उपवासाच्या दिवशीही पुरवा जिभेचे चोचले; उपवासाचा खमंग ढोकळा करेल मदत!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2018 13:41 IST2018-08-28T13:39:32+5:302018-08-28T13:41:23+5:30
श्रावण महिना आणि ढिगभर उपवास हे समिकरणच तयार झालं आहे. त्यामुळे उपवास करणाऱ्यांपुढे आज काय खायचं हा फार गंभीर प्रश्न असतो. रोज रोज येणारे उपवास यांमुळे घरात फराळी पदार्थांची लगबग सुरूच असते.

उपवासाच्या दिवशीही पुरवा जिभेचे चोचले; उपवासाचा खमंग ढोकळा करेल मदत!
श्रावण महिना आणि ढिगभर उपवास हे समिकरणच तयार झालं आहे. त्यामुळे उपवास करणाऱ्यांपुढे आज काय खायचं हा फार गंभीर प्रश्न असतो. रोज रोज येणारे उपवास यांमुळे घरात फराळी पदार्थांची लगबग सुरूच असते. त्यात खिचडी, उपवासाची पुरी भाजी किंवा मग बाजारात मिळणाऱ्या वेफर्स आणि लस्सी किंवा ज्यूसवर दिवस काढावा लागतो. अशातच उपवासाच्या दिवशी जर एखादा चमचमीत पदार्थ समोर आला तर जिभेला पाणी सुटणं हे सहाजिकचं आहे. त्यामुळे तुम्हाला जर उपवासही घडवायचा असेल आणि तुमच्या जिभेचे चोचलेही पुरवायचे असतील तर हा खमंग उपवासाचा ढोकळा तुम्ही नक्की ट्राय करू शकता. हा ढोकळा खाल्यानंतर तुम्ही उपवासाच्या दिवशीही जिभेचे लाड करू शकता.
साहित्य :
- वरईचे पीठ दीड वाटी
- अर्धा कप पाणी
- 3 ते 4 हिरव्या मिरच्या
- बारिक चिरलेली कोथिंबीर
- मीठ चवीनुसार
- चिमुटभर खाण्याचा सोडा
- आल्याचा किस (एक टी स्पून)
- जिरेपूड (अर्धा टी स्पून)
- आंबूस ताक दोन चमचे
- पाव चमचा लिंबाचा रस
कृती :
पीठ चाळणीने चाळून घ्या.
त्यामध्ये चवीनुसार मीठ, आल्याचा किस, जिरेपूड, वाटलेली मिरची, ताक आणि पाणी घाला.
मिश्रण एकजीव करून झाकून ठेवा.
अर्धा ते पाऊण तासाने लिंबाच्या रसात सोडा कालवा आणि एकत्र केलेल्या मिश्रणात घालून एकत्र करून घ्या.
प्रेशर कुरच्या भांड्याला आतून तुप लावून घ्या.
त्यामध्ये तयार मिश्रण ओतून कुकरमध्ये ठेवा.
कुकरच्या झाकणाची शिट्टी काढून ठेवा.
15 ते 20 मिनिटांत ढोकळा तयार होईल.
थोडा थंड झाल्यावर वड्या पाडून कोथिंबीर टाकून सर्व्ह करा.