१४ हजार विद्यार्थी देणार दहावी परीक्षा; सात भरारी पथकांचा राहणार 'वॉच'
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2025 15:38 IST2025-02-19T15:37:29+5:302025-02-19T15:38:48+5:30
२१ फेब्रुवारीपासून प्रारंभ : परीक्षा केंद्रांची संख्या ७५

14 thousand students will appear for the 10th exam; Seven flying squads will remain on watch
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणारी दहावीची बोर्डाची परीक्षा २१ फेब्रुवारी, शुक्रवारपासून सुरू होत आहे. जिल्ह्यात एकूण ७५ केंद्रांवरून ही परीक्षा होत असून जिल्ह्यात एकूण १४ हजार ५३२ विद्यार्थी दहावीची परीक्षा देणार आहेत.
जिल्हाभरात सात भरारी पथक गठित करण्यात आले असून या पथकाद्वारे जिल्ह्यातील अतिसंवेदनशील, उपद्रवी केंद्रावर करडी नजर ठेवण्यात येणार आहे. परीक्षा कॉपीमुक्त करण्यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ व शिक्षण विभागाचे प्रयत्न सुरू आहेत. काळ्या यादीत असलेल्या परीक्षा केंदाची यादी शिक्षण विभागाला मिळाली आहे. सात भरारी पथकामध्ये शिक्षणाधिकारी माध्य., शिक्षणाधिकारी प्राथ., उपशिक्षणाधिकारी प्राथ., उपशिक्षणाधिकारी माध्य. व महसूल विभागातील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. ११ ते २ या वेळेत मराठी भाषेचा पहिला पेपर होणार आहे. १७ मार्चपर्यंत परीक्षा प्रक्रिया सुरू राहील, असे शिक्षण विभागाने कळविले आहे.
३० केंद्रे अतिसंवदेनशील
- काळ्या यादीतील परीक्षा केंद्रावर विशेष लक्ष केंद्रित करून, सदर केंद्रावर कॉपीचे प्रकार आढळून आल्यास सदर केंद्राची मान्यता रद्द करण्याचे निर्देश आहेत.
- जिल्हाभरात दहावीचे ३० परीक्षा केंद्रे अतिसंवेदनशील केंद्र म्हणून ओळखली जातात. त्यामुळे या केंद्रावर भरारी पथकाची विशेष नजर राहणार आहे. बैठे पथक सुद्धा तैनात करण्यात येणार आहे.
- कॉपीमुक्तीसाठी प्रशासन सज्ज असल्याचे शिक्षणाधिकारी (मा.) मासुदेव भुसे यांनी सांगितले.
तालुकानिहाय परीक्षार्थी
तालुका परीक्षार्थी परीक्षा केंद्र
गडचिरोली २०९२ १०
अहेरी १५३३ ८
आरमोरी १५२६ ८
भामरागड ३३३ २
चामोर्शी २८२९ १३
देसाईगंज १२४६ ६
धानोरा ९५७ ५
एटापल्ली ७७५ ३
कोरची ५३६ ३
कुरखेडा ११८७ ७
मुलचेरा ७९२ ६
सिरोंचा ७२६ ४
एकूण १४५३२ ७५