मध्यरात्री 'तो' घराबाहेर पडला अन् गळफास लावून केली आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2022 17:37 IST2022-03-23T11:40:05+5:302022-03-23T17:37:54+5:30
बुधवारी सकाळी तो घरी आला नव्हता. त्यामुळे शोध घेतला असता मरकेगाव तुकुम रोडपासून १० ते १५ फूट अंतरावर असलेल्या पळसाच्या झाडावर स्वतःच्या दुपट्ट्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत तो आढळला.

मध्यरात्री 'तो' घराबाहेर पडला अन् गळफास लावून केली आत्महत्या
धानोरा (गडचिरोली) : मध्यरात्री घरातून अचानक बेपत्ता झालेला युवक सकाळी घराजवळच्या झाडावर गळफास घेतलेल्या अवस्थेत बुधवारी (दि. २३) सकाळी आढळला. विजय दिवाकर तोफा (वय २०) असे त्या युवकाचे नाव असून, त्याच्या या कृत्यामागील कारण मात्र अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. ही घटना ग्रामपंचायत तुकुम हद्दीत येत असलेल्या मरकेगाव येथे घडली.
मृत विजय हा मंगळवारी रात्री घरात आई, आजी आणि दोन भाऊ यांच्यासोबत झोपला होता. आईला मध्यरात्री रात्री जाग आली असता विजय झोपलेला दिसला नाही. तो कुठे गेला असेल असा प्रश्नही तिला पडला; पण तो थोडा भ्रमिष्टासारखा वागत असल्याने कुठेतरी जवळपास गेला असेल असे म्हणून ती झोपी गेली. बुधवारी सकाळी तो घरी आला नव्हता. त्यामुळे शोध घेतला असता मरकेगाव तुकुम रोडपासून १० ते १५ फूट अंतरावर असलेल्या पळसाच्या झाडावर स्वतःच्या दुपट्ट्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत तो आढळला. याबाबत धानोरा पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठविला. अधिक तपास सुरू आहे.
अवघ्या १२ दिवसांत तीन आत्महत्या
धानोरा येथे जेमतेम १२ दिवसांत तीन आत्महत्येच्या घटना घडल्याने खळबळ माजली आहे. पहिल्या घटनेत १० मार्च रोजी सीआरपीएफ कॅम्प धानोरा येथे एका सीआरपीएफ जवानाने स्वतःच्या बंदुकीतून गोळी झाडून आत्महत्या केली होती. दुसऱ्या घटनेत १६ मार्चला धानोरा टोला येथील अविवाहित युवतीने विष घेऊन आत्महत्या केली. आता या तिसऱ्या घटनेत युवकाने गळफास घेतला. त्यामुळे या घटना चर्चेचा विषय झाल्या आहेत.