आर्थिक महासत्तेच्या प्रवासात महिलांची भूमिका महत्त्वाची
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2016 06:50 IST2016-03-06T13:50:47+5:302016-03-06T06:50:47+5:30
स्त्रिया बोलू लागल्या. बदलत्या सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक परिस्थितीनुसार काही प्रश्नांचे स्वरूप बदलत गेले तशा स्त्री संघटनांच्या मागण्याही बदलत गेल्या.

आर्थिक महासत्तेच्या प्रवासात महिलांची भूमिका महत्त्वाची
अमेरिकेत महिलांना पुरुषांप्रमाणे मतदानाचा अधिकार मिळावा यासाठी सुरू झालेली चळवळ हे महिलांचे जागतिक स्तरावरील पहिले सामूहिक आंदोलन होते. हा क्रम निरंतर सुरू राहिला. 1910 साली कोपनहेगन येथे भरलेल्या दुसºया आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषदेत, 8 मार्च 1908 रोजी अमेरिकेतील स्त्री-कामगारांनी केलेल्या ऐतिहासिक कामगिरीच्या स्मरणार्थ, 8 मार्च हा ‘जागतिक महिला-दिन’ म्हणून स्वीकारावा असा ठराव मांडण्यात आला.
यानंतर युरोप, अमेरिका वगैरे देशात सार्वत्रिक मतदानाच्या हक्कासाठी मोहिमा उघडल्या गेल्या. त्यांचा परिणाम म्हणून 1918 साली इंग्लंडमध्ये व 1919 साली अमेरिकेत या मागण्यांना यश मिळाले. अशा रितीने महिला दिवसाला सुरुवात झाली. भारतात 1943 साली पहिल्यांदा महिला दिवस साजरा करण्यात आला. 1957 हे वर्ष युनोने जागतिक महिला वर्ष म्हणून साजरे केले. त्यानंतर स्त्रियांच्या समस्या ठळकपणे समाजासमोर येत गेल्या. स्त्रियांच्या संघटनांना बळकटी आली.
स्त्रिया बोलू लागल्या. बदलत्या सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक परिस्थितीनुसार काही प्रश्नांचे स्वरूप बदलत गेले तशा स्त्री संघटनांच्या मागण्याही बदलत गेल्या. आता बँका, कार्यालये तसेच अनेक घरांमध्येही महिला दिन साजरा होतो आहे. या निमित्ताने सीएनएक्सने भारताच्या भविष्यातील आर्थिक महासत्तेच्या दिशेने होणाºया प्रवासात महिलांची भूमिका कशी राहील, याचा आढावा घेतला. यावेळी शहराच्या विविध क्षेत्रातील मान्यवर महिलांनी आर्थिक महासत्तेच्या दिशेने होणारा हा प्रवास महिलांच्या सहकार्याशिवाय होणे शक्य नसल्याचे आवर्जुन नमूद केले.
महिला दिनाचा कार्यक्रमातून यशस्वी महिलांचा सत्कार केला जातो. अनेक वंचित व प्रतिभाशाली स्त्रियांना यातून प्रेरणा मिळावी असा उद्देश असेल तर तो करणे योग्यच आहे. 21 व्या शतकाकडे वाटचाल करताना स्त्रियांच्या परिस्थितीत मोठा बदल झाला आहे. आजची स्त्री उच्चविभूषित आहे. तिला आपल्या हक्काची जाणीव आहे.
ती अंतराळात पोहचली आहे. संशोधक, डॉक्टर, इंजिनीयर, साहित्य, कला, बँकिंग ते राजकारण या सर्वच क्षेत्रात ती मोठी झेप घेत आहे. संवादाच्या साधनांमुळे जग ‘ग्लोबल’ झाले. प्रगतीची नवी कवाडे उघडी झाली. देशाचा विक ास झपाट्याने सुरू आहे. यात महिलांचा वाटा निश्चितच फार मोठा आहे.