गोंडवानाला हवेत १६३ प्राचार्य
By Admin | Updated: February 25, 2016 01:10 IST2016-02-25T01:10:31+5:302016-02-25T01:10:31+5:30
चंद्रपूर-गडचिरोली या शैक्षणिकदृष्ट्या मागास जिल्ह्याच्या विकासासाठी २०११ पासून गोंडवाना विद्यापीठ सुरू करण्यात आले.

गोंडवानाला हवेत १६३ प्राचार्य
कॉलेजचा कारभार ढेपाळला : ग्रंथपाल, अधिव्याख्याता, प्राध्यापकांची २ हजार ३२० पदे रिक्त
दिलीप दहेलकर गडचिरोली
चंद्रपूर-गडचिरोली या शैक्षणिकदृष्ट्या मागास जिल्ह्याच्या विकासासाठी २०११ पासून गोंडवाना विद्यापीठ सुरू करण्यात आले. या विद्यापीठाअंतर्गत दोन्ही जिल्ह्यातील मिळून २३७ महाविद्यालये संलग्न आहेत. या महाविद्यालयांमध्ये प्राचार्यांची १६३ पदे रिक्त आहेत. त्यामुळे विद्यापीठाचा संपूर्ण शैक्षणिक डोलारा कोसळलेल्या स्थितीत आहे. राज्य शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे गोंडवाना विद्यापीठाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष झाले आहे.
गडचिरोलीस्थित असलेल्या गोंडवाना विद्यापीठाअंतर्गत चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात २३७ महाविद्यालये आहेत. यातील १७० महाविद्यालय हे कायम विनाअनुदान तत्त्वावरचे आहे. तर ६७ महाविद्यालय अनुदानीत आहे. दुर्गम व अतिदुर्गम भागात शैक्षणिक विस्तार करताना विनाअनुदानीत महाविद्यालयांकडे आर्थिक संसाधनांचा अभाव आहे. प्राचार्य पदासाठी येणारी व्यक्ती किमान ८० हजार ते एक लाख रूपये वेतनाची अपेक्षा ठेवून असते. त्यामुळे विनाअनुदानीत महाविद्यालयांना त्यांच्या वेतनाचा एवढा भार उचलने अत्यंत कठीण बाब ठरते.
त्यामुळे अशा महाविद्यालयांनी आजवर नियमित प्राचार्यांची नियुक्ती केलेली नाही. तसेच राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने २००९ मध्ये एक निर्णय जाहीर केला. त्यानुसार प्राचार्य पदावर येणाऱ्या व्यक्तीचा कार्यकाळ हा किमान पाच वर्षांचा ठेवण्यात आला आहे. त्यानंतर सदर व्यक्ती आपल्या मूळ आस्थापनेच्या ठिकाणी (महाविद्यालयात) परत जाईल. शासनाच्या या अटीमुळे अनेक प्राध्यापक प्राचार्य पदासाठी पात्र असूनही ते या पदावर येण्यास तयार होत नाही. प्राध्यापक व प्राचार्यांना सारखीच वेतनश्रेणी असल्याने प्राचार्य मिळण्यासही अडचण निर्माण होते. त्यामुळे नव्याने निर्माण झालेल्या गोंडवाना विद्यापीठातील महाविद्यालयासमोर नवे प्राचार्य मिळविण्याची प्रचंड अडचण आहे. याबाबत वेळोवेळी महाविद्यालयाच्या संस्थाचालकांनी राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांकडे यावर काही तरी तोडगा काढा, आम्हाला अनुदान द्या, आम्ही प्राचार्य नियुक्त करतो, अशी भूमिका मांडली. परंतु सरकारचे गोंडवाना विद्यापीठाअंतर्गत कारभाराकडे प्रचंड दुर्लक्ष झाले आहे. याचा परिणाम गोंडवाना विद्यापीठाच्या वाटचालीवर होत आहे. त्यातच २७ नोव्हेंबर २०१५ रोजी गोंडवाना विद्यापीठाच्या विद्वत परिषदेने ज्या महाविद्यालयांनी नियमित प्राचार्य नियुक्त केले नाही, तेथील विद्यार्थ्यांचे परीक्षेसाठी नामांकन यापुढे करण्यात येऊ नये, असा ठराव पारित केला आहे. त्यामुळे आणखी नव्या अडचणी आता निर्माण होणार आहेत.
तसेच या विद्यापीठाअंतर्गत ग्रंथपालाची २३७ पदे मंजूर आहेत. विद्यमान स्थितीत केवळ ५६ पदेच भरलेली असून १८१ पदे रिक्त आहेत. यामध्ये अनुदानीत महाविद्यालयांमधील ६७ पदांपैकी ५१ पदे भरलेली आहे. १६ पदे रिक्त आहेत. तर कायम विनाअनुदानीत महाविद्यालयातील १७० पदापैकी केवळ ५ पदे भरलेली असून १६५ पदे रिक्त आहेत. ग्रंथपालांची १८१ पदे गोंडवाना विद्यापीठाअंतर्गत रिक्त आहेत. तसेच शारीरिक शिक्षक संचालकांची २०० पदे मंजूर असून त्यापैकी केवळ ५४ पदे भरलेली आहे तर अद्यापही तब्बल १४६ पदे रिक्त आहेत.