Food: मुघल रसोईतील काजू कतलीचं रहस्य!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2021 05:32 IST2021-07-31T05:31:58+5:302021-07-31T05:32:45+5:30
Food: सोळाव्या-सतराव्या शतकात गोव्यात, केरळात काजूच्या बागा फुलल्या. लवकरच काजू निर्यातदेखील होऊ लागला. त्या काळात दिल्लीची सत्ता होती मुघलांकडे. पोर्तुगीज आणि दिल्लीकरांचे व्यापारी संबंध बऱ्यापैकी सलोख्याचे असल्याने काजू दिल्ली दरबारात जाऊन पोहोचला असावा.

Food: मुघल रसोईतील काजू कतलीचं रहस्य!
- मेघना सामंत,
(लेखिका खाद्यसंस्कृतीच्या अभ्यासक आहेत.)
सोळाव्या-सतराव्या शतकात गोव्यात, केरळात काजूच्या बागा फुलल्या. लवकरच काजू निर्यातदेखील होऊ लागला. त्या काळात दिल्लीची सत्ता होती मुघलांकडे. पोर्तुगीज आणि दिल्लीकरांचे व्यापारी संबंध बऱ्यापैकी सलोख्याचे असल्याने काजू दिल्ली दरबारात जाऊन पोहोचला असावा. तिथे अफगाणिस्तान, इराण इथून आणवलेले बदाम, पिस्ते मौजूद होतेच. त्यांना साथ देण्यासाठी काजूहून योग्य दुसरं कोण मिळणार? तर...
मुघलाईतल्या काजूची एक रंजक कहाणी सांगतात. अकबर बादशहाचा मुलगा जहांगीर (म्हणजेच अनारकलीचा सलीम) सत्तेवर असताना त्याचा शिखांचे गुरु हरगोबिंदसिंगजी यांच्यावर रोष झाला. त्याने त्यांना ग्वाल्हेर इथल्या किल्ल्यात डांबून ठेवलं. त्याच किल्ल्यात भारतातल्या ५२ छोट्याछोट्या राज्यांचे राजेही कैदेत ठेवले होते. जेमतेम बारा-चौदा वर्षांच्या हरगोबिंदसिंगजी यांनी त्या राजांना एकत्र आणलं, त्यांचं प्रबोधन केलं. त्यांच्यासोबत किल्ल्यात झाडं लावली, त्यांचं मन गुंतून राहील अशी कामं केली. पुढे जहांगीर बादशहा गुरुजींचं आदर्श कार्य बघून प्रभावित झाला आणि त्याने त्यांना सोडायचं ठरवलं. पण, हरगोबिंदसिंगांनी आपल्यासोबत अटकेत असलेल्या सगळ्या राजांनाही सोडून द्यायचा आग्रह धरला. तेव्हा जहांगीरने त्यांना एक विचित्र अट घातली. “तुम्ही स्वतः किल्ल्याच्या बाहेर पडत असताना तुम्हाला चिकटून जितकी माणसं येऊ शकतील, तितक्यांना बाहेर सोडलं जाईल!”- गुरुजीही कल्पक. त्यांनी भरपूर लांबीचा अंगरखा आणि त्याला सगळीकडून लांबलचक दोऱ्यांची झालर पक्की शिवून घेतली. हरगोबिंदसिंगजी जेव्हा किल्ल्याच्या बाहेर निघाले तेव्हा त्यांच्या अंगरख्याच्या एकेका दोऱ्याला लटकून सगळे बावन्न राजे एकदमच बाहेर पडले. सर्वांची सुटका झाली.
आता यात काजूचा काय संबंध? तर चकित झालेल्या जहांगीर बादशहाने गुरुजींच्या सन्मानार्थ मेजवानी ठेवली. तेव्हा शाही खानसाम्याने एक मिठाई खास घडवली... तीच काजू कतली (किंवा कतरी). चौकट आकाराची, मोतिया वर्णाची, चांदीचा वर्ख ल्यालेली, मोहमयी काजू कतली. काजू गोव्यात पिकत असले तरी काजू कतली तिथली नव्हे. काजूला शाही रूपात पेश करण्याचं श्रेय मुघलांच्या रसोईयाचं.
(askwhy.meghana@gmail.com)