16-day-old baby shakes due to priest treatment | पुजाऱ्याच्या उपचारामुळे १६ दिवसांचे बाळ दगावले
पुजाऱ्याच्या उपचारामुळे १६ दिवसांचे बाळ दगावले

ठळक मुद्देएटापल्ली टोला येथील घटना : अंधश्रद्धेने घेतला बाळाचा बळी

लोकमत न्यूज नेटवर्क
एटापल्ली : अहेरी उपविभागाच्या आदिवासीबहुल भागात प्रशासकीय यंत्रणा तसेच आरोग्य विभागाची चमू लोकांच्या सेवेसाठी पोहोचत असली तरी या भागातील अशिक्षित आदिवासी नागरिकांच्या डोक्यातून अंधश्रद्धा जाताना दिसत नाही. अशाच एका घटनेत डॉक्टरऐवजी नवजात बालकावर पुजाºयाने उपचार केल्याने त्या बाळाला आपला जीव गमवावा लागला. जन्मत:च कावीळ झालेल्या बाळावर त्याच्या आईवडिलांनी डॉक्टरांकडून उपचार करून घेतले नाही. पुजाºयाकडून सुरू असलेल्या उपचाराच्या भरवशावर राहिल्याने ३० डिसेंबर रोजी १६ दिवसांचे ते नवजात बाळ दगावले. ही घटना एटापल्ली टोला येथे उघडकीस आली आहे.
एटापल्ली शहरापासून एक किमी अंतरावर टोला येथे ५० ते ६० घरांची वस्ती आहे. येथील रहिवासी सुनील पुंगाटी यांच्या पत्नीची प्रसूती एटापल्ली येथील ग्रामीण रुग्णालयात झाली. यावेळी मुलगा जन्माला आला. जन्मताच सदर नवजात बाळाला कावीळचे लक्षण दिसून आल्याने डॉक्टरांनी अहेरीच्या उपजिल्हा रुग्णालयात औषधोपचार करण्याचा सल्ला दिला. परंतु कुटुंबियांनी सदर बाळावर रुग्णालयात उपचार न करता स्वत:च्या घरी पुजारांकडून उपचार सुरू केले. दरम्यान ३० डिसेंबर रोजी मंगळवारला तोडसा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिचारिका सदर बाळाच्या घरी लसीकरणासाठी गेल्या त्यावेळी त्याची प्रकृती ठिक नसल्याचे दिसून आले. उपचाराबाबत आरोग्य कर्मचाऱ्यांनी विचारले असता पुजाऱ्यांकडून बाळावर उपचार सुरू असल्याची माहिती मिळाली. पुंगाटी कुटुंबियांची समजूत काढत त्या बाळाला रुग्णालयात भरती करण्याचा सल्ला आरोग्य कर्मचाऱ्यांना दिला. परंतु कुटुंबियांनी बाळाला रुग्णालयात नेण्यास नकार दिला. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी ही माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.राजेश वाहने यांना दिली. डॉ.वाहने यांनी स्वत: पुंगाटी यांच्या घरी जाऊन कुटुंबियांना समजावल्याचे सांगितले जाते. सुरूवातीला बाळाला रुग्णालयात नेण्यास कुटुंबियांनी नकार दिला. मात्र डॉ.वाहने यांनी या बाळाला मंगळवारी दुपारी १२.३० वाजता ग्रामीण रुग्णालयात भरती केले. उपचारादरम्यान सायंकाळी ४.१० वाजता बाळाचा मृत्यू झाला.
पुंगाटी यांच्या बाळाला कावीळ व इतर आजार होते. त्यामुळे सदर बाळाला पुढील उपचारासाठी आम्ही अहेरीला रेफर केले. परंतु नातेवाईक अहेरीला नेण्यास तयार नसल्याचे सांगितले व तसे लिहून दिले, अशी माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.नटवरलाल शृंगारे यांनी दिली.

वडील म्हणतात, दवाखान्यात आणल्याने मृत्यू
दवाखान्यात उपचारासाठी आणल्यानेच बाळाचा मृत्यू झाला, असा गैरसमज वडिलांनी केला असून तसे वडील सुनील पुंगाटी यांनी दवाखान्यात बोलून दाखविले. एटापल्ली तालुक्याच्या दुर्गम व लांब अंतरावरील गावात अशा प्रकारच्या घटना यापूर्वीही घडल्या आहेत. दुर्गम भागात जनजागृतीचा अभाव आहे. मात्र एटापल्ली शहरापासून केवळ एक किमी अंतरावर असलेल्या टोला येथे ही घटना घडल्याने काही कुटुंब आरोग्याप्रती जागरूक नसल्याचे स्पष्ट होत आहे. अशिक्षित आदिवासी लोकांमध्ये अज्ञान व अंधश्रद्धा कायम असल्याने अशा घटना शहरानजीकही घडत आहेत.

Web Title: 16-day-old baby shakes due to priest treatment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.