Created By: आजतक Translated By: ऑनलाईन लोकमत
छत्रपती संभाजी महाराजांचं शौर्य आणि मुघल शासक औरंगजेबाची क्रूरता दाखवणाऱ्या 'छावा' चित्रपटावरून सुरुवातीला काही वाद झाले. मात्र हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट झाला. तर काही लोकांनी त्याला विरोधही केला आहे. बरेलवी समाजाचे मौलाना शहाबुद्दीन रझवी यांनी 'छावा'वर बंदी घालण्याची मागणी केली आहे. हा चित्रपट जातीय तणाव वाढवत आहे आणि नागपूरमधील हिंसाचारासाठी जबाबदार आहे असं त्यांचं म्हणणं आहे.
आता याच दरम्यान सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये असा दावा केला जात आहे की, मुस्लिम समुदायाने 'छावा' चित्रपटाच्या प्रदर्शनाला विरोध करून फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये हिंसाचार घडवून आणला.
व्हिडिओमध्ये, काळ्या रंगाच्या कपड्यात काही लोक रस्त्यावर उभ्या असलेल्या पोलिसांच्या वाहनावर हल्ला करताना दिसत आहेत. व्हिडीओ शेअर करताना, युजर्सने कॅप्शनमध्ये “फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्येही 'छावा' चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर काल रात्रीपासून मुस्लिम हिंसाचार करत आहेत” असं म्हटलं आहे.
अनेक लोकांनी फेसबुक आणि एक्स वर या दाव्यासह व्हिडीओ शेअर केला आहे. व्हायरल पोस्टचं अर्काइव्ह व्हर्जन येथे पाहता येईल. पण आज तक फॅक्ट चेकमध्ये असं आढळून आलं की, हा व्हिडीओ फ्रान्सचा आहे पण २०२१ चा आहे. त्याचा 'छावा' चित्रपटाशी काहीही संबंध नाही.
कसं शोधलं सत्य?
व्हिडिओच्या कीफ्रेम्स रिव्हर्स सर्चल्यावर, आम्हाला तो जानेवारी २०२१ मधील एक एक्स-पोस्ट सापडली. येथे स्पष्ट झालं की. हा व्हिडीओ जुना आहे आणि छावा चित्रपटाच्या प्रदर्शनाशी याचा संबंध नाही. हे ट्विट फ्रेंच मीडिया संघटना 'Actu17' कडून आहे. पॅरिसच्या पॅन्टीन भागात काही लोकांनी पोलिसांवर हल्ला केल्याचं वृत्त आहे.
कीवर्ड्सच्या मदतीने सर्च केल्यावर आम्हाला याबद्दल फ्रेंच भाषेत प्रकाशित झालेल्या अनेक बातम्या आढळल्या. पोलिसांवर हा हल्ला २४ जानेवारी २०२१ रोजी झाल्याचं सांगण्यात आलं आहे. वृत्तानुसार, पोलिसांवर हा हल्ला एका वाहनाची तपासणी करत असताना झाला. हल्लेखोर या भागात एक रॅप व्हिडीओ शूट करत होते.
जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना अश्रूधुराचा वापर करावा लागला, असं वृत्तात म्हटलं आहे. या प्रकरणात पोलिसांनी चार जणांना अटक केली होती. अशाप्रकारे, येथे हे स्पष्ट होतं की फ्रान्समधील चार वर्षांहून अधिक जुना व्हिडीओ खोट्या दाव्यासह शेअर केला जात आहे.
'छावा' १४ फेब्रुवारी रोजी भारतासह इतर अनेक देशांमध्ये प्रदर्शित झाला. सिनेमा वेबसाइट आयएमडीबीनुसार, छावा हा चित्रपट १४ फेब्रुवारी रोजी फ्रान्समध्येही प्रदर्शित झाला होता. परंतु फ्रान्समध्ये 'छावा'च्या प्रदर्शनादरम्यान झालेल्या हिंसाचाराचा उल्लेख करणारी कोणतीही विश्वसनीय बातमी आम्हाला आढळली नाही.
(सदर फॅक्ट चेक आजतक या वेबसाइटने प्रसिद्ध केलं आहे. 'शक्ती कलेक्टिव्ह'चा भाग म्हणून 'लोकमत डॉट कॉम'ने त्याचा अनुवाद केला आहे.)