3 लाख 5 हजार नागरिकांचे करावे लागणार लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2021 05:00 IST2021-03-29T05:00:00+5:302021-03-29T05:00:27+5:30
एकाचवेळी सर्वच नागरिकांच्या लसीकरणाला सुरुवात करून लसीचा तुटवडा जाणवू नये यासाठी शासनाकडून टप्प्याटप्प्याने लसीकरण करण्याचा निर्णय घेत आहे. सुरुवातीला आराेग्य कर्मचारी, फ्रंटलाइन वर्कर यांना लस देण्यात आली. त्यानंतर ६० वर्ष वयावरील ज्येष्ठ नागरिक व ४५ वर्ष वयापेक्षा अधिक मात्र आजाराने ग्रस्त असलेल्या नागरिकांना लस देण्याचा निर्णय घेतला. आता १ एप्रिलपासून ४५ वर्ष वयापेक्षा अधिक वय असलेल्या सर्वच नागरिकांना लस देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

3 लाख 5 हजार नागरिकांचे करावे लागणार लसीकरण
लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिराेली : ४५ वर्ष वयावरील सर्वच नागरिकांचे काेराेना लसीकरण करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. आराेग्य विभागाने केलेल्या सर्वेक्षणात गडचिराेली जिल्ह्यात ४५ वर्ष वयापेक्षा तीन लाख पाच हजार नागरिक आहेत. या सर्वांचे लसीकरण आता करावे लागणार आहे.
एकाचवेळी सर्वच नागरिकांच्या लसीकरणाला सुरुवात करून लसीचा तुटवडा जाणवू नये यासाठी शासनाकडून टप्प्याटप्प्याने लसीकरण करण्याचा निर्णय घेत आहे. सुरुवातीला आराेग्य कर्मचारी, फ्रंटलाइन वर्कर यांना लस देण्यात आली. त्यानंतर ६० वर्ष वयावरील ज्येष्ठ नागरिक व ४५ वर्ष वयापेक्षा अधिक मात्र आजाराने ग्रस्त असलेल्या नागरिकांना लस देण्याचा निर्णय घेतला. आता १ एप्रिलपासून ४५ वर्ष वयापेक्षा अधिक वय असलेल्या सर्वच नागरिकांना लस देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या वयाेगटातील गडचिराेली जिल्ह्यात तीन लाख पाच हजार नागरिक आहेत. लसीकरणाचे उद्दिष्ट वाढल्याने लसीकरणाची गती वाढविण्याचेही आव्हान आराेग्य विभागासमाेर आहे. त्यादृष्टीने आराेग्य विभाग नियाेजन करीत आहे. लसचीही मागणी केंद्र शासनाकडून करावी लागणार आहे.
मागणी एवढा पुरवठा न झाल्यास लसीकरणात खाेडा
सध्या गडचिराेली आराेग्य विभागाकडे २३ हजार काेराेना प्रतिबंधात्मक लसचा साठा उपलब्ध आहे. दर दिवशी सरासरी एक हजार लस दिल्या जातात. म्हणजेच उपलब्ध लस २३ दिवस पुरणार आहेत. १ एप्रिलपासून लस घेणाऱ्यांची संख्या वाढणार आहे. त्यामुळे लसचा अतिरिक्त साठा ठेवावा लागणार आहे.
५० केंद्रांवर तीनच दिवस लसीकरण
सध्या ६४ केंद्रांवर लसीकरण सुरू आहे. जिल्हा रुग्णालय, महिला व बालरुग्णालय, उपजिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये व प्राथमिक आराेग्य केंद्र स्तरावर लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. मात्र प्राथमिक आराेग्य केंद्र स्तरावर असलेल्या ५० केंद्रांवर साेमवार, बुधवार व गुरुवार या तीनच दिवशी लसीकरण केले जाते. १ एप्रिलपासून ४५ वर्षांवरील सर्वच नागरिकांचे लसीकरण हाेणार आहे. त्यामुळे लाभार्थींची संख्या वाढणार आहे. ही बाब लक्षात घेऊन पीएचसी केंद्रावर आठवड्याचे सहा दिवस लसीकरण करावे, अशी मागणी आहे. उर्वरित १४ केंद्रांवर शासकीय सुटीवगळता लसीकरण केले जाते.