नवी दिल्ली - गेल्या काही वर्षांमध्ये घटत जाणारे वनक्षेत्र ही पर्यावरणाच्या दृष्टीने चिंतेची बाब ठरलेली आहे. मात्र भारतासाठी या आघाडीवर चांगली बातमी आली असून, गेल्या चार वर्षांमध्ये देशातील वनक्षेत्रामध्ये सुमारे 13 हजार चौरस किमी एवढी वाढ झाल्याचे एका अहवालामधून समोर आले आहे. भारतातीलजंगलांच्या स्थितीवर प्रसिद्ध करण्यात आलेल्या ''इंडिया स्टेट ऑफ फॉरेस्ट रिपोर्ट 2019'' मध्ये याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे. या अहवालानुसार जगात ज्या देशांमध्ये गेल्या काही काळात वनक्षेत्राममध्ये वाढ झाली आहे, अशा देशांमध्ये भारताचाही समावेश आहे. दिल्लीसारख्या शहरी परिसरातही वनक्षेत्र वाढले असून, सागरी क्षेत्रामध्येही वनांचा विस्तार झाला आहे. भारतात 2017 च्या तुलनेत 5 हजार 199 चौरस किमी परिसरात जंगल आणि वृक्षांचा विस्तार वाढला आहे. त्यामध्ये सुमारे 9 हजार 976 चौकिमी क्षेत्रात वनाच्छादन वाढले आहे. तर 1212 चौकिमी क्षेत्रात वृक्षांचा विस्तार झाला आहे. यासंदर्भातील अहवाल दर दोन वर्षांनी प्रसिद्ध होत असतो. या अहवालानुसार देशातील एकूण सात लाख 12 हजार 249 चौकिमी एवढा भूभाग वनाच्छादित आहे. ही आकडेवारी देशाच्या एकूण क्षेत्रफळाच्या 21.67 टक्के एवढे आहे. पूर्वोत्तर भागातील पाच राज्यांमध्ये वनक्षेत्र घटले आहे. येथे आधीच्या काळात बऱ्यापैकी घनदाट जंगले होती. पूर्वोत्तर भारतातील वनक्षेत्रात 765 चौकिमी एवढी घट झाली आहे. याबाबत असे सांगण्यात आले की येथो अजूनही 70 ते 80 टक्के एवढे वनक्षेत्र कायम आहे. विशेष बाब म्हणजे प्रदूषणाचा सामना करत असलेल्या राजधानी दिल्लीमध्येही वनक्षेत्र विस्तारले आहे. यापूर्वी दिल्लीतील वनक्षेत्र हे 305.41 चौकिमी होते. त्यात आता वाढ होऊन ते 324.44 चौकिमी एवढे झाले आहे. दक्षिण दिल्ली परिसरात विशेष करून वनक्षेत्राची वाढ झाली आहे.
Good News : गेल्या चार वर्षांत विस्तारले देशातील वृक्ष आणि वनक्षेत्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2019 14:05 IST