FIFA Football World Cup 2018 : दक्षिण अमेरिकेवर पुन्हा युरोपची ‘पेनल्टी’
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2018 09:00 IST2018-07-06T09:00:00+5:302018-07-06T09:00:00+5:30
आठपैकी सहा संघ युरोपातील असल्याने जागतिक फुटबॉलवर वर्चस्व असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध करीत दक्षिण अमेरिकेवर युरोपंच भारी ठरला आहे.

FIFA Football World Cup 2018 : दक्षिण अमेरिकेवर पुन्हा युरोपची ‘पेनल्टी’
चिन्मय काळे : जगातील सर्वात लोकप्रिय फुटबॉल विश्वचषक कोण जिंकणार, याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. अंतिम आठ संघ शुक्रवारपासून झुंज देण्यास सज्ज आहेत. पण या आठपैकी सहा संघ युरोपातील असल्याने जागतिक फुटबॉलवर वर्चस्व असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध करीत दक्षिण अमेरिकेवर युरोपंच भारी ठरला आहे.
फुटबॉल विश्वचषकावर आजवर निवडक देशांचेच कायम वर्चस्व राहीले आहेत. युरोपातील जर्मनी, इटली, नेदरलॅण्ड्स, स्पेन, पोर्तुगाल, फ्रान्स, इंग्लंड हे संघ विश्वचषकातील संभाव्य दावेदार असतात. या संघांना लढा देण्याची हिंमत केवळ ब्राझील व अर्जेंटीना हेच दाखवतात. यंदा इटली, नेदरलॅण्ड्सचे संघ स्पर्धेत पात्र झाले नाहीत. दक्षिण अमेरिकेतील मेक्सिकोच्या पहिल्याच फटक्याने गारद झालेला जर्मनीसारखा बलाढ्य संघ साखळीतून मायदेशी परतला. यजमान असल्याने दमदार आत्मविश्वासाने खेळणाऱ्या रशियाने स्पेनला घरी धाडले. सुमारे ३० वर्षे फारशी चमक दाखवू न शकलेल्या दक्षिण अमेरिकन उरूग्वेने पोर्तुगालवर तंत्रशुद्ध खेळाने मात केली. यामुळे हा विश्वचषक दरवेळेप्रमाणे न राहत युरोपपेक्षा दक्षिण अमेरिकन देशांसाठी अधिक सरस असेल, असे वाटत असताना स्वीडन, बेल्जियमसारख्या देशांनी अनपेक्षित मुसंडी मारुन युरोपाचे वर्चस्व स्पर्धेत जीवंत ठेवले आहे.
फुटबॉल विश्वचषकात साखळी फेरीनंतर अंतिम १६ संघांमध्ये एरवी १२ संघ युरोपाचे असत. एक आफ्रिकेतील, एखादा संघ आशियातील व दक्षिण अमेरिकन चार संघ बाद फेरीपर्यंत मजल मारत होते. यंदा स्थिती वेगळी होती. आफ्रिकेतील दोन महत्त्वाच्या संघाचे आव्हान अर्जेंटीना व कोलंबिया या संघांनी संपुष्टात आणले. जपान आशियाचे एकमात्र प्रतिनिधीत्त्व होते. युरोपातील दहा व दक्षिण अमेरिकेसह त्या क्षेत्रातील पाच संघ अंतिम १६ संघांच्या बाद फेरीत होते. पण ही फेरी संपली आणि दक्षिण अमेरिकन संघांचे प्रतिनिधीत्त्व अवघ्या दोनवर आले. यापैकी अर्जेंटीना आणि कोलंबियाचा पराभव युरोपियन संघांनीच केला. मेक्सिकोला युरोपियन स्वीत्झर्लंडचा पराभव करण्याची संधी होती. पण साखळी फेरीच्या अखेरच्या सामन्यात त्यांनी युरोपियन स्वीडनकडून अनपेक्षितपणे ३-० ने मार खाल्ला. त्यामुळे ते गुण तालिकेत दुसºया स्थानी फेकले गेले व उप उपांत्य फेरीत (१६ संघांच्या सामन्यात) त्यांना ब्राझीलशी भीडावे लागले. एका दक्षिण अमेरिकन संघाने दुसºया दक्षिण अमेरिकन क्षेत्रातील संघाचा पराभव केला. यामुळे ब्राझील आणि अर्जेंटीना हे दोनच संघ युरोपियन देशांना लढा देत असल्याचे एरवीचे चित्र यंदाही कायम आहे. केवळ अर्जेंटीनाची जागा उरुग्वेने घेतली. एवढाच बदल झाला.
मेक्सिको, कोलंबिया अथवा यंदा पात्र न ठरलेले इक्वेडोर, पॅराग्वे, चीली हे संघ दरवर्षी उप उपांत्य फेरीपर्यंत पोहोचतातच. पण अनेकदा त्यांचा सामना त्या फेरीत जर्मनी, इटली, नेदरलॅण्ड्स, स्पेन अशा बलाढ्य युरोपियन संघांशी होतो. तिथून त्यांना परतावे लागते. यंदा वरीलपैकी कुठलाच संघ दक्षिण अमेरिकेच्या थेट लढतीत नव्हता. पण युरोपातील परंपरागत बलाढ्य संघाखेरीज अन्य संघांनी दक्षिण अमेरिकन संघांना बाहेर केल्याने फुटबॉलवरील युरोपाचे वर्चस्व कायम राहीले आहे.
युरोपाच ‘सक्सेस रेट’ अधिकच
विश्वचषकात यजमान रशियासह युरोपातील १४ व दक्षिण अमेरिका परिसरातील ८ संघ पात्र झाले. युरोपातील १० संघ अर्थात ७१ टक्के देश बाद फेरीत जाण्यास यशस्वी ठरले. तर दक्षिण अमेरिका क्षेत्रातील ५ संघ अर्थात ६२ टक्के देश अंतिम १६ संघांच्या बाद फेरीत आले. पण बाद फेरीनंतर उपांत्यपूर्व फेरीत जातानाही युरोपाचाच ‘सक्सेस रेट’ अधिक राहीला. ५ पैकी ४० टक्के (२ संघ) दक्षिण अमेरिकन तर १० पैकी ६० टक्के (६ संघ) युरोपियन संघ पुढील फेरीत दाखल झाले.