डेविड धवन अन् शाहरुखने उभ्या आयुष्यात केलं नाही एकत्र काम; 'ही' गोष्ट ठरली त्यामागचं कारण
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2026 10:11 IST2026-04-23T10:08:19+5:302026-04-23T10:11:05+5:30
David dhawan: डेविड धवन यांनी अनेक दिग्गजांसोबत काम केलं. मात्र, आजतागायत त्यांनी शाहरुख खानसोबत काम केलेलं नाही.

डेविड धवन अन् शाहरुखने उभ्या आयुष्यात केलं नाही एकत्र काम; 'ही' गोष्ट ठरली त्यामागचं कारण
बॉलिवूड फिल्ममेकर डेविड धवन सध्या त्यांच्या अपकमिंग 'हैं जवानी तो इश्क होना है' या सिनेमामुळे चर्चेत येत आहेत. हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्यामुळे त्याचं जोरदार प्रमोशन सुरु आहे. डेविड धवन यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये सलमान खान, गोविंदा, अक्षय कुमार, अमिताभ बच्चन, संजय दत्त अशा अनेक दिग्गजांसोबत काम केलं. मात्र, आजतागायत त्यांनी बॉलिवूडचा किंग खान अर्थात शाहरुख खानसोबत काम केलेलं नाही.
डेविड धवन आणि शाहरुख खान या दोघांनाही इंडस्ट्रीमध्ये काम करुन बरीच वर्ष झाली आहेत. परंतु, आजपर्यंत या दोघांनी कधीच एकत्र काम केलं नाही. अलिकडेच डेविड यांनी पिंकविलाला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी शाहरुखसोबत काम न करण्यामागचं कारण सांगितलं.
'तुम्ही शाहरुखसोबत सिनेमा का केला नाही?' असा प्रश्न डेविड यांना विचारण्यात आला. त्यावर, ''असं काही नाही. पण, एक काळ होता जेव्हा आम्ही दोघेही एकत्र काही तरी करायचा प्लॅन करत होतो. पण, मी तेव्हा कायमच बिझी असायचो. माझ्याकडे एकाच वेळी दोन-दोन सिनेमा असायचे. त्यामुळे आमचं एकत्र काम करणं राहून गेलं. पण, एक वेळ नक्कीच अशी येईल ज्यात आम्ही एकत्र काम करु', असं डेविड म्हणाले.
पुढे ते म्हणतात, ''एका ठराविक कलाकारासोबतच मी काम करेन असं मी कधीच केलं नाही. मी गोविंदा, सलमान, संजय दत्त यांसारख्या अनेक कलाकारांसोबत काम केलं. पण, असं काही झालं की मला शाहरुख सोबत काम करायची संधीच मिळाली नाही.''
दरम्यान, डेविड धवन यांनी त्यांच्या ३७ वर्षाच्या कारकिर्दीमध्ये अनेक सुपरहिट सिनेमा बॉलिवूडला दिले. यात बड़े मियां छोटे मियां, पार्टनर, राजा बाबू, कुली नंबर 1, जुड़वा, हीरो नंबर 1 आणि मुझसे शादी करोगी यांसारख्या सिनेमांचा समावेश आहे. लवकरच त्यांचा है जवानी तो इश्क होना है हा सिनेमा रिलीज होणार आहे. हा सिनेमा प्रथम ४ जून रोजी रिलीज होणार होता. मात्र, आता तो २२ मे रोजी रिलीज होणार असल्याचं म्हटलं जात आहे.