नक्षलग्रस्त भागात तयार होणार १०० ‘बेली ब्रिज’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2018 10:13 IST2018-12-15T10:11:42+5:302018-12-15T10:13:19+5:30

अविकसित आणि नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यातील गावांचा बारमाही संपर्क ठेवण्यात असलेली नदी व नाल्यांची अडचण दूर करण्यासाठी, १०० बेली ब्रिज (लोखंडी ढाच्याचे पूल) तयार केले जाणार आहेत.

100 'Belly Bridge' to be built in Naxal-affected areas | नक्षलग्रस्त भागात तयार होणार १०० ‘बेली ब्रिज’

नक्षलग्रस्त भागात तयार होणार १०० ‘बेली ब्रिज’

ठळक मुद्देगावांचा बारमाही संपर्क जुळणारअनेक वर्षांपासूनची समस्या होणार दूर

मनोज ताजने ।
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : अविकसित आणि नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यातील गावांचा बारमाही संपर्क ठेवण्यात असलेली नदी व नाल्यांची अडचण दूर करण्यासाठी, १०० बेली ब्रिज (लोखंडी ढाच्याचे पूल) तयार केले जाणार आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाने तयार होणाऱ्या या पुलांपैकी ७ पुलांना राज्य सरकारने पहिल्या टप्प्यात मंजुरी दिली आहे.
गडचिरोली जिल्ह्यात आजही अनेक गावांमध्ये जाण्यासाठी नावेने नदी-नाले ओलांडावे लागतात. पावसाळ्याच्या दिवसात तर नावेने जाणेही शक्य नसल्यामुळे शेकडो गावांचा अनेक दिवसपर्यंत संपर्क तुटतो. अशा स्थितीत त्या गावांना आरोग्यासह अनेक प्रकारच्या अडचणींना तोंड द्यावे लागते. मार्गातील नदी-नाल्यांवर पूल तयार करण्याचा प्रयत्न बांधकाम विभागाने अनेक वेळा केला, पण नक्षलदृष्ट्या अतिसंवेदनशिल भाग असल्यामुळे कंत्राटदार हे काम घेण्यास धजावत नाहीत. कोणी हिंमत केलीच तर त्यांचे साहित्य जाळण्यापासून जिवे मारण्यापर्यंतच्या घटना जिल्ह्यात घडल्या आहेत. यावर उपाय म्हणून अत्यंत कमी कालावधीत तयार होणारे बेली ब्रिज तयार करण्यास शासनाने मंजुरी दिली. या प्रकारच्या १०० पुलांचे प्रस्ताव पाठविण्यास राज्य शासनाने सूचविले होते. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाने आवश्यक असलेल्या संवेदनशिल भागातील पुलांचे प्रस्ताव पाठविले. त्यापैकी अहेरी, एटापल्ली, भामरागड आणि चामोर्शी तालुक्यातील ७ पुलांना पहिल्या टप्प्यात मंजुरी मिळाली आहे. त्यांचे अंदाजपत्रक तयार करण्याचे काम सुरू झाले आहे.

असे असतात बेली ब्रिज
संपूर्ण लोखंडी साहित्यापासून तयार होणाऱ्या या पुलाचा रेडिमेड लोखंडी ढाचा तयार करून नंतर तो नदी-नाल्यावर आणून बसविला जातो. यामुळे पूल बांधकामासाठी लागणारा वेळ वाचून नक्षलवाद्यांना विध्वंसक कृत्य करून पुलाच्या बांधकामात अडथळे आणण्याची संधी मिळत नाही. या पुलांच्या उभारणीचा खर्च सिमेंट क्राँक्रिटच्या पुलापेक्षा जास्त असतो.

पावसाळ्यापूर्वी सर्व पूल उभारण्याचे उद्दीष्ट
विदर्भात पहिल्यांदाच अशा पद्धतीने बेली ब्रिजची उभारणी होणार आहे. पुढील वर्षीच्या पावसाळ्यापूर्वी (जून २०१९) गडचिरोली जिल्ह्यातील सर्व प्रस्तावित पूल उभारण्याचे उद्दीष्ट राज्य शासनाने नजरेसमोर ठेवले आहे. सरकारी कंपनी ‘जीएसआरई’मार्फत हे काम केले जाण्याची शक्यता आहे.

Web Title: 100 'Belly Bridge' to be built in Naxal-affected areas

टॅग्स :Governmentसरकार