सुपरस्टार ख्रिस्तियानो रोनाल्डोची विश्वविक्रमी ‘किक’; विश्वचषक पात्रता फेरीत केले सर्वाधिक गोल
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2025 05:49 IST2025-10-16T05:48:59+5:302025-10-16T05:49:10+5:30
रोनाल्डोने पहिल्या सत्रातील अतिरिक्त वेळेत आणखी एक गोल करून आपला विश्वविक्रम ४१ गोलांपर्यंत नेला.

सुपरस्टार ख्रिस्तियानो रोनाल्डोची विश्वविक्रमी ‘किक’; विश्वचषक पात्रता फेरीत केले सर्वाधिक गोल
लिस्बन : पोर्तुगालचा सुपरस्टार फुटबाॅलपटू ४० वर्षीय ख्रिस्तियानो रोनाल्डो याने मंगळवारी हंगेरीविरुद्ध २-२ अशी बरोबरी साधलेल्या सामन्यात दोन गोल करत फिफा विश्वचषक पात्रता फेरीत सर्वाधिक गोल करणारा खेळाडूचा मान मिळवला. २२व्या मिनिटाला जपहिला गोल हा रोनाल्डोचा विश्वचषक पात्रता फेरीतील ४०वा गोल ठरला. यासह त्याने ग्वाटेमालाचा माजी खेळाडू कार्लोस रूईझचा विश्वविक्रम मोडला.
रोनाल्डोने पहिल्या सत्रातील अतिरिक्त वेळेत आणखी एक गोल करून आपला विश्वविक्रम ४१ गोलांपर्यंत नेला. त्याने आतापर्यंत ५० विश्वचषक पात्रता सामने खेळले आहेत. त्याचप्रमाणे, रोनाल्डोच्या नावावर आता पुरुष आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये विश्वविक्रमी १४३ गोल झाले आहेत.
रोनाल्डो हंगेरीविरूद्ध ७८व्या मिनिटाला मैदानाबाहेर गेला. यावेळी, पोर्तुगाल संघ २-१ असा आघाडीवर होता. ही संधी साधलेल्या हंगेरीच्या डॉमिनिक सोबोझलायने अतिरिक्त वेळेत केलेल्या गोलच्या जोरावर हा सामना बरोबरीत आणला. ही बरोबरी अखेरपर्यंत कायम राहिली. यामुळे पोर्तुगालला विश्वचषकासाठी पात्रता अद्याप निश्चित करता आली नाही.
मेस्सीचीही विक्रमी कामगिरी
अर्जेंटिनाने चेज स्टेडियममध्ये प्युर्टो रिकोचा ६-० असा धुव्वा उडवला. या सामन्यात स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीने दोन गोलसाठी साहाय्य (असिस्ट) करत ऐतिहासिक विक्रम आपल्या नावावर केला. अद्भुत कौशल्य आणि विक्रमी कामगिरीसाठी प्रसिद्ध असलेला मेस्सी आता पुरुष आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये सर्वाधिक असिस्ट करणारा खेळाडू बनला आहे. प्युर्टो रिकोविरुद्धच्या दोन असिस्टसह त्याच्या आंतरराष्ट्रीय असिस्टची संख्या ६० वर पोहोचली आहे. त्याने ब्राझिलच्या नेमार आणि अमेरिकेचा लँडन डोनोव्हन (दोघांचेही प्रत्येकी ५८ असिस्ट) यांना मागे टाकले आहे. मेस्सीने आपल्या संपूर्ण व्यावसायिक कारकिर्दीत ३९७ असिस्ट केले असून लवकरच तो ४००चा जादुई आकडा गाठेल, असा विश्वास चाहत्यांमध्ये व्यक्त होत आहे.