२०० मिली केरोसीन

By Admin | Updated: January 17, 2015 22:57 IST2015-01-17T22:57:19+5:302015-01-17T22:57:19+5:30

जानेवारी महिन्यात राज्य शासनाकडून जिल्ह्याला निम्म्यापेक्षाही कमी केरोसीनचे नियतन मंजूर झाल्याने पुरवठा विभागाकडून प्रतिव्यक्ती केवळ २०० मीली लीटर केरोसीनचा पुरवठा केला जात आहे.

200 ml kerosene | २०० मिली केरोसीन

२०० मिली केरोसीन

प्रतिव्यक्ती : जिल्ह्याला २१ टक्के नियतन झाले मंजूर
गडचिरोली : जानेवारी महिन्यात राज्य शासनाकडून जिल्ह्याला निम्म्यापेक्षाही कमी केरोसीनचे नियतन मंजूर झाल्याने पुरवठा विभागाकडून प्रतिव्यक्ती केवळ २०० मीली लीटर केरोसीनचा पुरवठा केला जात आहे. अचानकच कमी केरोसीन मिळायला लागल्याने ग्राहकांमध्येही संभ्रम निर्माण होऊन केरोसीन दुकानदारांविरूध्दच्या तक्रारींची संख्या तहसील कार्यालयात वाढली आहे.
केंद्र शासनाकडून राज्य शासनाला केरोसीन उपलब्ध करून दिले जाते. केंद्र शासनाकडून प्राप्त होणाऱ्या केरोसीनच्या आधारे प्रत्येक जिल्ह्याला राज्य शासन केरोसीनचा पुरवठा करते. त्यानंतर तहसील स्थळावरून केरोसीन दुकानदार केरोसीन नेऊन नागरिकांना वाटप करतात. १० वर्षांपूर्वी प्रती व्यक्ती जवळपास दोन ते तीन लिटर केरोसीनचा पुरवठा केला जात होता. नागरिकांकडे प्रकाशासाठी विद्युत व स्वयंपाकासाठी गॅस उपलब्ध झाल्याने शासनाने केरोसीनचा पुरवठा दरवर्षी कमी करणे सुरू केले आहे.
शासकीय नियमानुसार प्रतिव्यक्ती दोन लिटर केरोसीन उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे. मात्र एवढे केरोसीन केंद्र शासन कधीच उपलब्ध करून देत नाही. यापूर्वी गडचिरोली जिल्ह्याच्या एकूण मागणीच्या ३४ टक्के केरोसीन उपलब्ध करून दिले जात होते. त्यामुळे जवळपास प्रतिव्यक्ती अर्धा लिटर केरोसीन मिळत होते. जानेवारी महिन्यात मात्र एकूण मागणीच्या केवळ २१ टक्केच केरोसीन उपलब्ध झाले आहे. त्यामुळे प्रति नागरिक २०० मीली लीटरच केरोसीन मिळणार आहे.
प्रत्येकाच्या घरापर्यंत वीज पोहोचली आहे. त्याचबरोबर बहुतांश नागरिकांकडे गॅस आहे, असा तर्क शासनाने यामागे लावला असला तरी जिल्ह्यातील परिस्थिती मात्र अगदी भिन्न आहे. ग्रामीण भागातील ९० टक्के जनतेकडे गॅस नाही तर बहुतांश गावांमध्ये वीज पोहोचलीच नाही. ज्या गावापर्यंत वीज पोहोचली तिथे विद्युत पुरवठा नेहमीच खंडीत होतो. २०० मीली लीटर केरोसीन आठ दिवससुध्दा पुरणार नसल्याने नागरिकांसमोर प्रश्न निर्माण झाला आहे. (नगर प्रतिनिधी)

Web Title: 200 ml kerosene

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.