गडचिरोलीत दीड महिन्यात आठ प्रकल्पांत १०० टक्के पाणीसाठा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2025 19:40 IST2025-07-14T19:33:32+5:302025-07-14T19:40:24+5:30

दिना धरण निम्मे भरण्याच्या स्थितीत : जिल्ह्यातील माजी मालगुजारी तलावही होताहेत तुडुंब

100 percent water storage in eight projects in Gadchiroli in one and a half months | गडचिरोलीत दीड महिन्यात आठ प्रकल्पांत १०० टक्के पाणीसाठा

100 percent water storage in eight projects in Gadchiroli in one and a half months

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली :
जिल्ह्यात यंदा १५ दिवस आधीच मोसमी नैर्ऋत्य पावसाचे आगमन झाले. यामुळे शेतकरी राजा लवकरच हंगामाला लागला. उन्हाळ्यात कोरडेठाक पडलेले सिंचन प्रकल्प व इतर जलस्रोतसुद्धा काही प्रमाणात पाण्याने भरले. सध्या जिल्ह्यातील आठ प्रकल्प १०० टक्के भरलेले आहेत, तर सात प्रकल्पांत निम्म्यापेक्षा अधिक जलसाठा आहे.


राज्यात मान्सूनचे लवकर आगमन झाल्याने जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासूनच जिल्ह्यात पावसाच्या सरी बरसल्या. तत्पूर्वी मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावल्याने अनेक शेतकऱ्यांनी पेरणीपूर्वी मशागतीची कामे आटोपली. जवळपास आठवडाभर उसंत दिल्याने शेतकऱ्यांनी हंगाम उरकला. त्यानंतर पुन्हा पावसाच्या सरी बरसू लागल्या. २० जूननंतर सातत्याने पाऊस पडत आहे. आतापर्यंत मुसळधार पाऊस आला नसला तरी संततधार पावसामुळे जिल्ह्यातील लघु प्रकल्प भरत आहेत. संततधार पावसामुळे पिकांनाही फायदा झाला. मात्र, नदीकाठालगतच्या शेतातील पिके मात्र तीन ते चार दिवस बुडून राहिल्याने सडलेली आहेत.


चामोर्शी तालुक्याच्या रेगडी येथील दिना धरणात सध्या ४१.२८ टक्के पाणीसाठा आहे. संततधार पावसामुळे येथे बऱ्याप्रमाणात पाणीसाठा आहे. याशिवाय वैनगंगा नदीवरील चिचडोह बॅरेजचे संपूर्ण दरवाजे उघडलेले आहेत. जिल्ह्यात मोठा व मध्यम प्रत्येकी एक प्रकल्प तर २४ लघु प्रकल्प आहेत.


४६९.५ मिमी सरासरी पाऊस १ जून ते १२ जुलै या कालावधीत जिल्ह्यात पडलेला आहे. याची टक्केवारी १२४.७ एवढी आहे. सर्वाधिक ६६२ मिमी पाऊस देसाईगंज तालुक्यात, तर सर्वात कमी १३०.८ मिमी पाऊस सिरोंचा तालुक्यात पडलेला आहे.


हे प्रकल्प भरले तुडुंब
पाटबंधारे विभागांतर्गत येणारे जिल्ह्यातील आठ लघु प्रकल्प तुडुंब भरलेले आहेत. यात येंगलखेडा, कोसरी लघु प्रकल्पासह चोप, विसोरा, वडेगाव, गडचिरोली, धानोरा, वडधा, आदी माजी मालगुजारी तलावांचा समावेश आहे.


ह्या प्रकल्पांमध्ये निम्माच पाणीसाठा
जिल्ह्यातील रावणवाडी, बोडधा, राजगट्टा, बोदली, आदी मामा तलावांमध्ये ५० टक्क्यांहून अधिक पाणीसाठा आहे. तळोधी मामा तलावात ४७.८५ टक्के, तर घोट, कसारी येथील मामा तलावात ७० टक्क्यांहून अधिक पाणीसाठा आहे. काही दिवसांतच हे तलाव १०० टक्के भरतील. दोन दिवसांपासून पावसाचा जोर ओसरला.


जिल्ह्यातील पाच प्रकल्पांमध्ये ३० टक्क्यांच्या आतच जलसाठा
चामोर्शी तालुक्यातील कुनघाडा, अनखोडा, मूलचेरा तालुक्यातील लगाम, येलगूर गडचिरोली तालुक्यातील हिरापूर, आदी पाच मामा तलावांमध्ये ३० टक्क्यांच्या आतच जलसाठा आहे.

Web Title: 100 percent water storage in eight projects in Gadchiroli in one and a half months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.