FIFA Football World Cup 2018 : मेस्सी-रोनाल्डोवरून वादाचा स्फोट, पतीने दिला पत्नीला घटस्फोट
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2018 21:03 IST2018-07-04T21:03:37+5:302018-07-04T21:03:47+5:30
लिओनेल मेस्सी आणि ख्रिस्तियानो रोनाल्डो यांच्यात सर्वोत्तम खेळाडू कोण, हा वाद जवळपास दशकापासून सुरू आहे. त्यात या दोन्ही खेळाडूंनी विश्वचषक वगळता क्लब आणि राष्ट्रीय संघासाठी बहुतांशी जेतेपद जिंकलेली आहेत. त्यामुळे यांच्यातील श्रेष्ठत्वाचा वाद कायम होतच राहणार.

FIFA Football World Cup 2018 : मेस्सी-रोनाल्डोवरून वादाचा स्फोट, पतीने दिला पत्नीला घटस्फोट
मॉस्को - लिओनेल मेस्सी आणि ख्रिस्तियानो रोनाल्डो यांच्यात सर्वोत्तम खेळाडू कोण, हा वाद जवळपास दशकापासून सुरू आहे. त्यात या दोन्ही खेळाडूंनी विश्वचषक वगळता क्लब आणि राष्ट्रीय संघासाठी बहुतांशी जेतेपद जिंकलेली आहेत. त्यामुळे यांच्यातील श्रेष्ठत्वाचा वाद कायम होतच राहणार. जोपर्यंत एखाद्याचा चाहता टोकाची भुमिका घेत नाही तोपर्यंत या वादावर पडदा पडत नाही. मेस्सी-रोनाल्डोवरून झालेल्या अशाच एका वादावरून रशियात एका जोडप्याचे विकोपाचे भांडण झाले आणि त्यांनी चक्क घटस्फोटाचा निर्णय घेतला.
रशियातील या जोडप्यात पती हा अर्जेंटिनाच्या मेस्सीचा, तर पत्नी पोर्तुगालच्या रोनाल्डोची चाहती. आर्सेन आणि ल्युडमिला अशी या पती-पत्नीची अनुक्रमे नावं. नायजेरियाविरूद्धच्या मेस्सीच्या कामगिरीनंतर आर्सेनला आनंद गगनात मावेनासा झाला आणि हे ल्युडमिलाला पाहावले नाही. तिने त्वरित आइसलँडविरूद्ध मेस्सीला पेनल्टी स्पॉट किकवर आलेल्या अपयशाची आठवण करून दिली. त्यावर भडकलेल्या आर्सेनने रोनाल्डोच्या कामगिरीवर हल्ला चढवला. त्यानेही रोनाल्डोला इराणविरूद्ध आलेल्या अपयशावरून ल्युडमिलाची टिंगल उडवली.
हा वाद प्रचंड विकोपाला गेला. दुस-या दिवशी सकाळीच हे जोडपे येथील कोर्टात गेले अन् त्यांनी घटस्फोटासाठी रितसर अर्ज केला. 2002च्या विश्वचषक स्पर्धेचा सामना बारमध्ये बसून पाहत असताना ही दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले होते आणि 2018च्या विश्वचषक स्पर्धेत ते विभक्त होत आहेत. अर्जेंटिना आणि पोर्तुगाल यांचे स्पर्धेतील आव्हान बाद फेरीत संपुष्टाल आले आहे.