३ हजार ५६४ हेक्टरचा विमा
By Admin | Updated: August 25, 2015 01:39 IST2015-08-25T01:39:33+5:302015-08-25T01:39:33+5:30
यावर्षी जिल्ह्यात पावसाअभावी कोरड्या दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे अधिकांश शेतकरी

३ हजार ५६४ हेक्टरचा विमा
गडचिरोली : यावर्षी जिल्ह्यात पावसाअभावी कोरड्या दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे अधिकांश शेतकरी पीक विमा काढतील, अशी अपेक्षा होती. मात्र जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे केवळ २ हजार १६५ शेतकऱ्यांनी ३ हजार ५६४ हेक्टरचा विमा काढला आहे. यावरून विम्याबाबत शेतकऱ्यांमध्ये अजूनही पाहिजे त्या प्रमाणात कृषी विभागाने जनजागृती केली नसल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.
पावसाअभावी किंवा अतिपावसामुळे दुष्काळग्रस्त परिस्थिती उद्भवल्यास शेतकरी अडचणीत येऊ नये, यासाठी शासनाकडून पीक विमा योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत शेतकरीवर्ग राष्ट्रीयकृत बँक किंवा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे स्वत: जाऊन विमा काढू शकतो. त्याचबरोबर कृषी सहाय्यकाकडे विम्याची रक्कम, त्यासाठी आवश्यक असलेल्या सातबारा दिला तरी विमा काढला जातो. यावर्षी शासनाने विम्याचा हप्ता एका एकरासाठी धानपिकासाठी १५४ रूपये, सोयाबीन २५६ व कापूस १ हजार ९१५ रूपये २० पैसे एवढा ठरविला होता.
गडचिरोली जिल्ह्यात सुमारे १ लाख ४९ हजार हेक्टरवर धानपिकाचे उत्पादन घेतले जाते. यावर्षी अगदी सुरुवातीपासून पाऊस झटके देत आहे. अजूनही बहुतांश शेतकऱ्यांची रोवणी पूर्ण झाली नाही. ज्या शेतकऱ्यांनी रोवणीची कामे आटोपली आहेत, त्यांचेही पीक धोक्यात आले आहे. जिल्हाभरात कोरड्या दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. दुष्काळाची राज्यभरातील परिस्थिती लक्षात घेऊन राज्य शासनाने दोनदा मुदत वाढविली होती. शेवटची मुदत ७ आॅगस्टपर्यंत दिली होती. जिल्ह्यातील दुष्काळाची परिस्थिती लक्षात घेऊन किमान ५० हजारांहून अधिक हेक्टरचा विमा शेतकरी काढतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र मुदत संपण्याच्या शेवटच्या दिनांकापर्यंत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे केवळ २ हजार १६५ शेतकऱ्यांनी ३ हजार ६६४ हेक्टरचा विमा काढला आहे. यावरून अपेक्षेपेक्षा कितीतरी कमी पटीने विमा काढण्यात आला असल्याचे दिसून येत आहे. (नगर प्रतिनिधी)
कर्जदारांना सक्तीचे धोरण
४जे कर्जदार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून पीक कर्ज घेतात, अशा शेतकऱ्यांना विमा काढणे राज्यभरातील काही मध्यवर्ती सहकारी बँकांनी सक्तीचे केले आहे. त्या जिल्ह्यात विमा काढणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या अधिक आहे. मात्र गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने विमा काढणे ऐच्छिक ठेवले आहे. त्यामुळे बहुतांश शेतकरी स्वत:हून विमा काढण्यास तयार नाही. बोटावर मोजण्याइतके जागरूक शेतकरी विमा काढत असल्याचे दिसून येते. गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने कर्जदारांना पीक विमा काढणे सक्तीचे केल्यास पीक विमा काढणाऱ्यांची संख्या वाढू शकते. मात्र यास शेतकऱ्यांचा विरोध होण्याची शक्यता बँकेच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. त्याचबरोबर बहुतांश शेतकरी सदर रक्कम पीक कर्जासोबत भरण्यास तयार होत नाही. त्यामुळे बँक अडचणीत येण्याची शक्यता सुद्धा बँकेच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
लाभ मिळत नसल्याचा परिणाम
४आजपर्यंत अनेक शेतकऱ्यांनी पीक विमा काढला आहे. मात्र विमा कंपनी दुष्काळाची परिस्थिती उद्भवूनही मदत देण्यास तयार होत नाही. त्यामुळे दरवर्षी भरल्या जाणाऱ्या विम्याच्या हप्त्याची रक्कम विमा कंपनीला दान होते. त्याचबरोबर विमा योजना शेतकऱ्यांच्या लाभाची विमा कंपनीचा फायदा करून देण्यासाठी शासनाने सदर योजना समोर आणली असल्याचे काही शेतकऱ्यांकडून टीका होत आहे. दरवर्षीच्या अनुभवावरून यावर्षीही दुष्काळ पडला तरी मदत मिळणार नाही, असा समज शेतकऱ्यांचा झाला असल्याने शेतकरीवर्ग विमा काढण्यास तयार होत नाही.
शेतकऱ्यांमध्ये जनजागृतीचा अभाव
४पीक विमा योजनेची जनजागृती करण्याची जबाबदारी कृषी विभागावर सोपविण्यात आली आहे. एका कृषी सहाय्यकाकडे १५ ते २० गावांचा प्रभार सोपविण्यात आला आहे. त्याचबरोबर इतर प्रशासकीय कामे असल्याने कृषी सहाय्यक किमान एक महिन्याशिवाय एका गावात पोहोचत नाही. तो ज्यावेळी गावात पोहोचतो त्यावेळी गावात शेतकरी राहत नाही. त्यामुळे पीक विमा योजना अत्यंत चांगली असली तरी या योजनेची माहिती शेतकऱ्यांना नाही. प्रत्यक्ष बँकेत जाऊन शेतकरी विमा काढू शकतो. त्याचबरोबर कृषी सहाय्यकाकडे विम्याची रक्कम देऊन विमा काढता येणे शक्य आहे. मात्र जनजागृतीअभावी विमा काढला जात नाही.