सर्व शिक्षा अभियानासाठी ११४ कोटींची मागणी
By Admin | Updated: April 5, 2016 03:46 IST2016-04-05T03:46:56+5:302016-04-05T03:46:56+5:30
सर्व शिक्षा अभियानच्या माध्यमातून प्राथमिक शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी विविध विविध योजना राबविल्या

सर्व शिक्षा अभियानासाठी ११४ कोटींची मागणी
गडचिरोली : सर्व शिक्षा अभियानच्या माध्यमातून प्राथमिक शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी विविध विविध योजना राबविल्या जातात. २०१६-१७ मध्ये शैक्षणिक विकासावर खर्च करण्यासाठी केंद्र शासनाकडे ११४ कोटी १४ लाख ८२ हजार रूपयांचा अंदाजपत्रक सादर करण्यात आला आहे. यामध्ये बांधकाम करण्यासाठी सर्वाधिक ३६ कोटी ९३ लाख १५ हजार रूपयांची मागणी करण्यात आली आहे.
बालकाचा सर्वांगिण विकास करण्यासाठी प्राथमिक शिक्षणाचा दर्जा चांगला असणे अत्यंत आवश्यक आहे. सर्वच जबाबदाऱ्या शिक्षण विभाग सांभाळू शकत नाही. शिक्षणाशी संबंधित विविध योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी सर्व शिक्षा अभियानची स्थापना केंद्र शासनाने केली आहे.
गडचिरोली जिल्ह्यात एकूण २ हजार ७५ प्राथमिक शाळा असून त्यामध्ये १ लाख ४२ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना अध्ययन करणे सोयीचे व्हावे, यासाठी सर्व शिक्षा अभियानच्या माध्यमातून विविध योजना राबविल्या जातात. सर्व शिक्षा अभियानासाठी केंद्र शासनाकडून निधीचे वितरण केले जाते. प्रत्येक वर्षासाठी अंदाजे किती खर्च येईल, याचे नियोजन करून त्याचे अंदाजपत्रक राज्य शासनाच्या मार्फतीने केंद्र शासनाकडे सादर केले जाते. २०१६-१७ या आर्थिक वर्षासाठी ११४ कोटी १४ लाख ८२ हजार रूपयांचे अंदाजपत्रक केंद्र शासनाकडे सादर करण्यात आले आहे.
या एकूण अंदाजपत्रकापैकी शासनाकडून किती निधी उपलब्ध करून दिला जातो, यावर शैक्षणिक विकास अवलंबून आहे. जिल्हास्तरावरून जेवढे अंदाजपत्रक केंद्र शासनाकडे सादर केले जाते. जवळपास तेवढाच निधी प्राप्त होत असल्याचा दरवर्षीचा अनुभव असल्याने २०१६-१७ या वर्षातही अंदाजपत्रकातील तरतुदीप्रमाणे निधी उपलब्ध होईल, अशी अपेक्षा शिक्षण क्षेत्रातील व्यक्तींकडून केली जात आहे. (नगर प्रतिनिधी)
३७ हजार मीटरच्या संरक्षण भिंती
४प्रत्येक शाळेला संरक्षण भिंत असणे आवश्यक असले तरी गडचिरोली जिल्ह्यातील बहुतांश शाळांना संरक्षण भिंतच नाही. त्यामुळे अंदाजपत्रकात ३७ हजार मीटर लांबीची संरक्षण भिंत बांधण्याचे नियोजन केले आहे. त्यासाठी २७ कोटी ७५ लाख रूपये खर्च येणार आहे. केंद्र शासनाकडून निधी प्राप्त झाल्यास शाळांना संरक्षण भिंत बांधणे शक्य होणार आहे.
हॅन्डवॉश स्टेशनसाठी ३० लाखांची मागणी
४प्रत्येक विद्यार्थ्याला हात धुण्याची सवय लागावी यासाठी त्याला शिक्षक वर्गाकडून मार्गदर्शन केले जाते. मात्र शाळेमध्ये हात धुण्यासाठी कोणतीच सुविधा उपलब्ध नाही. परिणामी दुपारचे जेवन हात न धुताच घ्यावे लागते. त्यामुळे प्रत्येक शाळेत टप्प्याटप्प्याने हॅन्डवॉश स्टेशन निर्माण केले जाणार आहेत. २०१६-१७ मध्ये २०१ हॅन्डवॉश स्टेशन बांधण्यासाठी ३० लाख १५ हजार रूपयांची मागणी अंदाजपत्रकात नमूद करण्यात आली आहे.
प्रशिक्षणासाठी दोन कोटींची तरतूद
४प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र व इतर कार्यक्रमांच्या अनुषंगाने शिक्षकांना प्रशिक्षण देणे आवश्यक झाले आहे. वर्षभर विविध प्रकारचे प्रशिक्षण शिक्षक वर्गासाठी आयोजित करण्यात येते. प्रशिक्षणासाठी येणाऱ्या खर्चाच्या उद्देशाने १ कोटी ९० लाख ६४ हजार रूपयांची तरतूद केंद्र शासनाकडे सादर करण्यात आलेल्या अंदाजपत्रकात करण्यात आली आहे.