तीनशे जवानांचा बळी घेणाऱ्या हिडमाच्या दिमतीला २५० नक्षली

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2025 11:21 IST2025-04-26T11:13:58+5:302025-04-26T11:21:23+5:30

१६ व्या वर्षी उचलले शस्त्र : सदस्य ते कमांडर थरारक प्रवास, 'मोस्ट वाँटेड' वर होते सहा कोटींचे इनाम

250 Naxalites killed in retaliation for Hidma's killing of 300 soldiers | तीनशे जवानांचा बळी घेणाऱ्या हिडमाच्या दिमतीला २५० नक्षली

250 Naxalites killed in retaliation for Hidma's killing of 300 soldiers

संजय तिपाले 
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली :
बालेकिल्ल्यातच जवानांनी घेरल्यामुळे चर्चेत आलेला जहाल माओवादी नेता व नक्षलींच्या बटालियन क्र. १चा कमांडर वासे हिडमा ऊर्फ हिदमाल्लू ऊर्फ संतोष (४५) याच्यावर तीनशेहून अधिक जवानांचा बळी घेतल्याचा आरोप आहे. विविध राज्यांचे सहा कोटी रुपयांचे बक्षीस असलेला हिडमा आणि त्याच्यासह सुमारे एक हजार नक्षल्यांना घेरण्यासाठी तब्बल सात हजार जवान मोहिमेत उतरले आहेत. माओवाद्यांविरुद्धचे हे सर्वांत मोठे अभियान मानले जात आहे. एके-४७ बंदूक व अडीचशे नक्षल्यांच्या 'फोर लेयर' सुरक्षेत वावरणाऱ्या 'मोस्ट वाँटेड' हिडमाला पकडण्यात सुरक्षा यंत्रणा यशस्वी होणार का, याकडे सर्वांचे लक्ष आहे. बिजापूर जिल्ह्यातील करेगुट्टा पहाडीवर गुरुवारी जवानांनी पाच नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले तर दोन जवान जखमी झाले. मृत नक्षलींत तीन महिलांचा समावेश आहे.


कोण आहे वासे हिडमा?
करेगुट्टा पहाडीला आश्रयस्थान बनविणाऱ्या वासे हिडमा याने माओवादी चळवळीत पाऊल ठेवले तेव्हा त्याचे वय जेमतेम १६ वर्षे इतके होते. १९९० च्या दशकात शालेय विद्यार्थ्यांना नक्षली चळवळीत खेचण्यासाठी बाल संगम ही चळवळ चालवली गेली. १९९६ मध्ये याद्वारेच तो चळवळीत आला अन् प्रशिक्षण घेतले. त्यानंतर शस्त्र बनविण्याचे, चालविण्याची कला अवगत करून त्याने सदस्य म्हणून काम केले. २००१ ते २००७ दरम्यान तो सदस्य होता. यादरम्यान अतिशय चपळ, चतुर अन् आक्रमक माओवादी म्हणून ओळख निर्माण करून त्याने कमांडरपद मिळवले. दंडकारण्यमधील माओवाद्यांची सर्वांत मजबूत लष्करी संघटना असलेल्या पीपल्स लिबरेशन गुरिल्ला आर्मी (पीएलजीए) बटालियन क्रमांक १ चा तो सध्या प्रमुख आहे. छत्तीसगड-तेलंगणा सीमेवरील बिजापूर जिल्ह्यातील करेगुट्टा जंगल पहाडीला त्याने आपला अड्डा बनवले. येथूनच एक हजार सशस्त्र माओवादी त्याच्या इशाऱ्यावर सुरक्षा यंत्रणेला लक्ष्य करत असत.


गनिमी काव्यात स्वतःचा फसला हिडमा

  • तथापि, करेगुट्टा जंगल पहाडीला घेरा टाकून जहाल नेता वासे हिडमा याच्यासह तेलंगण स्टेट कमिटीचा सदस्य दामोदर, देवा विकास तसेच दंडकारण्यातील अन्य महत्त्वाच्या नेत्यांची बालेकिल्ल्यातच जवानांनी कोंडी केली आहे.
  • गनिमी काव्याच्या योजना आखून त्याने सुरक्षा यंत्रणांना 3 नेहमीच आव्हान दिले. प्रत्येकवेळी जवानांच्या तावडीतून निसटणारा हिडमा यावेळी स्वतःच्याच गनिमी काव्यात पुरता फसला आहे.
  • यावेळीदेखील त्याने गनिमी काव्याचा वापर करून 3 करेगुट्टा परिसरातील पहाडीवर स्फोटके पेरून ठेवली आहेत. नागरिकांनी तिकडे फिरकू नये, असे आवाहन करणारे पत्रक त्याने काढले होते.
  • मात्र, सुरक्षा यंत्रणांनी त्याची रणनीती ओळखून सात हजार जवानांकरवी त्यास चोहोबाजूंनी घेरले.
  • अडीचशे नक्षल्यांचे सुरक्षाकडे भेदून जवान हिडमापर्यंत कसे पोहोचतात, याची उत्सुकता आहे.
  • ३ राज्यांच्या सीमेवर करेगुट्टा जंगल पहाडी आहे. पहाडीचा ७० टक्के भाग छत्तीसगडमध्ये, तर ३० टक्के भाग तेलंगणात येतो. महाराष्ट्राची सीमा पहाडीपासून ६० किलोमीटरवर आहे.

Web Title: 250 Naxalites killed in retaliation for Hidma's killing of 300 soldiers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.