१६२ घरकुलांना प्रारंभ नाही
By Admin | Updated: December 23, 2014 23:02 IST2014-12-23T23:02:44+5:302014-12-23T23:02:44+5:30
नगर पालिका क्षेत्रातील अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांना हक्काचे घर मिळावे यासाठी शासनाने रमाई घरकूल योजना सुरू केली. मात्र या योजनेतील जाचक अटीमुळे अनेक घटकांना घरकुलाचा लाभ

१६२ घरकुलांना प्रारंभ नाही
८१ घरकूल अपूर्णावस्थेत : जाचक अटीमुळे रमाई घरकूल योजना ठरली मृगजळ
दिलीप दहेलकर - गडचिरोली
नगर पालिका क्षेत्रातील अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांना हक्काचे घर मिळावे यासाठी शासनाने रमाई घरकूल योजना सुरू केली. मात्र या योजनेतील जाचक अटीमुळे अनेक घटकांना घरकुलाचा लाभ देण्यासाठी अडचण जाणवत आहे. याशिवाय प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे दोन्ही नगर पालिका क्षेत्रातील तब्बल १६२ घरकुलांच्या कामांना प्रारंभच झाला नाही. याशिवाय गेल्या दोन वर्षांपासून ८१ घरकुलांचे काम अपूर्णावस्थेत आहे. त्यामुळे सदर योजना गरजू लाभार्थ्यांसाठी केवळ मृगजळ ठरली आहे.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या २९ सप्टेंबर २०११ च्या सुधारित शासन निर्णयानुसार दारिद्र्य रेषेखालील अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांसाठी रमाई घरकूल योजना सुरू करण्यात आली. शासन निर्णयानुसार प्रथम टप्प्यात या योजनेचा लाभ दारिद्र्य रेषेखालील अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांसाठी देण्यात येण्याची तरतूद आहे. पात्र बीपीएलधारकांना या योजनेचा लाभ मिळाल्यानंतर या योजनेचा दुसरा टप्पा अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील एपीएलधारक लाभार्थ्यांसाठी राबविण्यात यावा, असेही शासनाने निर्णयात म्हटले आहे. एपीएलधारकांसाठी उत्पन्नाची मर्यादा दीड लाखापर्यंत आहे. रमाई घरकूल योजनेंतर्गत सन २०१० ते २०१४ या कालावधीपर्यंत जिल्ह्यातील दोनही नगर पालिका क्षेत्रात सामाजिक न्याय विभागाला एकूण १ हजार घरकुलांचे उद्दीष्ट होते. मात्र सदर उद्दीष्ट गाठण्यात प्रशासनाला यश आले नाही. याची अनेक कारणे आहेत. सन २०१०-११ या पहिल्या वर्षात रमाई घरकूल योजनेंतर्गत गडचिरोली न.प. क्षेत्रात दारिद्र्य रेषेखालील एकूण ७२० कुटुंबापैकी ६३ लाभार्थ्यांची घरकुलासाठी निवड करण्यात आली. यापैकी घरकुलाचे बांधकाम पूर्ण केलेल्या ४९ लाभार्थ्यांना अनुदानाची रक्कम वितरित करण्यात आली आहे. ६३ पैकी केवळ ३२ घरकुलाचे काम पूर्ण झाले असून गडचिरोली शहरातील १७ घरकूल अद्यापही अपूर्णावस्थेत आहे.
विशेष म्हणजे, २०१०-११ या वर्षात मंजूर झालेल्या १४ घरकुलाच्या कामांना प्रारंभच झाला नसल्याची माहिती पुढे आली आहे. पहिल्या वर्षात या घरकुलांसाठी ७०.९५ लाखाचा निधी खर्च झाल्याची प्रशासन दरबारी नोंद आहे. देसाईगंज न.प. क्षेत्रात २०१०-११ या पहिल्या वर्षी दारिद्र्य रेषेखालील अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांचे एकूण ५२२ कुटुंब आहे. यापैकी ४३ लाभार्थ्यांची घरकुलांसाठी निवड करण्यात आली. घरकुलाचे बांधकाम पूर्ण केलेल्या ३५ लाभार्थ्यांना अनुदानाची रक्कम वितरित करण्यात आले असून घरकुलांवर ५२.३५ लाख रूपयाचा खर्च झाल्याची नोंद प्रशासनाच्या लेखी आहे. २०११-१२ या वर्षातील गडचिरोली न.प. क्षेत्रातील २० घरकुलाचे काम अपूर्णावस्थेत असून ३९ घरकुलांच्या कामांना सुरूवात झाली नाही. देसाईगंज न.प. क्षेत्रात २५ घरकूल अपूर्णावस्थेत असून १०० घरकुलांच्या बांधकामाचा अद्यापही मुहूर्तच सापडला नसल्याची माहिती आहे.