मिसळच्या तिखट-जाळ स्वादानं जगाला साद !

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 10:49 IST2025-06-13T10:48:56+5:302025-06-13T10:49:11+5:30

Food: नाश्त्याला तुम्हाला सर्वाधिक काय आवडतं? किंवा नाश्त्याला तुम्ही काय पसंत करता? - पोहे, उपमा, शिरा, मिसळ, पराठे, छोले भटुरे, इडली, डोसा?.. हे झालं आपल्याकडचं? पण जगाचा विचार केला तर लोकांना नाश्त्याला सर्वाधिक कोणता पदार्थ आवडत असेल?

The world is enchanted by the spicy-hot taste of misal! | मिसळच्या तिखट-जाळ स्वादानं जगाला साद !

मिसळच्या तिखट-जाळ स्वादानं जगाला साद !

नाश्त्याला तुम्हाला सर्वाधिक काय आवडतं? किंवा नाश्त्याला तुम्ही काय पसंत करता? - पोहे, उपमा, शिरा, मिसळ, पराठे, छोले भटुरे, इडली, डोसा?.. हे झालं आपल्याकडचं? पण जगाचा विचार केला तर लोकांना नाश्त्याला सर्वाधिक कोणता पदार्थ आवडत असेल? ‘टेस्ट ॲटलास’ या ग्लोबल फूड ॲण्ड ट्रॅव्हल गाइडनं जगात लोकांना सर्वाधिक पसंत असणाऱ्या नाश्त्याच्या ५० पदार्थांची यादी नुकतीच जाहीर केली आहे. त्यात तुर्कीच्या ‘कहवाल्टी’ या पदार्थानं पहिला आणि सर्बियाच्या ‘कॉम्प्लेट लेपिन्जा’ या पदार्थानं दुसरा क्रमांक पटकावला असला तरी भारतीय पदार्थही त्यात मागे नाहीत.

नाशिकची मिसळ सर्वांत भारी की कोल्हापूरची की पुण्याची की नगरची की तुमच्या गल्लीतल्या कोपऱ्यावरच्या अमक्या-तमक्याची?.. यावरून आपण भलेही प्रेमानं भांडत असू, पण शेवटी मिसळ ती मिसळ.. आपल्या सर्वांनाच कुठली ना कुठली मिसळ प्यारी असली तरी जगात मात्र एकूणच अनेकांना नाश्त्यासाठी मिसळ फारच प्यारी आहे. मिसळनं जगात नाव कमावलं आहे. नाश्त्यासाठी जगातील सर्वोत्तम ५० पदार्थांच्या यादीत मिसळनं १८ वा क्रमांक मिळविला आहे.

पराठे आणि छोले भटुरे हेदेखील भारतामध्ये नाश्त्यासाठी अत्यंत प्रिय असलेले पदार्थ आहेत. अर्थातच त्यांनीही या यादीत आपलं स्थान पटकावलं आहे. या यादीत (मूळ) पंजाबी पराठे आहेत २३व्या क्रमांकावर तर दिल्लीच्या छोले भटुऱ्यांनीही ३२वा क्रमांक पटकावला आहे. यामध्ये नुसत्या लोकप्रियतेचाच नाही, तर कोणते पदार्थ त्यातल्या त्यात अधिक पौष्टिक आहेत, याचाही विचार करण्यात आला आहे. प्रोटीन आणि पॉवरफूल टेस्ट.. खवय्यांच्या तोंडाला पाणी सोडणारा हा झणझणीत मामला सरस ठरला नसता तरच नवल!
अर्थात या यादीत इडली आणि डोसे यांचा नंबर कसा लागला नाही यावरून अनेकांनी आश्चर्य आणि खेद व्यक्त केला असला तरी झणझणीत मिसळच्या तिखट-जाळ स्वादाला मात्र त्यांनीही पसंतीच दर्शविली आहे.

Web Title: The world is enchanted by the spicy-hot taste of misal!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.