कोपा अमेरिका फुटबॉल; ब्राझीलचा सलग तिसरा विजय

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2021 08:00 IST2021-06-25T08:00:31+5:302021-06-25T08:00:48+5:30

सामन्यात तीन शानदार गोल पाहण्यास मिळाल्याने फुटबॉलप्रेमींसाठी ही लढत पैसा वसूल ठरली.

Copa America football; Brazil's third consecutive victory | कोपा अमेरिका फुटबॉल; ब्राझीलचा सलग तिसरा विजय

कोपा अमेरिका फुटबॉल; ब्राझीलचा सलग तिसरा विजय

साओ पावलो : गतविजेत्या आणि यजमान ब्राझीलने शानदार खेळ करताना बलाढ्य कोलंबियाला २-१ असे नमवले. कोपा अमेरिकाफुटबॉल स्पर्धेत याआधीच बाद फेरी निश्चित केलेल्या ब्राझीलने यासह स्पर्धेतील सलग तिसरा सामना जिंकला. ब्राझीलचा अद्याप एक साखळी सामना बाकी आहे. या सामन्यात तीन शानदार गोल पाहण्यास मिळाल्याने फुटबॉलप्रेमींसाठी ही लढत पैसा वसूल ठरली.

जुआन कुआड्राडोच्या क्रॉसवर लुईस डियाजने दहाव्याच मिनिटाला अप्रतिम गोल करत कोलंबियाला १-० अशी आघाडी मिळवून दिली.
मात्र, ब्राझीलने शांतपणे खेळ करत कोलंबियाच्या बचावफळीचा अंदाज घेतला. पहिल्या सत्रात कोलंबियाने आघाडी राखली खरी, मात्र दुसऱ्या सत्रात ब्राझीलचा धडाकेबाज खेळ बहरला. 

७८ व्या मिनिटाला शानदार चाल केलेल्या ब्राझीलच्या लुकास पाकेटा याने चेंडू रेनान लोडीकडे पास केला आणि त्याने केलेल्या क्रॉसवर रॉबर्टो फर्मिनोने हेडर करीत गोल केला. यानंतर ब्राझीलने आक्रमक पवित्रा घेतला. निर्धारीत वेळेत बरोबरी कायम राहिल्यानंतर अतिरिक्त वेळेत केसमिरोने गोल करीत ब्राझीलच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. याआधीच्या सामन्यात पेरू व इक्वाडोर यांची लढत २-२ अशी बरोबरीत सुटली.

Web Title: Copa America football; Brazil's third consecutive victory