Recipe of Chilli Thecha or Mirchi Thecha | मराठमोळा झणझणीत ठेचा जो देईल तुम्हाला गावची आठवण !
मराठमोळा झणझणीत ठेचा जो देईल तुम्हाला गावची आठवण !

पुणे : जेवण मिळमिळीत असेल किंवा काहीतरी तिखट आणि चटकदार खायची इच्छा झाली तर महाराष्ट्रीयन ठेच्याला पर्याय नाही. कमीत कमी पदार्थांमध्ये काही मिनिटांमध्ये तयार होणारा हा आपला मराठमोळा पदार्थ प्रत्येक घरात वेगवेगळ्या पद्धतीने केला जातो. त्यातलीच  ही एक रेसिपी. आम्हाला खात्री आहे हा पदार्थ सगळ्यांना आवडेल. 

साहित्य :

 • हिरव्या मिरच्या आठ ते दहा 
 • लसूण पाकळ्या दहा ते बारा 
 • मीठ चवीनुसार (खडे मीठ असल्यास उत्तम )
 • कोथिंबीर पाव वाटी 
 • तेल चार लहान चमचे 

 

कृती :

 • मिरच्यांचे दोन तुकडे करून घ्या. 
 • खोलगट तव्यावर (शक्यतो लोखंडी तवा घ्यावा, नसल्यास कढई चालेल) मिरच्या टाकाव्यात. 
 • दोन मिनिटात मिरच्या तडतडायला लागल्यावर त्यावर चमचाभर तेल आणि लसूण पाकळ्या टाकाव्यात. 
 • आता लसूण आणि मिरच्या परतल्यावर गॅस बंद करावा. 
 •  तवा गरम असताना चिमट्याने पकडून वाटी किंवा तांब्याच्या पृष्ठभागाने मिरच्या आणि लसूण ठेचून घ्यावेत. त्यात मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून पुन्हा एकत्र करावेत.  किंवा हे सर्व मिश्रण एकत्र करून दगडी ठेचणीवर बत्त्याच्या साहाय्याने ठेचून घ्या. किंवा तेही नसेल तर मिक्सरच्या भांड्यात कोथिंबीर सोडून बाकी पदार्थ एकदा फिरवून घ्या. हा ठेचा जाडसर असतो त्यामुळे सगळे पदार्थ बारीक करू नयेत. 
 • आता हे जाडसर असलेले मिश्रण एका वाटीत काढून त्यात कच्चे तेल घाला. आणि भाकरी, पोळी, रोटी किंवा वरण भाताला तोंडी लावण्याकरिता भन्नाट ठेचा तयार आहे. 
 • हा ठेचा चार ते पाच दिवस फ्रीजबाहेर टिकतो मात्र पाणी वापरू नये. 
 • जर हिरव्यागार मिरच्या खूप तिखट असतील तर पोपटी रंगाच्या काही कमी तिखट मिरच्या वापराव्यात. 
Web Title: Recipe of Chilli Thecha or Mirchi Thecha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.