२५१ वनहक्क दावे प्रलंबित
By Admin | Updated: October 27, 2016 01:48 IST2016-10-27T01:48:27+5:302016-10-27T01:48:27+5:30
तालुक्याच्या जारावंडी परिसरातील शेतकऱ्यांचे २५१ वनहक्क दावे प्रलंबित आहेत. वारंवार निवेदने व शासनाकडे पाठपुरावा करूनही दावे ...

२५१ वनहक्क दावे प्रलंबित
शेतकऱ्यांचे एसडीओंना निवेदन : दावे निकाली न काढल्यास आंदोलन करणार
एटापल्ली : तालुक्याच्या जारावंडी परिसरातील शेतकऱ्यांचे २५१ वनहक्क दावे प्रलंबित आहेत. वारंवार निवेदने व शासनाकडे पाठपुरावा करूनही दावे निकाली न निघाल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी मंगळवारी उपविभागीय अधिकारी एस. राममूर्ती यांना निवेदन सादर करून वनहक्क दावे निकाली काढण्याची मागणी केली. दावे निकाली न निघाल्यास आंदोलन करू, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.
तालुक्यातील जारावंडी, दोलदा, दिंडवी, भापडा, जांभुळगट्टा, गर्तावाही, मंजिगड, इरपनपायली, मालेनगट्टा, हनपायली, वेडमागड, टेक्का, कसूरवाही, सरखेडा व वंडोली येथील शेतकरी नक्षलग्रस्त भागात वास्तव्य करून मागीत तीन पिढ्यांपासून वन जमिनीवर अतिक्रमण करून शेती करीत आहेत. महसूल विभाग, वन विभागात अतिक्रमित शेतकऱ्यांच्या नोंदी आहेत. सध्या या जमिनींवर शेतकरी पीक काढत आहेत. आपल्या कुटुंंबाचा उदरनिर्वाह करीत आहेत.
त्यामुळे २५१ वनहक्क दावे तत्काळ निकाली काढावे, अशी मागणी तालुका शेतकरी संघटना जारावंडी-कसनसूरच्या वतीने करण्यात आली. राकाँचे प्रदेश उपाध्यक्ष माजी राज्यमंत्री धर्मरावबाबा आत्राम एटापल्ली दौऱ्यावर आले असता त्यांनासुद्धा तालुका शेतकरी संघटनेच्या वतीने निवेदन सादर करून प्रलंबित दावे तत्काळ निकाली काढण्याची मागणी करण्यात आली.
निवेदन देताना तालुका शेतकरी संघटनेचे अध्यक्ष हरिदास टेकाम, उपाध्यक्ष केशव पेदापल्लीवार, सचिव देविदास मोहुर्ले, सहसचिव जग्गू देहारी, धनराज गुरनुले, नसीरखॉ पठाण, रैजी पदा, लक्ष्मण चन्नेवार यांच्यासह शेतकरी बंडू नाईक, प्रेमसाय लकडा, बंडू हिचामी, सन्नू हिचामी, मल्लाजी येनगंटीवार, श्रावण कांबळे, प्रकाश गुरनुले, संपत चौधरी, नलेश मडावी, नाजू येरमे, देवाजी पोटावी, मनकू कातवो, बाजू नरोटे, जग्गू वड्डे, मयाराम हिचामी, नरसू नरोटे, सुरेश खलको, सोमा हलामी, कोरसे पावे, सीताराम नैैताम हजर होते.