येनापूर बिटातील १०० टक्के विद्यार्थी प्रगत
By Admin | Updated: March 23, 2016 01:52 IST2016-03-23T01:52:46+5:302016-03-23T01:52:46+5:30
तालुक्यातील येनापूर बिटातील ५० शाळांमधील सर्वच ४ हजार ३५ विद्यार्थ्यांच्या त्या-त्या वर्गानुसार शैक्षणिक क्षमता

येनापूर बिटातील १०० टक्के विद्यार्थी प्रगत
चामोर्शी : तालुक्यातील येनापूर बिटातील ५० शाळांमधील सर्वच ४ हजार ३५ विद्यार्थ्यांच्या त्या-त्या वर्गानुसार शैक्षणिक क्षमता विकसित झाल्या असल्याने या बिटाला मंगळवारी १०० टक्के प्रगत बिट म्हणून घोषित करण्यात आले. १०० टक्के प्रगत असलेले हे जिल्ह्यातील पहिले बिट असून राज्यातील चवथे बिट आहे.
येनापूर बिटाअंतर्गत येणाऱ्या विठ्ठलपूर जिल्हा परिषदेच्या शाळेत कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमादरम्यान जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष जीवन नाट यांनी सदर बिट १०० टक्के प्रगत झाले असल्याची घोषणा केली. यावेळी अध्यक्षस्थानी जि. प. सदस्य संध्या दुधबळे होत्या. प्रमुख अतिथी म्हणून प्राथमिक शिक्षणाधिकारी माणिक साखरे, गटशिक्षणाधिकारी सहारे, शिक्षण विस्तार अधिकारी मारोती अलोणे, केंद्रप्रमुख पाचपुते, नंदनवार, वडेट्टीवार यांच्यासह शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना जीवन नाट यांनी कार्यक्रमापूर्वी आपण १८ मार्च रोजी मुधोली व विठ्ठलपूर येथील जिल्हा परिषद शाळांना भेट दिली. तेथील सर्वच विद्यार्थ्यांशी संवाद साधला असता, या शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक गुणवत्ता आढळून आली. हे विद्यार्थी कॉन्व्हेंटच्या विद्यार्थ्यांच्या तुलनेत कमी नसल्याचे दिसून आले. शाळेचा हा दर्जा कायमस्वरूपी ठेवण्यासाठी शिक्षकांनी प्रयत्न केला पाहिजे, जिल्ह्यासाठी ही अत्यंत अभिमानास्पद बाब आहे. इतर शाळांनी या बिटाचा आदर्श जोपासला पाहिजे, असे मार्गदर्शन केले. प्राथमिक शिक्षणाधिकारी माणिक साखरे यांनी मार्गदर्शन करताना प्रत्येक मुलगा प्रगत बनू शकते, त्यासाठी शिक्षक, केंद्रप्रमुख यांना आपण वेळोवेळी मार्गदर्शन करीत होतो. शिक्षक व विद्यार्थ्यांनी मेहनत घेतल्याने बिट प्रगत झाले आहे, असे मार्गदर्शन केले. (शहर प्रतिनिधी)
४येनापूर बिटाचे शिक्षण विस्तार अधिकारी मारोती अलोणे यांनी सातारा जिल्ह्यातील कुमठे व चंद्रपूर जिल्ह्यातील टाडाळी बिटाला भेट दिली. तेथील ज्ञानरचनावादाप्रमाणे होणारे अध्यापन पद्धती समजून घेतली. त्यानंतर बिटातील शिक्षकांच्या कार्यशाळा घेऊन त्यांना ज्ञानरचनावादाप्रमाणे अध्यापन करण्यासाठी मार्गदर्शन केले. त्यानुसार शाळांची रचना केली. शैक्षणिक साहित्यांची निर्मिती केली व त्यानुसार या सर्वच ५० शाळांमध्ये अध्यापन सुरू झाले. तीन महिन्यांमध्ये बिटातील संपूर्ण विद्यार्थी प्रगत झाले होते. या विद्यार्थ्यांना त्यांच्या वर्गाच्या पाठ्यपुस्तकातील भाषा वाचता, लिहिता येते, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार या सर्वच गणितीय क्रिया करता येतात. जिल्ह्यातील हे पहिले बिट व राज्यातील चवथे बिट ठरल्याने जिल्ह्यासह राज्यासाठी ते आदर्श ठरले आहे.
४या बिटात जिल्हा परिषदेच्या ३४ व खासगी व्यवस्थापनाच्या १६ अशा एकूण ५० शाळा आहेत. या सर्व शाळांमध्ये १ ते ८ पर्यंत ४ हजार ३५ विद्यार्थी आहेत. या ५० शाळांमध्ये ज्ञानरचनावादाप्रमाणे अध्यापन केले जात आहे.