"रिक्षा चालकांना ३ महिन्याचा मराठी शिकण्याचा ऑनलाईन क्लास शासनाने कंपलसरी करावा"; 'हास्यजत्रा' फेम सचिन गोस्वामींची पोस्ट चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2026 12:36 IST2026-04-23T12:34:21+5:302026-04-23T12:36:55+5:30
मराठी भाषेचे ज्ञान नसलेल्या चालकांचे परवाने रद्द करण्यात येतील, असा इशारा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिला आहे. आता 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'चे दिग्दर्शक सचिन गोस्वामींनी सोशल मीडियावर पोस्ट लिहून याविषयी त्यांचं मत मांडलं आहे.

"रिक्षा चालकांना ३ महिन्याचा मराठी शिकण्याचा ऑनलाईन क्लास शासनाने कंपलसरी करावा"; 'हास्यजत्रा' फेम सचिन गोस्वामींची पोस्ट चर्चेत
येत्या १ मे, महाराष्ट्र दिनापासून परवानाधारक रिक्षा व टॅक्सी चालकांना मराठी भाषा येणे अनिवार्य करण्यात येणार आहे. याबाबत मोटार परिवहन विभागाच्या ५९ प्रादेशिक व उपप्रादेशिक कार्यालयांमार्फत परवाना तपासणी मोहीम राबविण्यात येणार असून संबंधित चालकांना मराठी लिहिता व वाचता येते का, याची पडताळणी केली जाणार आहे. मराठी भाषेचे ज्ञान नसलेल्या चालकांचे परवाने रद्द करण्यात येतील, असा इशारा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिला आहे. यासंबंधी अनेक रिक्षाचालकांनी नाराजी व्यक्त केली असून संपाचा इशारा दिला आहे. आता 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'चे दिग्दर्शक सचिन गोस्वामींनी सोशल मीडियावर पोस्ट लिहून याविषयी त्यांचं मत मांडलं आहे.
'महाराष्ट्राची हास्यजत्रा'चे दिग्दर्शक सचिन गोस्वामी लिहितात की, ''रिक्षा चालकांना तीन महिन्याचा व्यवहारउपयोगी मराठी शिकवण्याचा ऑनलाइन क्लास शासनाने तयार करून कंपलसरी करावा..तीन महिन्यांनी ऑनलाइन परीक्षा घेवून.पास झालेल्याचा रिक्षा परवाना कायम ठेवून,नापासना उत्तीर्ण होई पर्यंत परवाना निलंबित करावा.. हीच पद्धत परभाषिक भाजी विक्रेते,रस्त्यावरील विक्रेते यांच्यात ही राबवता येईल. आपण नागरिकांनी सुद्धा व्यवहारात ठामपणे फक्त मराठीच बोलावे भाषा संवर्धना साठी हे आवश्यक आहे.. महाराष्ट्रात मराठी आलं पाहिजे..''
अशाप्रकारे सचिन गोस्वामींनी केलेली पोस्ट चर्चेत आहे. सचिन गोस्वामी हे 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करताना दिसतात. दिग्दर्शक म्हणून ते गेली अनेक वर्ष 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'ची धुरा सांभाळताना दिसतात. सचिन अनेकदा सोशल मीडियाच्या माध्यमातून राजकीय आणि सामाजिक विषयावर पोस्ट लिहिताना दिसातात. सचिन यांनी शेअर केलेली ही परखड पोस्ट सध्या समाजमाध्यमांमध्ये चर्चेत आहे.