लोहदगडाचे २१ ट्रक थांबविले
By Admin | Updated: March 22, 2017 02:01 IST2017-03-22T02:01:17+5:302017-03-22T02:01:17+5:30
डिसेंबर महिन्यात घडलेल्या जळीतकांडानंतर मागील १५ दिवसांपासून सुरजागड पहाडीवरून लोहखनिजाची वाहतूक चोख पोलीस बंदोबस्तात सुरू करण्यात आली आहे.

लोहदगडाचे २१ ट्रक थांबविले
वेळेत न निघाल्याने घडली घटना : सुरजागडवरून सुरू आहे वाहतूक
एटापल्ली : डिसेंबर महिन्यात घडलेल्या जळीतकांडानंतर मागील १५ दिवसांपासून सुरजागड पहाडीवरून लोहखनिजाची वाहतूक चोख पोलीस बंदोबस्तात सुरू करण्यात आली आहे. पोलिसांच्या निर्देशानुसार ठराविक वेळेतच सर्व ट्रक बाहेर काढले जातात. मात्र या वेळेचे बंधन न पाळल्याने जवळजवळ २१ ट्रक उप विभागीय पोलीस अधिकारी कार्यालय एटापल्ली येथे आणून उभे करण्यात आले आहे. सोमवारी रात्री नंतर हा प्रकार घडला. मंगळवारी दिवसभर हे ट्रक तेथेच उभे होते.
एटापल्ली तालुक्याच्या सुरजागड पहाडीवर एका खासगी कंपनीने लोहखनिज उत्खनन करून त्याची वाहतूक ट्रकच्या सहाय्याने चंद्रपूर जिल्ह्याच्या घुग्गुस येथे सुरू केली आहे. या वाहतुकीसाठी व उत्खनन कामासाठी पोलीस बंदोबस्त देण्यात आला आहे. त्यामुळे सूर्याेदय ते सुर्यास्त या कालावधीतच हे काम पार पाडले जाते. सुरजागड पहाडी ते आलापल्लीपर्यंत मोठा पोलीस बंदोबस्त या ट्रकच्या वाहतुकीसाठी देण्यात आला आहे. सूर्योदयापूर्वी वाहतूक करण्यात न आल्याने सोमवारी रात्री २१ ट्रक थांबविण्यात आले. ट्रकच्या चालकाने लोहदगड भरल्यानंतर एका गावात ट्रक उभा केला होता व या ट्रकवरचे कर्मचारी गावात टाईमपास करीत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यानंतर तत्काळ संबंधित कारवाई करण्यात आली. त्यामुळे मंगळवारी लोहखनिजाची वाहतूक ठप्प पडून होती. (तालुका प्रतिनिधी)