२१५ रोहित्रांमध्ये बिघाड
By Admin | Updated: December 6, 2014 01:28 IST2014-12-06T01:28:28+5:302014-12-06T01:28:28+5:30
जिल्ह्यातील रोहित्रांची वीज कर्मचाऱ्यांकडून वेळोवेळी देखभाल केली जात नसल्याने एप्रिल ते आॅक्टोबर या सहा महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यातील २१५ रोहित्रांमध्ये बिघाड निर्माण झाला होता.

२१५ रोहित्रांमध्ये बिघाड
गडचिरोली : जिल्ह्यातील रोहित्रांची वीज कर्मचाऱ्यांकडून वेळोवेळी देखभाल केली जात नसल्याने एप्रिल ते आॅक्टोबर या सहा महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यातील २१५ रोहित्रांमध्ये बिघाड निर्माण झाला होता. रोहीत्र (ट्रान्सफार्मर) बिघडल्यानंतर गावातील विद्युत पुरवठा किमान ८ ते १५ दिवस ठप्प राहत असल्याने गावकऱ्यांना अंधाराचा सामना करावा लागला आहे.
मुख्य विद्युत लाईनच्या सहाय्याने गावापर्यंत विद्युत पुरवठा केला जातो. या मुख्य लाईनचा व्होल्टेज ४४० चा राहतो. या व्होल्टेजवर घरगुती उपकरणे जळण्याची शक्यता राहते. हे व्होल्टेज कमी करून २३० व्होल्टेजचा पुरवठा करण्यासाठी प्रत्येक गावाशेजारी विद्युत रोहीत्र बसविण्यात आले आहेत. गडचिरोली जिल्ह्यात सद्यस्थितीत ४ हजार २५४ विद्युत रोहीत्र बसविण्यात आले आहेत. गावातील विद्युतचा पुरवठा सुरळीत राहण्यासाठी विद्युत रोहीत्र व्यवस्थित काम करणे आवश्यक आहे. त्यासाठी विद्युत रोहित्रांची वेळोवेळी देखभाल करणे या अंतर्गत एका विशिष्ट कालावधीनंतर त्यामध्ये असलेले तेल बदलविणे व विशिष्ट उपकरणे बदलविणे गरजेचे आहे. मात्र विद्युत कर्मचारी बऱ्याच वेळा विद्युत रोहित्रांची देखभाल करीत नाही. त्यामुळे विद्युत रोहित्रांमध्ये बिघाड निर्माण होते. मुख्य लाईनमधून विद्युतचा पुरवठा ४४० व्होल्टपेक्षा अधिक झाल्यानेही विद्युत रोहीत्र जळण्याची अधिक शक्यता राहते. गडचिरोली जिल्ह्यात उद्योगांचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे विद्युत दाब कमी-जास्त झाल्यामुळे रोहित्र जळण्याचे प्रमाण कमी असले तरी देखभालीअभावी रोहित्र जळण्याचे प्रमाण इतर जिल्ह्यांच्या तुलनेत जास्त आहे.
विद्युत वितरण कंपनीचे कर्मचारी ग्रामीण व दुर्गम भागातील रोहित्रांची वेळोवेळी देखभाल घेत नसल्यानेच एप्रिल ते आॅक्टोबर या सहा महिन्यांच्या कालावधीत सुमारे २१५ रोहित्रांमध्ये बिघाड निर्माण झाला. रोहित्रांमध्ये बिघाड आल्यावर गावातील वीज पुरवठा पूर्णपणे ठप्प पडतो. रोहीत्र जळाल्यानंतर ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिक याबद्दलची तक्रार करतात. मात्र वीज वितरण कंपनीचे कर्मचारी टोलवाटोलवीची उत्तरे देऊन किमान १५ ते २० दिवस रोहीत्र दुरूस्त करीत नाही. परिणामी नागरिकांना अंधारातच कित्येक दिवस काढावे लागतात. पावसाळ्याच्या दिवसात रोहीत्र जळण्याचे प्रमाण सर्वाधिक राहत असून रस्त्यांअभावी रोहीत्र दुरूस्त करतानाही वीज कर्मचाऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.
वीज वितरण कंपनीने ग्राहकांच्या संख्येनुसार वीज कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. गडचिरोली जिल्ह्याच्या लोकसंख्येचे घनतेचे प्रमाण इतर जिल्ह्यांच्या तुलनेत कमी आहे. ५ ते १० किमी अंतरावर एखादे खेडे असून त्यामध्ये केवळ १० ते २० च घरे आहेत. परिणामी वीज ग्राहकांची संख्याही कमी आहे. त्यामुळे एका वीज कर्मचाऱ्याकडे २० ते २५ किमी परिसरातील गावे सोपविली आहेत. एका कर्मचाऱ्याला किमान २५ ते ३० रोहित्रांच्या देखभालीचे काम करावे लागते. या सर्व परिस्थितीमुळे देखभालीकडे दुर्लक्ष होऊनरोहीत्र जळण्याचे प्रमाण वाढले आहे.
(नगर प्रतिनिधी)