गडचिरोलीत २६.६२ टक्के उच्चशिक्षित बेरोजगार
By Admin | Updated: September 8, 2016 01:26 IST2016-09-08T01:26:23+5:302016-09-08T01:26:23+5:30
उच्च शिक्षण घेऊनही हाताला काम नसल्याने राष्ट्रीय उत्पन्नात भर न घालणाऱ्यांची संख्या गडचिरोली जिल्ह्यात अधिक असल्याचे

गडचिरोलीत २६.६२ टक्के उच्चशिक्षित बेरोजगार
२१.०६ टक्के लोकांची शेतीवर उपजीविका : यशदा व विदर्भ विकास मंडळाचा अहवाल
गडचिरोली : उच्च शिक्षण घेऊनही हाताला काम नसल्याने राष्ट्रीय उत्पन्नात भर न घालणाऱ्यांची संख्या गडचिरोली जिल्ह्यात अधिक असल्याचे निरीक्षण ‘यशदा’ व विदर्भ विकास मंडळाने नोंदविले आहे.
अलिकडेच ‘यशदा’ व विदर्भ विकास मंडळाने संयुक्तरित्या 'गडचिरोली डिस्ट्रीक्ट डेव्हलपमेंट रिपोर्ट' नामक २४० पानांचे पुस्तक प्रसिद्ध केले आहे. या पुस्तकरुपी अहवालात जिल्ह्यातील साक्षरता, उच्च शिक्षण, उत्पन्नाचे स्त्रोत, नागरिकांचा उत्पन्नाचा वाटा, पायाभूत सुविधा तसेच अन्य महत्वाच्या विषयांवर विस्तृत प्रकाश टाकला आहे. दोन्ही संस्थांच्या तज्ज्ञांनी गडचिरोली जिल्ह्यासंबंधीची माहिती गोळा करुन स्थानिक नागरिक, पत्रकार, स्वयंसेवी संस्था व अन्य जाणकारांशी चर्चा करुन उपरोक्त अहवाल तयार केला आहे.
शिक्षण हे सामाजिक परिवर्तनाचे साधन असून, स्वत:मध्ये काही जीवनमूल्ये व कौशल्य विकसित करण्याचे माध्यमही आहे. शिवाय स्वत:ची उत्पादकता व त्याद्वारे उत्पन्न निर्मितीचे साधन म्हणूनही शिक्षण महत्वाची भूमिका बजावत असते. या पार्श्वभूमीवर, ‘यशदा’ व विदर्भ विकास मंडळाने गडचिरोली जिल्ह्याबाबत वेगळे निरीक्षण नोंदविले आहे. त्यांच्या अहवालानुसार, गडचिरोली जिल्ह्यात उच्च शिक्षण घेतलेल्या, परंतु कुठल्याही प्रकारचे उत्पन्न न मिळविणाऱ्या युवक, युवतींची संख्या २६.६२ टक्के एवढी आहे. त्याखालोखाल उच्चशिक्षण घेतलेले २६.४७ टक्के लोक नोकरी व वेगवेगळे व्यवसाय करीत आहेत. यातील तिसरे वास्तव भयावह आहे. उच्चशिक्षण घेतलेल्या, परंतु शेती व वनोपजावर उपजीविका भागविणाऱ्यांची संख्या ही २१.०६ टक्के एवढी आहे उच्चशिक्षण घेतलेले, मात्र कुठल्याही प्रकारचे उत्पन्न न मिळविणारे लोक एटापल्ली, सिरोंचा व कोरची तालुक्यात अधिक आढळून आले आहेत. तसेच उच्चशिक्षण घेऊनही केवळ शेती व वनोपजावर उपजीविका भागविणाऱ्या दुदैवी मंडळींची संख्या गडचिरोली, कुरखेडा व मुलचेरा तालुक्यात अधिक आढळून आली आहे. मात्र, अशाप्रकारचे नागरिक अहेरी, भामरागड, चामोर्शी, देसाईगंज, धानोरा, एटापल्ली व कोरची तालुक्यात कमी आहेत. पुढील शिक्षण घ्यायचे आहे, असे मनापासून वाटणारे व त्यामुळे शेती किंवा वनविभागाच्या कामावर जाऊ न इच्छिणारे बऱ्यापैकी युवक, युवती गडचिरोली व मुलचेरा तालुक्यात दिसून आले आहेत.
‘यशदा’ व विदर्भ विकास मंडळाच्या अहवालातील आणखी एक मनोरंजनात्मक आणि दाहक वास्तव सांगणारी बाब म्हणजे कोणत्याही प्रकारचे उत्पन्न न मिळविणाऱ्या उच्चशिक्षितांची संख्या २६.६२ टक्के असली, तरी दुसरीकडे अशिक्षितांचा हाच आकडा केवळ ६ टक्के आहे. उच्चशिक्षण घेऊनही हाताला काम नसल्याने ते स्वत:च्या उत्पन्नात भर घालू शकलेले नाहीत, तर अशिक्षित मंडळी मात्र शेती व अन्य कामे करुन स्वत:चे पोट भरण्याबरोबरच राष्ट्रीय उत्पन्नवाढीस हातभार लावत आहेत. शिक्षित मंडळींना शेती किंवा वनावर आधारित कामधंदे करण्यात स्वारस्य नाही, असे यावरुन दिसून येते, असे मत तज्ज्ञांनी या अहवालात मांडले आहे.
उपाययोजना काय?
उपरोक्त स्थितीत सुधारणा करण्यासाठी तज्ज्ञांनी काही तीव्र आणि अत्यावश्यक उपाययोजना सुचविल्या आहेत. त्यात ‘आरटीई’नुसार शाळांमध्ये पायाभूत सुविधा निर्माण करणे, प्राथमिक व माध्यमिक शाळा सोडून जाणाऱ्यांची संख्या कमी करण्यासाठी ‘गाव तेथे अंगणवाडी’ ही योजना प्रभावीपणे राबविणे, भामरागड, एटापल्ली, सिरोंचा व धानोरा तालुक्यांमध्ये माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांची संख्या वाढविणे, आश्रमशाळांना तालुकास्थळी स्थलांतरीत करणे, डी.एड व बी.एड झालेल्या स्थानिक युवक, युवतींना शिक्षकाची नोकरी देणे अशा अनेक महत्त्वाच्या उपाययोजना यशदा व विदर्भ विकास मंडळाच्या तज्ज्ञांनी सुचविल्या आहेत. तज्ज्ञांच्या या उपाययोजना प्रत्यक्षात अंमलात आणण्यासाठी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी किती अभिरुची दाखवितात आणि शासन येणाऱ्या काळात खरोखरच पावले उचलते काय, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
महिला शिक्षकांची संख्या अत्यल्प
मुलचेरा तालुका वगळता जिल्ह्यात अन्य कोणत्याही तालुक्यात महिला शिक्षकांची संख्या अत्यल्प आहे. विद्यार्थी व शिक्षकांचे गुणोत्तराचे प्रमाण काही तालुक्यांमध्ये व्यस्त आहे. शिवाय प्राथमिक व पूर्वमाध्यमिक शाळा सोडणाऱ्यांची आकडेवारीही अधिक आहे. जिल्ह्याच्या पूर्वोत्तर व दक्षिण भागातील काही तालुक्यांमध्ये प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाची अत्यंत विदारक स्थिती असल्याचे निरीक्षण तज्ज्ञांनी नोंदविले आहे. कोरची, धानोरा, अहेरी, एटापल्ली, सिरोंचा, मुलचेरा व भामरागड तालुक्यांचा त्यात समावेश आहे.
११ टक्के युवक स्थलांतरित
यशदा व विदर्भ विकास महामंडळाच्या तज्ज्ञांनी निरीक्षण केले. या तज्ज्ञांच्या अहवालानुसार, गडचिरोली जिल्ह्यात रोजगारासाठी अन्यत्र स्थलांतर करणाऱ्यांची संख्या अशिक्षित लोकांपेक्षा सुशिक्षित मंडळींचीच अधिक असल्याचे दिसून आले आहे. सुमारे ११.११ टक्के उच्चशिक्षितांनी रोजगारासाठी स्थलांतर केले, तर अशिक्षितांचे हेच प्रमाण केवळ ०.०९ टक्के एवढे आहे.