"मला त्या शब्दांची लाज वाटली...", श्रेया घोषालने 'चिकनी चमेली' सारखी गाणी न गाण्याचा घेतला निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2026 17:01 IST2026-03-04T17:01:22+5:302026-03-04T17:01:53+5:30
"चिकनी चमेली' हिट झाल्यानंतर मला अनेक गाण्यांच्या ऑफर्स आल्या, पण...

"मला त्या शब्दांची लाज वाटली...", श्रेया घोषालने 'चिकनी चमेली' सारखी गाणी न गाण्याचा घेतला निर्णय
आपल्या सुमधुर आवाजाने जगभरातील लोकांना प्रेमात पाडणारी गायिका श्रेया घोषाल सध्या तिच्या एका खळबळजनक खुलाशामुळे चर्चेत आली आहे. २०१२ मध्ये आलेल्या 'अग्निपथ' चित्रपटातील 'चिकनी चमेली' या सुपरहिट गाण्यावर श्रेयाने पहिल्यांदाच भाष्य केले असून, महिलांना ऑब्जेक्टिफाय करणाऱ्या गाण्यांबाबत तिने आपली रोखठोक भूमिका मांडली आहे.
श्रेया घोषालने नुकतंच राज शमानीच्या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली. यामध्ये श्रेयाने संगीत क्षेत्रातील तिच्या अनुभवांवर प्रकाश टाकला. ती म्हणाली, "चिकनी चमेली' हिट झाल्यानंतर मला अनेक गाण्यांच्या ऑफर्स आल्या, पण त्यातील शब्द अत्यंत विचित्र आणि महिलांना objectify करणारे होते. माझ्या एका संगीतकार मित्रानेच मला असे गाणे ऑफर केले होते ज्याचे बोल 'मला चिकन बनवून खा' किंवा 'मला असे पकडा' असे होते. केवळ त्या शब्दांचा विचार करूनच मला लाज वाटली आणि मी ते गाणे गाण्यास नम्रपणे नकार दिला."
'चिकनी चमेली'वर काय म्हणाली श्रेया?
'चिकनी चमेली' या गाण्याबाबत बोलताना श्रेया म्हणाली की, "ते गाणे केवळ एक डान्स नंबर नसून त्यात एक कलात्मकता (Artistry) देखील आहे. चित्रपटात जे व्हर्जन आले ते सुरुवातीच्या ड्राफ्ट्सपेक्षा बरेच सौम्य होते. त्यावेळी मी इतकी प्रगल्भ नव्हते की प्रत्येक ओळीचा सखोल अर्थ समजू शकेन. मात्र, आता मी गाणे रेकॉर्ड करताना खूप विचार करते. कारण एकदा गाणे हिट झाले की ते लहान मुलांसमोरही गावे लागते आणि अशा वेळी मला अस्वस्थ वाटते."
ट्रोलिंगला दिले चोख प्रत्युत्तर
ऑब्जेक्टिफिकेशनवर बोलता मग कॉन्सर्टमध्ये 'चिकनी चमेली' का गाता? असा प्रश्न विचारला असता तिने स्पष्ट केले की, "मला त्या गाण्याची लाज वाटत नाही. मी ते परफॉर्म केले आहे आणि मलाही ते गाणे आवडते. मी त्या गाण्याला नाकारू शकत नाही, कारण ते माझे गाणे आहे. पण भविष्यात मी तशा प्रकारची गाणी रेकॉर्ड करणार नाही, हे नक्की."
नवे गाणे आणि वर्ल्ड टूरची घोषणा
कामाबद्दल बोलायचे झाले तर, श्रेयाचे 'यही गुजार दू' हे नवीन गाणे नुकतेच प्रदर्शित झाले असून यात अमाल मलिकची साथ लाभली आहे. तसेच, श्रेयाने तिच्या 'द अनस्टॉपेबल वर्ल्ड टूर'ची घोषणा केली आहे. या टूर अंतर्गत ती भारत, अमेरिका, यूके आणि अबू धाबीमध्ये परफॉर्म करणार आहे. चाहते आता या कॉन्सर्टच्या तारखांची आतुरतेने वाट पाहत आहेत.