड्डा सिंचन प्रकल्पाचे काम सुरू आहे. याशिवाय नदीनाल्यावरील छोटे-मोठे पूल व शासकीय इमारतीचे बांधकाम सुरू आहे. या कामांवर हे सर्व मजूर दैनिक मजुरीने कार्यरत होते. कोरोनाच्या संचारबंदीमुळे ही सर्व कामे बंद पडली. त्यामुळे रिकाम्या हाताने किती दिवस जगायचे, असा प्रश्न या मजुरांना सतावत होता. दरम्यान परराज्यातील मजुरांना स्व:गावी परत पाठविण्याचा निर्णय शासनाने घेतला. त्यामुळे सिरोंचाचे तहसीलदार रमेश जसवंत, नायब तहसीलदार एच. एस. सय्यद, नगर पंचायतीचे मुख्याधिकारी विशाल पाटील यांनी निर्णय घेऊन सदर मजुरांसाठी खासगी बसची व्यवस्था करून दिली. सदर मजूर नागपूरकडे रवाना होताना नगर पंचायतीचे प्रशासकीय अधिकारी सचिन सनस, अव्वल कारकून प्रकाश पुप्पलवार आदी उपस्थित होते.
सिरोंचा तहसील कार्यालयाच्या वतीने बाहेर जिल्ह्यातून तसेच परराज्यातून शहरात येणाऱ्यांसाठी क्वॉरंटाईन कक्षाची व्यवस्था करण्यात आली आहे. नागपूरकडे रवाना होण्यापूर्वी यातील काही मजूर आसरअल्ली येथील विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. तसेच काही मजूर इतर ठिकाणी विलगीकरणात होते. सदर मजूरांची दोनवेळा आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यानंतर ३० मे ला प्रशासकीय अधिकाऱ्यांनी प्रक्रिया पार पाडत त्यांना नागपूरसाठी खासगी बसने रवाना केले. नागपूरवरून हे मजूर लखनौला जाणार आहेत.