१९ हजार विद्यार्थ्यांना २१ कोटींची शिष्यवृत्ती
By Admin | Updated: June 25, 2014 23:44 IST2014-06-25T23:44:12+5:302014-06-25T23:44:12+5:30
समाजातील आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य म्हणून समाजकल्याण विभागातर्फे शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येते. गडचिरोली जिल्हा समाजकल्याण विभागातर्फे २०१३-१४ या शैक्षणिक

१९ हजार विद्यार्थ्यांना २१ कोटींची शिष्यवृत्ती
सामाजिक न्यायाचा गजर : २०१३-१४ मध्ये जिल्ह्यात
गोपाल लाजुरकर - गडचिरोली
समाजातील आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य म्हणून समाजकल्याण विभागातर्फे शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येते. गडचिरोली जिल्हा समाजकल्याण विभागातर्फे २०१३-१४ या शैक्षणिक वर्षात अनुसूचित जाती, इतर मागासवर्गीय, विशेष मागास प्रवर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमातीतील आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या १९ हजार ३१ विद्यार्थ्यांना २१ कोटी ७ लाख रूपयांची शिष्यवृत्ती वितरीत करण्यात आली. यासह गुणवत्ता शिष्यवृत्ती व सावित्रीबाई फुले विमुक्त जाती व भटक्या जमाती शिष्यवृत्तीचा लाभही जिल्ह्यातील मॅट्रीकोत्तर विद्यार्थ्यांना देण्यात आला.
आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षण घेता यावे, यासाठी समाजकल्याण विभागातर्फे शिष्यवृत्ती योजनेसह अनेक योजना राबविल्या जात आहेत. याअंतर्गत शैक्षणिक सत्र २०१३-१४ या वर्षात अनुसूचित जातीच्या ७ हजार ९५५ विद्यार्थ्यांना ११ कोटी ९४ लाख ९१ हजार रूपयांची शिष्यवृत्ती वितरीत करण्यात आली. इतर मागासवर्गातील ८ हजार ५१५ विद्यार्थ्यांना ६ कोटी ७५ लाख ८९ हजार रूपये शिष्यवृत्ती, विशेष मागास प्रवर्गातील ७९४ विद्यार्थ्यांना ७५ लाख ६७ हजार रूपये शिष्यवृत्ती तर भटक्या विमुक्त प्रवर्गातील १ हजार ७६७ विद्यार्थ्यांना १ कोटी ६१ लाख २३ हजार रूपये एवढी शिष्यवृत्ती समाजकल्याण विभागामार्फत जिल्ह्यात वितरीत करण्यात आली. समाजकल्याण विभागाअंतर्गत येणाऱ्या अनुसूचित जाती, इतर मागासवर्ग, विशेष मागास प्रवर्ग,विमुक्त जाती व भटक्या जमातीतील एकूण १९ हजार ३१ विद्यार्थ्यांना २१ कोटी ७ लाख रूपयांची शिष्यवृत्ती वितरीत करण्यात आली. सैनिकी शाळा व शासकीय निवासी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना समाजकल्याण विभागामार्फत सोयी-सुविधा पुरविल्या जात आहेत. अहेरी व सिरोंचा येथील निवासी शाळेतील इयत्ता ५ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांना शिक्षण व निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. यंदा वसतिगृहांची प्रवेश प्रक्रिया आॅनलाईन करण्यात आली आहे, अशी माहिती समाजकल्याणचे सहाय्यक आयुक्त टी. डी. बरगे यांनी दिली आहे.
जिल्ह्यात सामाजिक न्याय दिनासाठी १ लाख ५ हजार मंजूर
सामाजिक न्याय दिन कार्यक्रम साजरा करण्यासाठी जिल्ह्यातील पंचायत समिती व शिक्षण विभागाला समाजकल्याण विभागामार्फत निधी मंजूर करून दिला जातो. याअंतर्गत यंदा सामाजिक न्याय दिन कार्यक्रमासाठी १ लाख ५ हजार रूपये समाजकल्याण विभागामार्फत देण्यात आले आहेत. पंचायत समितीतील संवर्ग विकास अधिकारी यांना ५ हजार रूपये व जि. प. चे शिक्षणाधिकारी यांना १० हजार रूपये निधी देण्यात आलेला आहे. या निधीचा वापर जनजागृती करणे, दिंडी काढणे, समाजकल्याण विभागाच्या योजनांची माहिती नागरिकांना कार्यक्रमाच्या माध्यमातून देणे, यासह अनेक उपक्रम राबविण्यासाठी निधी देण्यात आला आहे.
विमुक्त जाती, भटक्या जमातींच्या मुलींसाठी सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती
विमुक्त जाती, भटक्या जमातींच्या मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थिनींसाठी सुरू करण्यात आली आहे. सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेंतर्गत २०१३-१४ अंतर्गत जिल्ह्यातील २ हजार २८५ मुलींंना २५ लाख ८५ हजार रूपयाची शिष्यवृत्ती वितरीत करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत भटक्या विमुक्त जमातीतील विद्यार्थिनींचे आर्थिकदृष्ट्या सबळीकरण व्हावे, यासाठी सावित्रीबाई फुले योजनेचा लाभ दिला जात आहे.
जिल्ह्यात समाजकल्याण विभागामार्फत सहा वसतिगृह चालविले जात आहेत. यापैकी मुलींंचे तीन व मुलांच्या तीन वसतिगृहांचा समावेश आहे. आरमोरी, गडचिरोली, अहेरी येथे प्रत्येकी एक मुलींचे वसतिगृह तर गडचिरोलीत दोन तर चामोर्शीतील एका मुलांच्या वसतिगृहाचा समावेश आहे. या वसतिगृहांची प्रवेश क्षमता ५५० आहे.