२५० शाळा झाल्या डिजिटल
By Admin | Updated: March 3, 2017 01:02 IST2017-03-03T01:02:55+5:302017-03-03T01:02:55+5:30
शिक्षण विभागाच्या निर्देशानंतर गडचिरोली जिल्ह्यातील एकूण २ हजार २३ शाळांपैकी सुमारे २५० शाळा फेब्रुवारी

२५० शाळा झाल्या डिजिटल
लोकवर्गणीतून सहकार्य : मार्चपर्यंत सर्वच शाळा डिजिटल करण्याचे उद्दिष्ट
गडचिरोली : शिक्षण विभागाच्या निर्देशानंतर गडचिरोली जिल्ह्यातील एकूण २ हजार २३ शाळांपैकी सुमारे २५० शाळा फेब्रुवारी महिन्याच्या सुरूवातीपर्यंत डिजिटल झाल्या आहेत.
शाळांमध्ये अध्यापन करताना डिजिटल साधनांचा वापर झाल्यास विद्यार्थ्यांची शिक्षणाविषयची गोडी वाढेल. त्याचबरोबर शिकताना त्यांची एकाग्रता वाढण्यास मदत होईल, असे शिक्षण तज्ज्ञांच्या लक्षात आल्यानंतर शाळांमध्ये अध्यापन करताना जास्तीत जास्त शैक्षणिक साधने व डिजिटल साधने यांचा वापर करण्याचे निर्देश शिक्षण विभागाने दिले. जिल्ह्यातील सर्वच २ हजार २३ शाळा मार्चअखेरपर्यंत डिजिटल करण्याचे उद्दिष्ट जिल्हा शिक्षण विभागाला दिले आहेत. त्यानुसार शिक्षण विभागाने नोव्हेंबर महिन्यापासून नियोजन करण्यास सुरूवात केले. ग्रामपंचायतीची मदत, लोकवर्गणी यांच्या माध्यमातून शाळांनी निधी गोळा करीत जिल्हाभरातील २५० शाळा डिजिटल केल्या आहेत. शाळा डिजिटल करण्यासाठी संबंधित शाळेला एलईडी टीव्ही किंवा अॅन्ड्रॉईड मोबाईल, मॅग्नेफाईन ग्लास, मायक्रो कॉस्ट डिव्हाईस, प्रोजेक्टर आदी साधने खरेदी करावे लागतात. शाळेला डिजिटल करण्यासाठी किमान २५ हजार ते जास्तीत जास्त ८५ हजार रूपयांपर्यंतचा खर्च येतो. प्रत्येक वर्ग डिजिटल करण्याचे उद्दिष्ट असले तरी हे उद्दिष्ट एवढ्या लवकर साध्य करणे शक्य होणार नाही. त्यामुळे सर्वप्रथम शाळेतील किमान एक वर्ग डिजिटल करण्याकडे विशेष भर दिला जात आहे. शाळा डिजिटल झाल्यास अध्यापनाची गुणवत्ता वाढण्यास मदत होईल. त्याचबरोबर डिजिटल साधनांचा वापर करून मनोरंजनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिकविता येणार असल्याने विद्यार्थ्यांची उपस्थिती नियमित राहण्यास मदत होईल. त्याचबरोबर विद्यार्थ्यांची गळती कमी होण्यास मदत होईल, असा अंदाज शिक्षण तज्ज्ञांकडून व्यक्त केला जात आहे. कमी पटसंख्या असलेल्या शाळेला मोबाईल, मॅग्नेफाईन ग्लास व साऊंड वापरून शाळा डिजिटल करण्याची मूभा देण्यात आली आहे.
इतर जिल्ह्यांच्या तुलनेत शाळा डिजिटल करण्याची प्रक्रिया गडचिरोली जिल्ह्यात अतिशय संथगतीने सुरू असल्याचे दिसून येत आहे. तरीही गडचिरोली जिल्ह्यातील परिस्थिती लक्षात घेता शाळा डिजिटल करण्याचे प्रयत्न निश्चितच वाखान्याजोगे आहेत. शाळा डिजिटल झाल्यामुळे शाळेचा दर्जा वाढून सकारात्मक परिणाम दिसून येतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. (नगर प्रतिनिधी)
जिल्हा परिषद शाळांनी असा उभारला निधी
शिक्षण विभागाने शाळा डिजिटल करण्यासाठी सर्व ग्रामपंचायतींना पत्र देऊन पाच टक्के पेसा निधी व १४ व्या वित्त आयोगातून प्राप्त झालेल्या निधीतून काही मदत शाळेला डिजिटल करण्यासाठी आवाहन केले होते. त्यानुसार काही ग्रामपंचायतींनी शाळेला निधी उपलब्ध करून दिला आहे.
सर्व शिक्षा अभियानच्या माध्यमातून ५८ शाळा डिजिटल करण्यात आल्या आहेत. यातील सर्वच शाळा उच्च प्राथमिक आहेत. प्रत्येक शाळेतील तीन वर्ग डिजिटल केले आहेत. यासाठी प्रत्येकी ८५ हजार रूपयांचा खर्च आला आहे.