अब्बा, तुम्ही आणखी किती दिवस काम करणार? तैमूरने सैफला विचारला प्रश्न; अभिनेता म्हणाला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2026 13:34 IST2026-03-12T13:34:17+5:302026-03-12T13:34:54+5:30
वर्क लाइफ बॅलन्सवर सैफ अली खानचं भाष्य

अब्बा, तुम्ही आणखी किती दिवस काम करणार? तैमूरने सैफला विचारला प्रश्न; अभिनेता म्हणाला...
मनोरंजनविश्वातील कलाकारांना अनेकदा वर्क लाईफमधला समतोल साधणं कठीण जातं. इंडस्ट्रीत अनेक वर्षांपासून काम करणाऱ्या अभिनेता सैफ अली खानने नुकतंच यावर भाष्य केलं. तसंच आपल्याला सिस्टीममध्ये काय बदल करता येतील यावरही त्याने प्रतिक्रिया दिली. एकदा तर त्याला त्याच्या लेकानेच म्हणजे तैमूरनेच तो आणखी किती दिवस अभिनय करणार असं विचारलं. यावर सैफने त्याला काय उत्तर दिलं वाचा.
सैफने बहिणीच्या म्हणजेच सोहा अली खानच्या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली होती. तेव्हा सैफ म्हणाला,"मी सिनेक्षेत्रात आणखी किती दिवस काम करत राहणार? असं मला तैमूरने नुकतंच विचारलं होतं.' मी म्हणालो, 'माहित नाही.. जोपर्यंत करु शकतो तोवर करेन. कायमच करेन कारण हेच माझं काम आहे.' यावर तैमूरची प्रतिक्रिया 'नाहीsss' अशी होती."
यानंतर सोहा सैफला म्हणाली की शूटमुळे तुला बरेच दिवस घरापासून दूर राहावं लागतं. यावर सैफ म्हणाला, "हो पण आता त्यात काहीसा सुधार आला आहे. तुम्ही जर यशस्वी असाल तर तुम्हाला ते शक्य आहे. मी इंडस्ट्रीतील अशा काही लोकांची, सहकाऱ्यांची आणि मित्रांची नावं सांगू शकतो जे वर्क लाइफचा उत्तम समतोल साधतात. ते सकाळी ७ ला काम सुरु करतात. ९ वाजता कॅमेरा रोल होतो आणि दिवसभरात शक्य तितकं काम करतात. संध्याकाळी मुलं झोपण्याच्या आधीच घरी पोहोचतात. हे सर्व संतुलनावर अवलंबून असते जिथे एखादी व्यक्ती एक किंवा दोन महिने अत्यंत मेहनत घेऊन काम करते आणि त्यानंतर आपल्या आयुष्यातील सुखसोयी आणि कौटुंबिक शांतता टिकवून ठेवण्यासाठी काही काळ कामातून सुट्टी घेते. मी सुद्धा असाच समतोल राखण्याचा विचार करतो."
सैफ पुढे म्हणाला की, त्याने या संतुलनाचा विचार नेहमीच एखाद्या डोंगर चढाईच्या अनुभवाप्रमाणे केला आहे. डोंगर चढण्यासाठी एका चांगल्या 'बेस कॅम्प'ची गरज असते. पण जर एखादी व्यक्ती सतत डोंगरच चढत राहिली, तर तिथे कोणताही बेस कॅम्प उरणार नाही. त्यामुळे डोंगर चढण्याची आपली क्षमता टिकवून ठेवण्यासाठी त्या व्यक्तीने आपला बेस कॅम्प सांभाळणे अत्यंत आवश्यक आहे."