हटके स्टाइल चॉकलेट समोसा या विकेंडसाठी ठरेल उत्तम पर्याय!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2019 14:03 IST2019-02-02T14:00:08+5:302019-02-02T14:03:01+5:30
भारतातील स्ट्रीट फूड्समध्ये प्रामुख्याने समावेश करण्यात येणारा एक पदार्थ म्हणजे समोसा. साधारणतः समोसा म्हटलं की, डोळ्यांसमोर येतो वरील कुरकुरीत आवरण आणि आतमध्ये बटाटा आणि वाटाण्यांचं भरण्यात आलेलं मिश्रण असलेला एक त्रिकोणी आकाराचा पदार्थ.

हटके स्टाइल चॉकलेट समोसा या विकेंडसाठी ठरेल उत्तम पर्याय!
भारतातील स्ट्रीट फूड्समध्ये प्रामुख्याने समावेश करण्यात येणारा एक पदार्थ म्हणजे समोसा. साधारणतः समोसा म्हटलं की, डोळ्यांसमोर येतो वरील कुरकुरीत आवरण आणि आतमध्ये बटाटा आणि वाटाण्यांचं भरण्यात आलेलं मिश्रण असलेला एक त्रिकोणी आकाराचा पदार्थ. समोसा हा तेलामध्ये डिप फ्राय करून तळण्यात येतो. त्यामुळे खाण्यासाठी अत्यंत चविष्ट लागतो. सध्या समोश्यांवर अनेक नवनवीन एक्सपरिमेंट होताना दिसून येत आहेत. अनेक वेगवेगळ्या फ्लेवर्सचे आणि प्रकारचे समोसे बाजारामध्ये उपलब्ध आहेत. तुम्ही घरच्या घरीही अगदी सोप्या पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारचे समोसे तयार करू शकता.
आज असाच काही हटके समोशाचा प्रकार आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, तो म्हणजे चॉकलेट समोसा. लहान मुलांनाच काय मोठ्यांच्याही तोंडाला पाणी सुटेल असा हा समोशाचा प्रकार अगदी सहज आणि झटपट होतो. साधारणतः समोसा म्हटलं की, थोडासा तिखट आणि चटपटीत चवीचा पण चॉकलेट समोशाचं तसं नाही हा तुम्ही डेझर्ट म्हणूनही सर्व्ह करू शकता. जाणून घेऊया घरच्या घरी चॉकलेट समोसा तयार करण्याची रेसिपी...
साहित्य :
- डार्क चॉकलेट - 250 ग्रॅम
- रोस्टेड बदाम - 125 ग्रॅम
- रोस्टेड काजू - 125 ग्रॅम
- रोस्टेड पिस्ता - 50 ग्रॅम
- साखर - 500 ग्रॅम
- गरम मसाला पाउडर
- रिफाइंड ऑइल गरजेनुसार
- पाणी आवश्यकतेनुसार
- पिठ 500 ग्रॅम
- तूप 3 ते 4 कप
- काळी वेलची 5 ग्रॅम
चॉकलेट समोसा तयार करण्याची रेसिपी :
- सर्वात आधी एका बाउलमध्ये पिठ, तूप आणि काळी वेलचीची पूड एकत्र करा. आवश्यकतेनुसार पाणी टाकून पिठ मळून घ्या.
- डार्क चॉकलेटचा बार घेऊन त्याचे छोटे तुकडे करून घ्या. त्यामध्ये काजू, बदाम आणि पिस्ता एकत्र करून मायक्रोवेव्हमध्ये वितळवून घ्या.
- पॅनमध्ये 2 कप पाणी गरम करून त्यामध्ये गरम मसाला आणि साखर टाकून तोपर्यंत शिजवून घ्या जोपर्यंत त्याचा घट्ट पाक तयार होत नाही. त्यानंतर गॅस बंद करा.
- आता तयार केलेल्या पिठाचा छोटासा गोळा घेऊन लाटून घ्या. त्यानंतर त्यामध्ये चॉकलेट स्टफिंग मिश्रण टाकून समोशाच्या आकारामध्ये बंद करून घ्या. अशाप्रकारे सर्व समोसे तयार करून घ्या.
- त्यानंतर एका पॅनमध्ये तेल गरम करून त्यामध्ये समोसे गोल्डन ब्राउन होईपर्यंत फ्राय करून घ्या.
- सर्व समोसे तळून घ्या, त्यानंतर थोडे थंड होऊ द्या आणि तयार कलेल्या पाकामध्ये डिप करा.
- तुमचा कुरकुरीत असा चॉकलेट समोसा तयार आहे.