१५ पोलीस शहीद तर ९ नक्षलवादी ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2019 05:00 IST2019-12-31T05:00:00+5:302019-12-31T05:00:23+5:30

गेल्या दोन ते तीन वर्षात नक्षलवादी कारवाया बऱ्यापैकी नियंत्रणात आल्या असल्याचे वाटत असताना नक्षलवाद्यांनी कुरखेडा तालुक्यातील जांभुळखेडाजवळ घडवून आणलेला भूसुरूंग स्फोट नक्षलविरोधी अभियानासाठी मोठा हादरा होता. गेल्यावर्षी म्हणजे २२ एप्रिल २०१८ रोजी उडालेल्या चकमकीत तब्बल ४० नक्षलवाद्यांना पोलिसांनी कंठस्रान घातले होते.

15 policeman was killed while 9 Naxals were killed | १५ पोलीस शहीद तर ९ नक्षलवादी ठार

१५ पोलीस शहीद तर ९ नक्षलवादी ठार

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : सरते वर्ष २०१९ हे पोलीस विभागाला अनेक बाबतीत यश देणारे तर काही कटू आठवणी देणारे ठरले. या वर्षात नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या भूसुरूंग स्फोटात १५ पोलीस जवानांना शहीद व्हावे लागले. १ मे रोजी महाराष्ट्र दिनाच्या उत्साहावर विरजण टाकणाऱ्या या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला. दुसरीकडे वर्षभरात विविध चकमकींमध्ये पोलिसांच्या गोळीने ९ नक्षलवाद्यांचा वेध घेतला.
गेल्या दोन ते तीन वर्षात नक्षलवादी कारवाया बऱ्यापैकी नियंत्रणात आल्या असल्याचे वाटत असताना नक्षलवाद्यांनी कुरखेडा तालुक्यातील जांभुळखेडाजवळ घडवून आणलेला भूसुरूंग स्फोट नक्षलविरोधी अभियानासाठी मोठा हादरा होता. गेल्यावर्षी म्हणजे २२ एप्रिल २०१८ रोजी उडालेल्या चकमकीत तब्बल ४० नक्षलवाद्यांना पोलिसांनी कंठस्रान घातले होते. नक्षलविरोधी अभियानातील सर्वात मोठ्या ठरलेल्या त्या चकमकीचा बदला म्हणून बरोबर १ वर्ष ९ दिवसांनी म्हणजे १ मे २०१९ रोजी नक्षलवाद्यांनी सूड उगवत भूसुरूंग स्फोट घडवून १५ पोलिसांचा जीव घेतला. यामुळे नक्षली हिंसाचारात बळी गेलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील शहीद पोलिसांचा आकडा २०९ झाला.
१ मे रोजी कुरखेडा तालुक्यातील दादापूर येथे महामार्गाच्या कामावरील वाहने, कंत्राटदाराचे कार्यालय, डांबर प्लान्ट नक्षलवाद्यांनी जाळले. ही माहिती मिळाल्यानंतर कुरखेडाचे तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी शैलेश काळे घटनास्थळी गेले. त्यानंतर त्यांच्या ‘क्युआरटी’ला (शीघ्र प्रतिसाद पथक) त्यांनी तातडीने घटनास्थळी पाचारण केले. पण पोलिसांचे वाहन उपलब्ध नसल्याने १५ जवान एका खासगी मालवाहू (पिकअप) वाहनाने तिकडे रवाना झाले. अशा पद्धतीने उघड्या वाहनातून जाण्याची जोखीम पत्करणे पोलिसांच्या जीवावर बेतले. कुरखेडापासून अवघ्या ६ किलोमीटर अंतरावर जांभूळखेडाजवळच्या छोट्या पुलालगत पोलीस जवानांचे वाहन येताच नक्षलवाद्यांनी आधिच पेरून ठेवलेल्या भूसुरूंगाचा स्फोट घडवून आणला. त्यात जवानांच्या वाहनाच्या चिंधड्या उडून वाहन चालकासह सर्वच्या सर्व १५ जवान शहीद झाले.
तत्कालीन एसडीपीओ शैलेश काळे हेच या घटनेसाठी जबाबदार असल्याचा रोष निर्माण झाल्यानंतर काळे यांची नंदूरबार जिल्ह्यात बदली करण्यात आली. काही दिवसातच त्यांचे निलंबनही करण्यात आले.

राष्टÑीय सुरक्षा एजन्सीने केला तपास
अतिशय योजनाबद्धरीत्या हा शक्तीशाली भूसुरूंग स्फोट घडवून आणण्यात नक्षलवादी कसे यशस्वी झाले, त्यांना त्या गावाच्या परिसरातील काही लोकांनी कशी मदत केली, या घटनेशी कोणाकोणाचा संबंध आला, आदी बाबींचा तपास वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात स्थानिक पोलीस यंत्रणेने पूर्ण केला. दरम्यान या घटनेचा राष्टÑीय-आंतरराष्टÑीय स्तरावर काही संबंध आहे का, हे तपासण्यासाठी या घटनेचा तपास राष्टÑीय तपास संस्थेकडे (एनआयए) वर्ग करण्यात आला. काही दिवसांपूर्वीच ‘एनआयए’ने हा तपास पूर्ण करून प्रकरण न्यायप्रविष्ठ केले.

नक्षलवाद्यांसोबत २३ चकमकी
यावर्षी नक्षलविरोधी अभियान राबविताना जंगलात पोलीस जवानांची नक्षलवाद्यांशी गाठ पडली. त्यामुळे वर्षभरात २३ चकमकी उडाल्या. त्यात ९ नक्षलवादी ठार झाले. या चकमकीदरम्यान पोलीस जवान नक्षलवाद्यांवर भारी पडल्यामुळे नक्षलवादी जंगलात पळून गेले. काही नक्षलवादी जखमीही झाले, पण ते पोलिसांच्या हाती लागले नाही.

Web Title: 15 policeman was killed while 9 Naxals were killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस