२९ मंडळांनी घेतले वीज कनेक्शन

By Admin | Updated: September 2, 2014 23:44 IST2014-09-02T23:44:27+5:302014-09-02T23:44:27+5:30

संपूर्ण जिल्हाभरात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्यावतीने मोठ्या उत्साहाने गणेशोत्सव साजरा केला जात आहे. जिल्ह्यात एकूण ४४१ सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाने गणेश मूर्तीची प्रतिष्ठापणा केली आहे.

29 Electricity connections by the Mandal | २९ मंडळांनी घेतले वीज कनेक्शन

२९ मंडळांनी घेतले वीज कनेक्शन

वीज चोरीवर उत्सव : ४११ गणेश मंडळांची जोडणीकडे पाठ
गडचिरोली : संपूर्ण जिल्हाभरात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्यावतीने मोठ्या उत्साहाने गणेशोत्सव साजरा केला जात आहे. जिल्ह्यात एकूण ४४१ सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाने गणेश मूर्तीची प्रतिष्ठापणा केली आहे. मात्र ४४१ सार्वजनिक गणेश मंडळांपैकी २९ गणेश मंडळांनी अधिकृतरित्या वीज कनेक्शन घेतल्याची माहिती महावितरण विभागाकडून मिळाली आहे. जिल्ह्यातील तब्बल ४११ गणेश मंडळांनी महावितणच्या आवाहनाकडे पाठ दाखविली असल्याचे दिसून येते.
गणेशोत्सवादरम्यान अनेक सार्वजनिक गणेश मंडळातर्फे मोठ्या प्रमाणात विद्युत रोषणाई केली जाते. मात्र अनेक ठिकाणी जवळील वीज खांब तसेच वीज तारांवर अथवा लगतच्या घरून मीटर बायपास करून वीज जोडणी घेण्यात येते. या प्रकारामुळे जीवित व आर्थिक हानी होण्याचा धोका असतो. कायदेशिर वीज जोडणी घेतल्या गेल्यामुळे अपघात तसेच आर्थिक नुकसान टाळता याकरिता महावितरणच्यावतीने कायदेशिर वीज जोडणी घेण्याचे आवाहन सर्व गणेश मंडळांना करण्यात आले आहे. मात्र जिल्ह्यातील तब्बल ४११ गणेश मंडळांनी वीज कनेक्शन न घेता, महावितरणाचा आवाहनाला ठेंगा दाखविला आहे. अधिकृतरित्या वीज कनेक्शन घेतलेल्या सार्वजनिक गणेश मंडळाला ३ रूपये २७ पैसे प्रति युनिट दराने वीज उपलब्ध करून देण्यात येत आहे. प्रतिकिलो व्हॅट १ हजार रूपये वापराच्या प्रमाणात तसेच २५० रूपये स्थिर आकार वीज कनेक्शन घेतलेल्या सार्वजनिक गणेश मंडळांना अदा करावा लागणार आहे. गणेश मंडळांनी नजीकच्या महावितरणच्या कार्यालयात संपर्क साधून वीज जोडणी घ्यावी, असे आवाहन महावितरणच्यावतीने करण्यात आले आहे. असे असतांनाही केवळ शहरी भागातील २९ सार्वजनिक गणेश मंडळाने अधिकृतरित्या वीज कनेक्शन घेतले आहे. यामध्ये देसाईगंज शहरातील ५ व गडचिरोली शहर व कॉम्प्लेक्स परिसरातील मिळून ९ असे एकूण १३ गणेश मंडळांनी गडचिरोली विभागात वीज कनेक्शन घेतले आहे. यात अहेरी शहरात ६, आलापल्ली ५, घोट १ व तळोधी येथील ४ गणेश मंडळांनी अधिकृतरित्या वीज कनेक्शन घेतले आहेत.
महावितरणच्यावतीने अत्यंत कमी दरामध्ये सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांना उत्सवासाठी वीज पुरवठा केला जात आहे. महावितरणने आवाहन केल्यानंतरही जिल्ह्यातील अनेक सार्वजनिक गणेश मंडळाने अधिकृतरित्या वीज कनेक्शन घेण्यासाठी महावितरणच्या कार्यालयात रितसर अर्ज केला नसल्याची माहिती पुढे आली आहे.
ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरी भागात सार्वजनिक गणेशोत्सवात मोठ्याप्रमाणात विद्युत रोषणाई, लाऊडस्पीकर, हॅलोजन लाईट तसेच प्रवेशद्वारावरही प्रचंड रोषणाई केली जाते. या सर्व बाबीसाठी मोठ्या प्रमाणात वीज वापरली जाते. सदर वीज चोरीच्या मार्गातून पुरविली जात असल्याचे महावितरण विभागाच्या निदर्शनास आले. त्यामुळे यंदा महावितरणने सर्व सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांना वीज कनेक्शन घेण्याचे आवाहन केले होते. ग्रामीण भागात गणेश उत्सवासाठी फारच कमी वीज वापरली जाते. त्यामुळे ग्रामीण व दुर्गम भागातील सार्वजनिक गणेश मंडळाने महावितरणकडून अधिकृतरित्या वीज कनेक्शन घेण्यासाठी पुढाकार घेतला नाही. ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरी भागात गणेशोत्सवादरम्यान रात्रीच्या सुमारास विविध मनोरंजनात्मक, प्रबोधनात्मक व धार्मिक कार्यक्रम घेतले जातात. यासाठी मोठ्या प्रमाणात वीज वापरली जाते. त्यामुळे शहरातील गणेश मंडळांनी वीज कनेक्शन घेणे गरजेचे आहे. (स्थानिक प्रतिनिधी)

Web Title: 29 Electricity connections by the Mandal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.