गडचिरोलीत ११ जहाल माओवाद्यांचे आत्मसमर्पण; महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या उपस्थितीत टाकले शस्त्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2025 13:43 IST2025-12-11T13:42:05+5:302025-12-11T13:43:29+5:30
Nagpur : दंडकारण्यात माओवादी संघटनेला गडचिरोली पोलिसांनी बुधवारी (१० डिसेंबर) आणखी एक मोठा हादरा दिला. पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या उपस्थितीत एकूण ११ जहाल माओवादींनी शस्त्रांसह आत्मसमर्पण केले.

11 Maoists surrender in Gadchiroli; Lay down arms in the presence of Director General Rashmi Shukla
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : दंडकारण्यात माओवादी संघटनेला गडचिरोली पोलिसांनी बुधवारी (१० डिसेंबर) आणखी एक मोठा हादरा दिला. पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या उपस्थितीत एकूण ११ जहाल माओवादींनी शस्त्रांसह आत्मसमर्पण केले. आत्मसमर्पण करणाऱ्यांवर राज्य शासनाने एकूण ८२ लाखांचे बक्षीस जाहीर केले होते. या ११ माओवाद्यांत चार महिला असून, तीन दाम्पत्याचा समावेश आहे.
या माओवादींत २ डिव्हिजनल कमिटी सदस्य, ३ प्लाटून कमिटी सदस्य, २ एरिया कमिटी सदस्य आणि ४ सक्रिय सदस्यांचा समावेश आहे. चार माओवादी आत्मसमर्पणाच्या वेळी माओवादी गणवेशात होते. अपर पोलिस महासंचालक (विशेष कृती) डॉ. छेरिंग दोरजे, उपमहानिरीक्षक अंकित गोयल, सीआरपीएफचे उपमहानिरीक्षक अजय शर्मा, पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अपर अधीक्षक एम. रमेश व कार्तिक मधिरा, उपअधीक्षक विशाल नागरगोजे आदी यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमात पोलिस महासंचालक शुक्ला म्हणाल्या, दंडकारण्यात शांतता प्रस्थापित करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. उर्वरित माओवाद्यांनीही मुख्य प्रवाहात सामील व्हावे. प्रास्ताविक पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी केले, तर आभार अपर अधीक्षक एम. रमेश यांनी मानले.
आत्मसमर्पण करणाऱ्यांत यांचा आहे समावेश
आत्मसमर्पण करणाऱ्यांमध्ये भामरागड, बस्तर व एओबी क्षेत्रात काम पाहणाऱ्या महत्त्वाच्या कॅडरचा समावेश आहे.
त्यात डीव्हीसीएम रमेश ऊर्फ भीमा लेकामी, किरण हिडमा, पीपीसीएम लक्की अडमा, रतन ओयाम, कमला वेलादी, एसीएम कुमारी वेलादी, रामजी पुंगाटी, सोनू पोडीयाम, प्रकाश पुंगाटी, सीता पल्लो, साईनाथ मडे या माओवाद्यांचा समावेश आहे.
६७ लाख रुपये पुनर्वसनासाठी या सर्वांना आत्मसमर्पण केल्यानंतर शासनाकडून मिळणार आहेत.