रोनाल्डो, मेस्सी यांना ठार करू; आयसिसची धमकी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2018 20:32 IST2018-05-17T20:32:01+5:302018-05-17T20:32:01+5:30
स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तीयानो रोनाल्डो आणि लियोनेल मेस्सी यांचं शीर धडावेगळं करू, अशी धमकी आयसिस दिली आहे.

रोनाल्डो, मेस्सी यांना ठार करू; आयसिसची धमकी
रशियात होणाऱ्या 21 व्या फिफा फुटबॉल वर्ल्डकपची तयारी जोरात सुरू आहे. मात्र या स्पर्धेवर आयसिसच्या हल्ल्याचं सावट आहे. स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तीयानो रोनाल्डो आणि लियोनेल मेस्सी यांचं शीर धडावेगळं करू, अशी धमकी आयसिस दिली आहे. आयसिसनं त्यांच्या लोन वुल्फ दाहशतवाद्यांकडे या हल्ल्याची जबाबदारी सोपवली आहे. एकट्यानं हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना लोन वुल्फ म्हटलं जातं.
दहशतवादी संघटना आयसिसनं याविषयी काही छायाचित्रं प्रसिद्ध केलीे आहेत. फोटोशॉप केलेल्या या छायाचित्रांमध्ये दहशतवाद्यांनी रोनाल्डो आणि मेस्सीला पकडल्याचं दाखवण्यात आलं आहे. 'यांच्या रक्तानं मैदान रंगवून टाकू', अशी धमकी या छायाचित्रांसोबत देण्यात आली आहे. या छायाचित्रांमध्ये मेस्सीच्या डोळ्यातून रक्ताचे अश्रू निघत असल्याचं दाखवण्यात आलं आहे. पोस्टरमध्ये मेस्सीला गजाआड दाखवलं गेलं आहे. 'तुम्ही एका अशा संघटनेशी लढत आहात, ज्यांच्या शब्दकोशात अपयश हा शब्दच नाही,' असा संदेश छायाचित्रातून देण्यात आला आहे.
आयसिसनं ही पोस्टर्स प्रसिद्ध केल्यानंतर फुटबॉल विश्वात खळबळ माजली आहे. वफा मीडिया फाऊंडेशनकडून ही छायाचित्रं प्रसिद्ध करण्यात आल्याचं सांगितलं जातं आहे. वफा मीडिया फाउंडेशनला आयसिसचं मुखपत्र मानलं जातं. 14 जूनपासून फिफा वर्ल्डकपला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेचा पहिला सामना मॉस्कोतील लुजनिकी स्टेडियमवर होणार आहे. 14 जून ते 15 जुलै या कालावधीत फिफा वर्ल्ड कप खेळवला जाईल. यामध्ये 32 संघ सहभागी होणार आहेत. रशियाला पहिल्यांदाच या स्पर्धेचं यजमानपद देण्यात आलं आहे.