जिल्हा रुग्णालयात महिन्याला हाेताहेत १२०० सीटी स्कॅन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:36 IST2021-04-17T04:36:41+5:302021-04-17T04:36:41+5:30
गडचिराेली : काेराेनाची लागण झाल्यानंतर त्याचा प्रसार शरीरामध्ये किती प्रमाणात झाला, हे जाणून घेण्यासाठी सीटी स्कॅन अत्यंत आवश्यक चाचणी ...

जिल्हा रुग्णालयात महिन्याला हाेताहेत १२०० सीटी स्कॅन
गडचिराेली : काेराेनाची लागण झाल्यानंतर त्याचा प्रसार शरीरामध्ये किती प्रमाणात झाला, हे जाणून घेण्यासाठी सीटी स्कॅन अत्यंत आवश्यक चाचणी आहे. काेराेना संशयित रुग्णांच्या एक्स-रे मध्ये अधिक इन्फेक्शन दिसून आल्यावर सीटी स्कॅन करणे अनिवार्य करण्यात आले आहे. काेराेनाचा संसर्ग वाढत असल्यामुळे येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात सीटी स्कॅन करणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली असून, दरराेज ४० ते ५० आणि महिन्याला १२०० पेक्षा अधिक रुग्णांचे सीटी स्कॅन केले जात आहे. यासोबत काही जण खासगी रुग्णालयातही सिटी स्कॅन करतात. या रुग्णालयांमध्ये शासकीय दरापेक्षा कितीतरी अधिक दर आकारले जात आहेत.
गेल्या १५ दिवसांपासून काेराेनाबाधित रुग्णांची संख्या व काेराेनाने मृत्यू हाेत असलेल्या बाधितांची संख्या जिल्ह्यात वाढत आहे. काेराेनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने एक्स-रे पेक्षा सीटी स्कॅन करणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक आहे. गडचिराेली जिल्ह्यात दाेनच ठिकाणी सीटी स्कॅनची सुविधा आहे. एक जिल्हा सामान्य रुग्णालय व दुसरे चामाेर्शी मार्गावरील एका खासगी रुग्णालयात ही सुविधा आहे. पण, खासगी रुग्णालयातील दर सामान्य रुग्णांच्या आवाक्याबाहेर असल्याने रुग्ण सरकारी रुग्णालयातच भरती होण्यास प्राधान्य देत आहेत.
काेट....
जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या एक्स-रे व सीटी स्कॅन विभागात काेराेनामुळे आता रुग्णांची संख्या वाढत आहे. काेराेनाबाधित, बीपीएल, ज्येष्ठ नागरिक व सर्व राज्य सरकारी कर्मचारी (जि.प. कर्मचारी वगळून) आदींना सीटी स्कॅनची सुविधा नि:शुल्क दिली जात आहे. याव्यतिरिक्त उर्वरित रुग्णांना छाती, डाेकं, पाेट यानुसार ३०० ते ५०० रुपये शासकीय दर आकारले जाते. या विभागात एकूण सहा पदे मंजूर आहेत. मात्र, दाेनच पदे भरली आहेत. काेराेनाची रुग्णसंख्या वाढत असल्याने कार्यरत तंत्रज्ञांवर सेवेचा भार वाढत आहे.
- प्रशांत कडमकर, तंत्रज्ञ, जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिराेली
काेट...
गडचिराेली जिल्ह्यात सीटी स्कॅनची शासकीय स्तरावर एकाच ठिकाणी सुविधा आहे. खासगी रुग्णालयात सीटी स्कॅनसाठी हजाराे रुपये घेतले जातात. ते आमच्यासारख्या सामान्य रुग्ण व नातेवाईकांना परवडणारे नाही. त्यामुळे शासनाने आणखी एका ठिकाणी अहेरी उपविभाग परिसरात शासकीय सीटी स्कॅनची सुविधा उपलब्ध करून द्यावी.
- माराेती वालदे, रुग्ण नातेवाईक
काेट....
सीटी स्कॅनचा रिपाेर्ट तत्काळ वेळेवर मिळत नाही. प्रतीक्षा करावी लागते. राेगाचे लवकर निदान हाेऊन उपचार मिळण्यासाठी शासनाने सीटी स्कॅन विभागातील सर्व रिक्त पदे भरावीत.
- पुंडलिक वालकाे, रुग्ण नातेवाईक
बाॅक्स...
शासनाने निश्चित केलेले दर
- १६ स्लाईसखालील सीटी स्कॅन ३५० रुपये
- १६ ते ६४ स्लाईस सीटी स्कॅन ४०० रुपये
- ६४ पेक्षा अधिक स्लाईस सीटी स्कॅन सुविधा नाही
बाॅक्स....
सात पटीने वाढली सीटी स्कॅन रुग्णांची संख्या
पूर्वी विशिष्ट उपचारासाठीच सीटी स्कॅन करावे लागत हाेते. आता काेराेनामुळे बऱ्याच रुग्णांना विषाणूचा प्रसार किती झाला हे जाणून घेण्यासाठी सीटी स्कॅन हा महत्त्वाचा धागा आहे. काेराेनामुळे सीटी स्कॅन करणाऱ्या रुग्णांची संख्या जिल्ह्यात खूप वाढली आहे. पूर्वी दिवसाला १० ते १५ सीटी स्कॅन हाेत हाेते, आता शासकीय रुग्णालयात ४० ते ५० सीटी स्कॅन केले जात आहे.
- १ ते ८ स्कोअर (साैम्य) - ४० टक्के
- ९ ते १८ स्कोअर (मध्यम) - २५ टक्के
- १९ ते २५ स्कोअर (गंभीर) - १५ टक्के
- शून्य स्कोअर (नाॅर्मल) - ५ टक्के