जिल्ह्यात दीड वर्षात अपघातात १७१ ठार
By Admin | Updated: August 6, 2015 02:11 IST2015-08-06T02:11:01+5:302015-08-06T02:11:01+5:30
लोकसंख्येच्या तुलनेत वाहनांची संख्या कमी असतानाही गडचिरोली या मागास जिल्ह्यात मागील दीड वर्षात रस्ते अपघातात १७१ जणांचा मृत्यू झाला.

जिल्ह्यात दीड वर्षात अपघातात १७१ ठार
२९५ घटना : ५०८ नागरिक झाले जखमी
लोकमत विशेष
सुनील चौरसिया गडचिरोली
लोकसंख्येच्या तुलनेत वाहनांची संख्या कमी असतानाही गडचिरोली या मागास जिल्ह्यात मागील दीड वर्षात रस्ते अपघातात १७१ जणांचा मृत्यू झाला. तर २९५ अपघातांमध्ये ५०८ जण गंभीररित्या जखमी झाल्याची माहिती पुढे आली आहे. या अपघातात मृत्यू झालेल्यांमध्ये तरूणांचा समावेश अधिक आहे. राज्यात अपघातात मृत्यू होणाऱ्यांमध्ये १४ ते २५ वर्षाच्या तरूणांची टक्केवारी ३२ टक्क्यावरून अधिक आहे.
गडचिरोली जिल्ह्याची लोकसंख्या ११ लाखांच्या जवळ आहे. जिल्ह्यात वेगवेगळ्या प्रकारचे एक लाख वाहने आहे. २०१४ या वर्षामध्ये गडचिरोली जिल्ह्यात १९४ अपघात झाले. यामध्ये ११३ लोकांचा मृत्यू झाला. यात १०४ पुरूष व ९ महिलांचा समावेश आहे. या घटनांमध्ये ३३१ लोक जखमी झाले आहेत. तर २३७ पुरूष व ९४ महिला आहेत. २०१५ या वर्षात जानेवारीपासून जून महिन्यापर्यंत १०१ अपघात झालेत. यात ५८ लोकांचा मृत्यू झाला. यात ५३ पुरूष व पाच महिलांचा समावेश आहे. १७७ लोक अपघातात जखमी झाले आहेत. त्यात ११३ पुरूष व ६४ महिला सहभागी आहेत. मागील दीड वर्षाच्या काळात २९५ रस्ते अपघातात ३६८ पुरूष जखमी झालेत व १५७ जणांचा मृत्यू झाला. यात दुचाकी वाहनावरून झालेल्या अपघाताची संख्या अधिक आहे.
२०१० ते २०१२ मध्ये २९० अपघातात ३३७ लोकांचा बळी
२०१० मध्ये ९५ अपघातात १०६ जण मरण पावले. २०११ मध्ये ९७ अपघातात १०७ जण तर २०१२ मध्ये ९८ अपघातात १२४ जण मरण पावले आहेत.
महाराष्ट्रात महिन्याला साधारणपणे १ हजाराहून अधिक जणांचा रस्ते अपघातात मृत्यू होतो. रस्ते अपघाताच्या संख्येत महाराष्ट्र देशात तामिलनाडू खालोखाल दुसऱ्या क्रमांकावर आहे. वर्षाकाठी १३ हजार जण मरण पावतात.
गडचिरोली जिल्ह्यातील रस्ते अपघाताची प्रमुख कारणे
अहेरी-चंद्रपूर मार्गावर दिना नदीचा पूल तसेच आष्टी जवळील वैनगंगा नदीच्या पुलावर दरवर्षी वाहने पडून अपघात होतात. वैनगंगा नदीच्या पुलावर आजवर अपघातात अनेक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. अरूंद व ठेंगणे पूल यामुळे अपघात होतात. हे एक प्रमुख कारण आहे. विशेषत: पावसाळ्याच्या दिवसात पुलाचे कठडे काढल्यावर अनेक चारचाकी वाहने पुलात कोसळल्याच्या घटना मागील चार ते पाच वर्षात सातत्याने घडत आहे.
आलापल्ली येथे एटापल्ली, सिरोंचा, भामरागडकडे जाणाऱ्या चौफुली मार्गावर अपघात होतात. येथे अनेकदा दुचाकीस्वारांना अपघात होऊन त्यांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहे. हे स्थळ अपघातप्रवण स्थळ आहे. या ठिकाणी भरधाव येणारी वाहने दुचाकीस्वारांसाठी काळ ठरतात.
१८ वर्षांपेक्षा कमी वाहनचालकांचा भरणा आता शहरी व ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर झाला आहे. यांच्याकडे परवाना नसतानाही ते वाहने चालवितात. त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. हाच प्रकार अप्रशिक्षित वाहनचालक ट्रॅक्टर चालवितात व शेतात काम करताना ट्रॅक्टर उलटून होणारे मृत्यू हे ही एक प्रमुख कारण आहे.
मद्य प्राशन करून वाहने चालविणे हे ही जिल्ह्यात अपघातामागचे प्रमुख कारण आहे. अरूंद व छोटे रस्ते तसेच नादुरूस्त पूल आदींमुळे अनेक अपघात वर्षभरात होतात.