१०८ रूग्णवाहिकेने अनेकांना जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2018 01:22 AM2018-10-14T01:22:34+5:302018-10-14T01:24:56+5:30

अपघातस्थळी रूग्णवाहिका पोहोचवून संबंधित रूग्णाला रूग्णालयात पोहोचविण्यासाठी १०८ क्रमांकाच्या रूग्णवाहिकेची सेवा शासनाने सुरू केली आहे. गडचिरोली जिल्ह्यात एकूण १० रूग्णवाहिका आहेत. २०१४ ते २०१८ या कालावधीत ३८ हजार ९७८ रूग्णांना रूग्णालयात पोहोचविले आहे.

108 patients die for many | १०८ रूग्णवाहिकेने अनेकांना जीवदान

१०८ रूग्णवाहिकेने अनेकांना जीवदान

Next
ठळक मुद्देग्रामीण भागासाठी सोईचे : ३९ हजार रूग्णांना पोहोचविले रूग्णालयात, चार वर्षांपासून सेवा सुरू

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : अपघातस्थळी रूग्णवाहिका पोहोचवून संबंधित रूग्णाला रूग्णालयात पोहोचविण्यासाठी १०८ क्रमांकाच्या रूग्णवाहिकेची सेवा शासनाने सुरू केली आहे. गडचिरोली जिल्ह्यात एकूण १० रूग्णवाहिका आहेत. २०१४ ते २०१८ या कालावधीत ३८ हजार ९७८ रूग्णांना रूग्णालयात पोहोचविले आहे. वेळेवर रूग्णालयात पोहोचवून त्यांच्यावर उपचार झाल्याने यातील अनेकांना जीवदान मिळाले आहे.
ग्रामीण भागात चारचाकी वाहन उपलब्ध राहत नाही. त्यामुळे गावात एखादी अपघातात्मक घटना घडल्यास संबंधित रूग्णाला जवळपासच्या रूग्णालयात पोहोचविताना फार मोठी अडचण निर्माण होते. बऱ्याच वेळा वाहन मिळत नसल्याने रूग्णाचा मृत्यू सुध्दा होतो. अपघातात्मक घटना घडल्यानंतर सर्वप्रथम कमीत कमी कालावधीत त्या रूग्णावर उपचार होणे आवश्यक असते. मात्र वाहनाअभावी रूग्ण रूग्णालयापर्यंत पोहोचू शकत नाही. या सर्व बाबींची अडचण लक्षात घेऊन शासनाने १०८ क्रमांकाची रूग्णवाहिका सेवा देशभरात सुरू केली आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये वाहनांचा अभाव आहे. अशा स्थितीत १०८ क्रमांकाची रूग्णवाहिका अत्यंत महत्त्वाची सेवा बजावत आहे. अपघात झालेल्या व्यक्तीला रूग्णालयात पोहोचविण्याबरोबरच गरोदर माताना सुध्दा रूग्णालयात पोहोचविले जात असल्याने माता व बालमृत्यूचे प्रमाण कमी होण्यास मदत होते. १०८ क्रमांकाच्या रूग्णवाहिकेसोबत डॉक्टर उपलब्ध राहतो. त्यामुळे प्रवासादरम्यान संबंधित रूग्णाची वेळोवेळी तपासणी करण्याचे काम डॉक्टर करीत असतो.
रूग्णवाहिकेच्या सेवेची सुरूवात २०१४ मध्ये झाली. पहिल्या वर्षी १ हजार २६३ रूग्णांना पोहोचविण्यात आले. २०१५ मध्ये ४ हजार ३३ रूग्ण, २०१६ मध्ये ६ हजार ३८२ रूग्ण, २०१७ मध्ये १० हजार ९९१ व २०१८ मध्ये १७ हजार २०९ रूग्णांना रूग्णालयात पोहोचविण्यात आले आहे. २०१४ ते २०१८ मधील रूग्णवाहिकेने रूग्णालयात भरती केलेल्या रूग्णांच्या संख्येकडे नजर टाकल्यास दरवर्षी ही संख्या वाढत चालली असल्याचे दिसून येते.
यावरून १०८ क्रमांकाच्या रूग्णवाहिकेबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण झाली आहे. यापूर्वी गावखेड्यात कव्हरेज राहत नसल्याने १०८ क्रमांकाच्या रूग्णवाहिकेसाठी कॉल सेंटरला कॉल करण्यास अडचण निर्माण होत होती. मात्र ग्रामीण भागातही आता कव्हरेज प्राप्त झाले असल्याने १०८ क्रमांकाच्या रूग्णवाहिकेचा लाभ घेणाऱ्यांची संख्या वाढत चालली असल्याचे दिसून येते.
नऊ हजार गरोदर मातांना दिली सेवा
गडचिरोली जिल्ह्यात वाहनांची संख्या कमी आहे. त्यामुळे गरोदर मातांना रूग्णालयात पोहोचविण्यास फार मोठी अडचण निर्माण होत होती. परिणामी गरोदर मातांची घरीच प्रसुती केली जात होती. यामुळे मातामृत्यू व बालमृत्यूचे प्रमाण वाढले होते. मात्र १०८ क्रमांकाची रूग्णवाहिकेची सेवा उपलब्ध झाल्याने गावकरी गावातच १०८ क्रमांकाची रूग्णवाहिका बोलवितात. त्यानंतर संबंधित महिलेला तत्काळ नजीकच्या रूग्णालयात भरती केले जाते. २०१४ ते २०१८ या कालावधीत ९ हजार ११३ गरोदर महिलांना रूग्णालयात पोहोचविण्यात आले आहे. अपघातात जखमी झालेल्या २ हजार ९१० नागरिकांना रूग्णालयात पोहोचविले आहे. जळालेल्या १३४ नागरिकांना, पडलेल्या ७४६ नागरिकांना, विजेने जखमी झालेल्या ६४ इत्यादी ३८ हजार ९७८ रूग्णांना १०८ क्रमांकाच्या रूग्णवाहिकेने पोहोचविण्यात आले आहे.
जनजागृती वाढली
वाहनांवर व इतर ठिकाणीही अपघात झाल्यास १०८ क्रमांक डायल करा, असे लिहिले राहत असल्याने नागरिकांमध्ये १०८ क्रमांकाच्या रूग्णवाहिकेविषयी जनजागृती झाली असल्याचे दिसून येते.
रस्त्यांची अडचण कायम
१०८ क्रमांकाची रूग्णवाहिका उपलब्ध करून दिल्याने ग्रामीण भागातील नागरिकांसाठी फार सोयीचे झाले आहे. मात्र दुर्गम भागातील काही गावांमध्ये अजुनही रस्ते पोहोचले नाही. परिणामी गरोदर माता व इतर आजाराने जखमी असलेल्या व्यक्तीला रूग्णालयात भरती करणे शक्य होत नाही. बऱ्याचवेळा संबंधित रूग्णाला खाटेवर टाकून कित्येक दूरपर्यंत न्यावे लागते. यामध्ये बराचसा वेळ जाऊन संबंधित रूग्णांचा मृत्यू होतो. रस्त्याची समस्या अतिशय गंभ्ीर असून ती सोडविणे आवश्यक आहे.

Web Title: 108 patients die for many

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य