अशा सुरळीच्या वड्या केल्या तर बिघडण्याचा प्रश्नच नाही !
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2018 20:33 IST2018-08-23T20:32:27+5:302018-08-23T20:33:43+5:30
आम्ही तुम्हाला इतकी सोपी सुरळीच्या वड्यांची रेसिपी देणार आहोत की, चुकणं तर लांबच पण तुम्ही त्यात एक्स्पर्ट व्हाल.

अशा सुरळीच्या वड्या केल्या तर बिघडण्याचा प्रश्नच नाही !
पुणे : सुरळीच्या वड्या नाव जितकं किचकट, तितकाच पदार्थही असं म्हटलं जात. पण थांबा, आम्ही तुम्हाला इतकी सोपी सुरळीच्या वड्यांची रेसिपी देणार आहोत की, चुकणं तर लांबच पण तुम्ही त्यात एक्स्पर्ट व्हाल. हलका, कमी तेलातला, चटपटीत पदार्थ नक्की ट्राय करा.
साहित्य :
- एक वाटी हरभरा डाळीचे पीठ (बेसन पीठ)
- एक वाटी मध्यम आंबट ताक
- एक वाटी पाणी
- एक लहान चमचा मैदा
- मीठ
- हळद
फोडणीसाठी :
- मोहरी
- तीळ
- कोथिंबीर
- कोथिंबीर
- मिरच्यांचे तुकडे
- तेल
- ओले खोबरे (आवडत असल्यास)
कृती :
- कुकरच्या भांड्यात एक वाटी डाळीचे पीठ,एक लहान चमचा मैदा ,एक वाटी आंबट ताक आणि एक वाटी पाणी गुठळ्या न करता एकत्र करा. मैद्यामुळे वड्या सहसा तुटत नाहीत. त्यात अर्धा लहान चमचा हळद आणि चवीनुसार मीठ घालून एकजीव करा.
- भाताप्रमाणे हा मिश्रणाच्या तीन शिट्ट्या घ्या.
- कुकर गार न होऊ देता शिट्टी वर उचलून वाफ काढा आणि ते भांड बाहेर काढा.
- स्टीलच्या ताटांना दोन्ही वाजून तेलाचा हात फिरवून घ्या. भांड्यातले मिश्रण गरम असतानाच पटीने ताटावर टाका. वाटीच्या पृष्ठभागाला तेल लावून मिश्रण एक सारखे आणि पातळ पसरवा.
- या वड्या करताना गरम मिश्रण पसरवणे हेच सर्वाधिक कौशल्याचे आहे. त्यामुळे फार पीठ एकदम तयार करू नये.
- ताटावरील मिश्रण गार झाल्यावर त्याच्या सुरीने उभ्या पट्ट्या कराव्यात.संबंधित पट्टी हलक्या हाताने गुंडाळून ठेवावी.
- फोडणीच्या भांड्यात तेल कडकडीत तापवून मोहरी घालावी. मोहरी तडतडल्यावर कढीपत्ता टाकावा. आवडतील तेवढे मिरच्यांचे मोठे तुकडे टाकून गॅस बंद करावा. त्यात तीळ, बारीक चिरलेली कोथिंबीर टाकावी. हे मिश्रण वड्यांवर पसरवावे. आवडत असल्यास ओले खोबरे टाकावे.