देसाईगंज-गडचिरोली मार्गाच्या नुतनीकरणासाठी १६ कोटी मंजूर
By Admin | Updated: September 6, 2016 00:54 IST2016-09-06T00:54:49+5:302016-09-06T00:54:49+5:30
देसाईगंज-आरमोरी-गडचिरोली या राज्य महामार्गाच्या दुरूस्तीसाठी १६ कोटी रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

देसाईगंज-गडचिरोली मार्गाच्या नुतनीकरणासाठी १६ कोटी मंजूर
भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयाकडून निधी
आरमोरी : देसाईगंज-आरमोरी-गडचिरोली या राज्य महामार्गाच्या दुरूस्तीसाठी १६ कोटी रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. सदर निधी मिळविण्यासाठी आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार क्रिष्णा गजबे यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता.
राष्ट्रीय महामार्ग रस्ते विकास विभाग भंडाराच्या अंतर्गत येत असलेल्या लाखांदूर-देसाईगंज-आरमोरी बर्डी टी पार्इंटपर्यंतच्या रस्ता नुतनीकरणासाठी ८ कोटी २५ लाख रूपयांचा निधी मंजूर झाला आहे. राष्ट्रीय महामार्ग रस्ते विकास विभाग गडचिरोलीच्या अंतर्गत येत असलेल्या आरमोरी बर्डी टी पार्इंट ते गडचिरोली इंदिरा चौकापर्यंतच्या मार्गासाठी ८ कोटी रूपयांचा निधी मंजूर झाला आहे. कामाची निविदा लवकरच काढण्यात येऊन कामाला सुरूवात होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे या मार्गाचे मागील तीन ते चार वर्षांपासून नुतनीकरण रखडले होते. त्यामुळे या मार्गावर प्रचंड प्रमाणात खड्डे पडले होते. या खड्ड्यांमुळे अपघातांचे प्रमाणही वाढले होते. नुतनीकरणासाठी आमदारांनी पाठपुरावा करावा, अशी मागणी होत होती. केंद्र सरकारने हा निधी उपलब्ध करून दिला आहे. (शहर प्रतिनिधी)
देसाईगंज-आरमोरी-गडचिरोली महामार्ग नुतनीकरणासाठी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा केला. त्यामुळे राष्ट्रीय रस्ते विकास विभागाने १६ कोटी रूपयांचा निधी मंजूर केला आहे. लवकरच या रस्त्याच्या नुतनीकरणाच्या कामाला सुरूवात होणार आहे. खड्ड्यांमुळे वाहनधारक त्रस्त होते. त्यामुळे नुतनीकरण आवश्यक झाले होते.
- क्रिष्णा गजबे, आमदार, आरमोरी क्षेत्र