Fact Check: 'जाधवांच्या पराभवाची कारणं' हे क्रिएटिव्ह 'लोकमत'चं नाही; नाव आणि लोगो वापरून दिशाभूल
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2024 18:12 IST2024-04-24T18:10:53+5:302024-04-24T18:12:03+5:30
'जाधवांच्या पराभवाची कारणं' या मथळ्याचं एक क्रिएटिव्ह बुलढाणा मतदारसंघात शेअर होतंय. त्यावर 'लोकमत'चं नाव आणि लोगो वापरण्यात आला आहे. मात्र, अशा प्रकारचं कुठलंही क्रिएटिव्ह 'लोकमत'ने तयार केलेलं नाही.

Fact Check: 'जाधवांच्या पराभवाची कारणं' हे क्रिएटिव्ह 'लोकमत'चं नाही; नाव आणि लोगो वापरून दिशाभूल
लोकसभा निवडणुकीचा प्रचार जोरात सुरू आहे. दुसऱ्या टप्प्याचं मतदान २६ एप्रिलला आहे. या टप्प्यात महाराष्ट्रातील बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशिम, हिंगोली, नांदेड आणि परभणी या आठ मतदारसंघाचा समावेश आहे. शेवटच्या काही तासांमध्ये अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी कार्यकर्त्यांनी कंबर कसली आहे. सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातोय. अशातच, 'जाधवांच्या पराभवाची कारणं' या मथळ्याचं एक क्रिएटिव्ह बुलढाणा मतदारसंघात शेअर होतंय. त्यावर 'लोकमत'चं नाव आणि लोगो वापरण्यात आला आहे. मात्र, अशा प्रकारचं कुठलंही क्रिएटिव्ह 'लोकमत'ने तयार केलेलं नाही. उलट, ही बाब निदर्शनास येताच आम्ही त्याची गंभीर दखल घेतली असून, या खोडसाळपणाची तक्रार 'सायबर क्राइम' शाखेकडे करण्यात येणार आहे.
बुलढाणा मतदारसंघात महायुतीकडून शिवसेना - शिंदे गटाचे प्रतापराव जाधव रिंगणात उतरले आहेत. विजयाचा चौकार ठोकून इतिहास रचण्याचा त्यांचा इरादा आहे. तर, ठाकरे गटाने नरेंद्र खेडेकर यांना उमेदवारी दिली आहे. शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरल्यानं ही लढत तिरंगी झाली आहे. प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात सगळेच एकमेकांवर कुरघोडीचा प्रयत्न करत असताना, जाधव यांच्या विरोधातील एक क्रिएटिव्ह काही व्हॉट्सअप ग्रूपवर फिरवण्यात येतंय. 'जाधवांच्या पराभवाची कारणं' असं त्याचं शीर्षक असून त्यावर दहा मुद्दे आणि जाधवांचा फोटो आहे. धक्कादायक बाब म्हणजे, त्यावर 'लोकमत डॉट कॉम' आणि 'लोकमत सुपर व्होट'चा लोगो वापरण्यात आला आहे. हे क्रिएटिव्ह 'लोकमत'ने केल्याचं भासवून वाचकांची, मतदारांची दिशाभूल करण्याचा हा प्रकार आहे.
वास्तवात लोकमतने असं कोणतंही क्रिएटिव्ह बनवलेलं नाही. केवळ लोकमतच्या क्रिएटिव्हशी मिळतंजुळतं टेम्पलेट वापरून काही कार्यकर्त्यांनी हा खोडसाळपणा केला आहे. अशा कुठल्याही खोट्या प्रचाराला बळी न पडता, विश्वासार्ह माहितीसाठी 'लोकमत'च्या अधिकृत फेसबुक, ट्विटर आणि इन्स्टाग्राम अकाउंटला फॉलो करावं, असं आवाहन या निमित्ताने आम्ही आमच्या वाचकांना करतो.