290 ग्रामपंचायतींचे दस्तावेज ऑनलाईन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2021 05:00 IST2021-12-13T05:00:00+5:302021-12-13T05:00:29+5:30
नागरिकाचा सर्वांत पहिला संबंध आपल्या ग्रामपंचायतीशी येतो. अनेक याेजनांचा लाभ घेण्यासाठी तसेच महत्त्वाचे दाखले काढण्यासाठी ग्रामपंचायतींच्या दाखल्यांची गरज पडते. त्यामुळे ग्रामपंचायतींकडून वेळाेवेळी दाखले मागितले जातात. मागणी केल्याबराेबर दाखले मिळावे, यासाठी दाखल्यांचे संगणकीकरण करण्याबराेबरच सदर दाखले ऑनलाईन करण्याचा उपक्रम राज्य शासनाने सुरू केला आहे. नागरिकांसाठी महत्त्वाचे असलेले सुमारे ३३ नमुने ऑनलाईन केले जात आहेत.

290 ग्रामपंचायतींचे दस्तावेज ऑनलाईन
लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिराेली : ग्रामपंचायतींचा कारभार हायटेक करताना शासनाने ग्रामपंचायतीचे १ ते ३३ नमुने ऑनलाईन करण्याचा निर्णय घेतला आहे. याअंतर्गत आतापर्यंत जिल्ह्यातील २९० ग्रामपंचायतींचे दस्तावेज ऑनलाईन करण्यात आले आहेत. इतर ग्रामपंचायतीमध्ये काही तांत्रिक अडचणींमुळे काम पूर्ण झाले नाही.
भारत हा खेड्यांचा देश आहे. त्यामुळे जाेपर्यंत ग्रामीण भागाचा विकास हाेणार नाही, ताेपर्यंत देशाचा विकास हाेणे शक्य नाही. ही बाब लक्षात घेऊन गावांचा विकास करण्याकडे केंद्र व राज्य शासन विशेष लक्ष देत आहे. काही निधी थेट ग्रामपंचायतींना पाठविला जात आहे. नागरिकाचा सर्वांत पहिला संबंध आपल्या ग्रामपंचायतीशी येतो. अनेक याेजनांचा लाभ घेण्यासाठी तसेच महत्त्वाचे दाखले काढण्यासाठी ग्रामपंचायतींच्या दाखल्यांची गरज पडते. त्यामुळे ग्रामपंचायतींकडून वेळाेवेळी दाखले मागितले जातात. मागणी केल्याबराेबर दाखले मिळावे, यासाठी दाखल्यांचे संगणकीकरण करण्याबराेबरच सदर दाखले ऑनलाईन करण्याचा उपक्रम राज्य शासनाने सुरू केला आहे. नागरिकांसाठी महत्त्वाचे असलेले सुमारे ३३ नमुने ऑनलाईन केले जात आहेत.
गडचिराेली जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींमध्ये इंटरनेट सेवा पाेहाेचली नाही. अशाही परिस्थितीत स्थानिक पातळीवरील केंद्र संचालकांनी दाखले ऑनलाईन केले आहेत.
तत्काळ मिळतो दाखला
दाखले ऑनलाईन करण्याचे महत्त्वपूर्ण काम ग्रामपंचायतींमधील संगणक ऑपरेटरने केले आहे. स्थानिक स्तरावरीलच संगणक ऑपरेटरची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना वेळेवर दाखले उपलब्ध हाेत आहेत. तसेच दाखला ऑनलाईन असल्याने शाेधाशाेध करण्याची गरज नाही किंवा त्यात बदल करणेही शक्य नाही.
भामरागड व धानाेरा तालुका सर्वांत मागे
- जिल्ह्यातील ४५८ ग्रामपंचायतींपैकी २९० ग्रामपंचायतींचे सर्व दाखले ऑनलाईन झाले आहेत. भामरागड व धानाेरा तालुका या कामात सर्वांत मागे आहे. भामरागड तालुक्यातील तीन, तर धानाेरा तालुक्यातील केवळ सात ग्रामपंचायतींचे काम पूर्ण झाले आहे. इतर तालुक्यांच्या तुलनेत हे प्रमाण अतिशय कमी आहे.
- धानाेरा तालुक्याचा काही भागात इंटरनेट सेवा उपलब्ध आहे, तरीही काम अतिशय मंदगतीने सुरू असल्याचे दिसून येते.
हे आहेत ग्रामपंचायतीमधील १ ते ३३ नमुने
ग्रामपंचायत नमुना १ म्हणजेच अंदाजपत्रक, नमुना २ म्हणजेच पुनर्नियाेजित नियत वाटप, नमुना ३ ग्रामपंचायत जमा-खर्चाचे विवरण, नमुना ४ ग्रामपंचायत मत्ता व दायित्व, नमुना ५ दैनिक राेकडवही, नमुना ६ मासिक जमा खर्चाची नाेंदवही, नमुना ७ सामान्य पावती, नमुना ८ कर आकारणी नाेंदवही, नमुना ९ कर मागणी नाेंदवही, नमुना १० कर व फी वसुलीबाबत पावती, नमुना ११ किरकाेळ मागणी नाेंदवही आदींचा समावेश आहे.