गडचिरोलीमध्ये २२७ घरे कोसळली, ८ हजार हेक्टरवरील पिके मातीमोल
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2024 13:00 IST2024-07-24T12:58:33+5:302024-07-24T13:00:35+5:30
जिल्ह्यात अतिवृष्टीने दाणादाण : या हंगामात आतापर्यंत सहा जणांचा बळी; २२ जनावरे दगावली

227 houses collapsed in Gadchiroli, crops on 8 thousand hectares were destroyed
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोलीः जूनमध्ये दडी मारणाऱ्या पावसाने जुलैमध्ये कसर भरुन काढली. चार दिवसांत अतिवृष्टीमुळे १९ ते २१ जुलै या दरम्यान जिल्ह्यात सुमारे ८ हजार हेक्टरवरील पिके मातीमोल झाली तर तब्बल २२७ घरे कोसळली. दरम्यान, दोघांचा बळी गेला. या हंगामात आतापर्यंत नैसर्गिक आपत्तीमुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या पाच झाली आहे.
जिल्ह्यात १८ जुलैपासून पावसाला सुरुवात झाली. पावसाचा जोर तीन दिवस कायम होता. १८ ते २१ जुलै दरम्यान झालेल्या नुकसानीची माहिती समोर आली आहे. यात १७ मोठी जनावरे, ५ लहान जनावरे मृत्युमुखी पडली. २२७ घरांचे नुकसान झाले असून यापैकी ७ घरे पूर्णतः क्षतिग्रस्त झाली आहेत. सोबतच ३२ गोठ्यांचेही नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील बाराही तालुक्यांत अतिवृष्टीचा तडाखा बसला असून सुमारे ८ हजार २७७ हेक्टवरील ९ हजार ७८० शेतकऱ्यांचे नुकसान झाले. धान, कापूस, सोयाबीन, तूर व भाजीपाला तसेच काही ठिकाणी फळपिकांनाही जबर फटका बसला.
यांचा झाला मृत्यू...
जून २०२४ पासून आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू झाला. जूनमध्ये वीज कोसळून चंदू गिरमा पोरटेत (रा. एटापल्ली) या शेतकऱ्याचा मृत्यू झाला. ८ जुलै रोजी अक्षय उर्फ अंकुश पांडू कुळयेटी व ९ जुलै रोजी अमिल डोलू डोलू टिमा यांचा नाल्यात वाहून गेल्याने मृत्यू झाला. १७ जुलै रोजी विठ्ठल हणमंत गेडाम (रा. कुलकुली) हे नाल्यात वाहून गेले, नंतर त्यांचा मृतदेह आढळला. २१ जुलै रोजी वंश विजय भुते (रा. कोंढाळा ता. देसाईगंज) या ८ वर्षीय मुलाचा गावतलावात बुडून मृत्यू झाला. त्याच दिवशी मध्यरात्री आलापल्ली- मुलचेरा मार्गावरील जंगलात कोसळलेल्या झाडावर दुचाकी आदळल्याने माडीथाटी नवीनकुमार रेड्डी (रा. राजुरा कॉलनी, रायचोटी, कडपा, आंध्रप्रदेश, ह.मु. आलापल्ली) हा ठार झाला.
सरासरीपेक्षा २६८ मि.मी. अधिक पाऊस
जून महिन्यात पावसाची सर्वांना प्रतीक्षा होती. मात्र, वार्षिक सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस झाला होता. जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे ही तूट तर भरुन निघालीच, पण सरासरीपेक्षा २६८ मि.मी. अधिक पावसाची नोंद झाली. २१ जुलैपर्यंत वार्षिक सरासरी ३१८.५ मि.मी. इतकी आहे. प्रत्यक्षात ५८५.५ मि.मी. इतका पाऊस झाला.