"नेचर" चा "गेम": मानवाच्या अस्तित्वापुढे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2020 11:26 PM2020-03-31T23:26:16+5:302020-04-01T00:41:46+5:30

आजच्या विदारक परिस्थितीमागे निसर्गाचा ऱ्हास असल्याचे सांगतांना प्रसिद्ध कवी गुलजार म्हणतात "ये शहरो का सन्नाटा बता रहा है,  इंसानो ने कुदरत को नाराज बहुत किया है!"

The "Game" of "Nature": The Challenge of Man's Existence | "नेचर" चा "गेम": मानवाच्या अस्तित्वापुढे आव्हान

"नेचर" चा "गेम": मानवाच्या अस्तित्वापुढे आव्हान

ir="ltr">-किशोर रिठे

सन १९९० च्या दशकात विद्यार्थ्यांना निसर्गातील गवत, वनस्पती, कीटक, प्राणी व पक्षी या प्रत्येक घटकाचे महत्व समजावून सांगताना आम्ही एक "नेचर गेम" खेळायचो! यामध्ये सूर्यापासून उर्जा घेणारे हे सर्व घटक निसर्गसाखळी मध्ये एकमेकांवर कसे अवलंबून आहेत हे त्यांना पटवून द्यायचो! निसर्गसाखळी घट्ट असली की त्यावर अवलंबून असणारे प्राणी, पक्षी, माणूस हे सर्व सुखाने नांदतात. पण माणसाच्या हव्यासामुळे घट्ट असणाऱ्या निसर्ग साखळीवर हळूहळू दबाव वाढला की मग यातील काही घटकांना याचा फटका बसतो. निसर्ग साखळीतील या घटकांची एक-एक कडी सैल झाली की प्रत्येक घटकाच्या जगण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होतो. मग या खिळखिळ्या निसर्ग साखळीस पुन्हा जाग्यावर आणणे कठीण जाते हा संदेश देणारा तो "नेचर गेम" होता. पुढे हा विचार रुजलेल्या विद्यार्थ्यांना, माणूस या निसर्गाचा कसा "गेम" करतोय हे आम्ही निसर्गाच्या विविध समस्यांचे दाखले देवून पटवून सांगायचो. आज कोरोना विषाणूमुळे जगातील प्रत्येक माणसाच्या अस्तित्वापुढे जे आव्हान उभे केले आहे ते पाहून मला या "नेचर गेमची" आठवण येते. आजच्या विदारक परिस्थितीमागे निसर्गाचा ऱ्हास असल्याचे सांगतांना प्रसिद्ध कवी गुलजार म्हणतात "ये शहरो का सन्नाटा बता रहा है,  इंसानो ने कुदरत को नाराज बहुत किया है!" यापुढील काळात "निसर्गाचा गेम" केल्यामुळे माणूस या पृथ्वीवरून कसा वेगाने नष्ट होऊ शकतो हे विद्यार्थ्यांना पटवून देणे आता सोपे होणार आहे.

      पृथ्वीवर आजवर आलेल्या कोरोना सारख्या संसर्गजन्य रोगांचा इतिहास पाहणे खूप महत्वपूर्ण ठरेल. प्लेग किंवा "ब्लॅक डेथ" रोगाची सुरुवात गॉटफ्रिड या संशोधकाने १३ व्या शतकाच्या शेवटी किंवा १४ व्या शतकाच्या सुरुवातीला चीन मधील गोबी वाळवंटात झाल्याचे लिहिले आहे. तर विसाव्या शतकातील साथीच्या रोगांचा इतिहासकार स्टीकर लिहितो की प्लेगच्या साथीची लागण भारतात पहिल्यांदा १३३२ व दुसऱ्यांदा १३४४ साली झाली. या काळात जहाजांमधून होणाऱ्या मालवाहतुकीतून माश्या व उंदीर यांच्याद्वारे हा "काळा आजार" (ब्लॅक डेथ) नावाने पश्चिम युरोपात पोहोचला व त्याने युरोपच्या ३० ते ६० टक्के लोकसंख्या संपविली. तिसऱ्या टप्प्यात १८५५ साली प्लेग पुन्हा चीनच्या पश्चिम युन्नान मध्ये कॉपरच्या खाणीं सुरु झाल्याने तेथून तो चीनच्या शहरी भागात व पुढे हॉंगकॉंग मार्गे ब्रिटीश इंडियात आला. त्याने भारतातील मुख्यत्वे बंदरांच्या किनारी असणाऱ्या मुंबई, पुणे, कलकत्ता व कराची या शहरांमधील १० दशलक्ष लोकांसह एकूण १२ दशलक्ष लोकांचा जीव घेतला. पुढे १८९९ ते १९१० दरम्यान तो माश्या व उंदीर यांच्या मार्फत भारताच्या ग्रामीण भागात पसरला. अगदी अलीकडे १९९४ मध्ये गुजरात मधील सुरत शहरात त्याची पुन्हा लागण होवून ५६ बळी गेले.  

      यावरून चीन व साथीचे आजार यांचा फार पूर्वीपासून संबंध असल्याचे लक्षात येते. यावेळी कोरोनाच्या (COVID-१९) विषाणूची लागण पुन्हा चीन मधील वूहान या शहरातील एका मटन मार्केट नजीक (येथे वेट फूड मार्केट म्हणतात) राहणाऱ्या एका रुग्णास पहिल्यांदा झाली. त्यानंतर त्यापासून संसर्ग होऊन २७ रुग्ण बाधित झाले आणि मग याचा गाजावाजा झाला. पण चीनमध्ये हे काही पहिल्यांदा झाले नव्हते. नोव्हेंबर २००२ मध्येही दक्षिण चीन मध्ये "सार्स" या विषाणूची लागण होऊन नंतर त्याचा तब्बल २९ देशांमध्ये संसर्ग होवून जुलै २००३ पर्यंत ७७४ लोकांचा बळी गेला होता. तर सध्याच्या कोरोना विषाणूने आतापर्यंत जगातील ११९ देशांच्या  सीमा ओलांडून सुमारे ३३ हजाराच्या वर लोकांना यमसदनी धाडले आहे. हा लेख लिहित असतांनाच "हंता" नावाच्या विषाणूमुळे चीन मध्ये पुन्हा एक बळी नोंदविला आहे. त्यामुळे या सर्व विषाणूंचा उगम प्रामुख्याने चीन सारख्या देशांमध्येच प्रामुख्याने का असतो या प्रश्नाच्याही खोलवर जाणे आवश्यक आहे.

      सार्स या रोगाने २९ देशांमध्ये थैमान घातल्यावर विविध देशांच्या तज्ञांनी एकत्र येवून चीन मधील शेंझेन येथील जिवंत वन्यप्राण्यांना विक्रीसाठी ठेवलेल्या बाजारात नमुने गोळा केले होते. त्या संशोधनामध्ये हॉर्स शू प्रजातीच्या वटवाघूळामध्ये सार्सचे विषाणू आढळून आले होते. त्यातून त्यांचा संसर्ग उदमांजर (पाम सिवेट) तसेच बॅजर या वन्यप्राण्यांमध्ये व तेथून माणसांमध्ये झाल्याचे लक्षात आले (लीन फान वांग यांचा शोधनिबंध). कोरोनाचा  विषाणू उंटांमधून माणसामध्ये आल्याचा निष्कर्ष पहिल्यांदा समोर आला आणि आता तो खवल्या मांजरामधून आल्याचे एक शोध निबंध सांगतो. सन १९९६ मध्ये चीन मध्ये सर्व प्रथम बर्ड फ्लू (H5N१) हा विषाणू गीज पक्ष्यांमध्ये आढळून आला. नंतर तो कोंबड्यांमध्ये पसरला तर पुढच्याच वर्षी तो माणसांमध्ये सापडला. "बर्ड फ्लू" आजार मग चीनसह, बांगलादेश, इजिप्त, इंडोनेशिया, व्हिएतनाम व भारत येथेही पसरला.       

      सन १९७६ साली "इबोला" हा विषाणू (झैरे देशातील इबोला नदीचे नाव) आफ्रिकेतील प्रथम सुदान आणि दुसऱ्यांदा झैरे देशामध्ये आढळून आला. या दोन्ही वेळी त्याचा मूळ नैसर्गिक स्त्रोत कोणता हे कळले नाही. तिसऱ्यांदा तो सन १९८९ साली फिलिपिन्स देशात आयात केलेल्या काही संसर्ग झालेल्या माकडांमध्ये दिसून आला. आणि शेवटचे, तो एका मेलेल्या चिंपांझी माकडामध्ये आढळून आला. आफ्रिकेतीलच गेबन देशामध्ये पर्जन्यवनांमधील गावांमध्ये जानेवारी १९९६ मध्ये चीम्पाझीचे मांस खाल्यानंतर सुमारे ३७ लोक मृत्युमुखी पडले. त्यानंतर येथील मेयीबोस्ट येथील मटन मार्केट व या गावांचा अभ्यास केला असता चिंपांझी माकडा मधून एच. आय. व्ही. या विषाणूची लागण झाल्याचे सिद्ध झाले.

      फक्त चिन नव्हे तर जगात आफ्रिका, अमेरिकेसारख्या अनेक देशांमध्ये असे वन्यप्राण्यांचे बाजार भरतात. आफ्रिका व चीनमध्ये जवळपास सर्व वन्यप्राणी व पक्ष्यांचा खाण्यामध्ये सर्रास वापर होतो व त्यामुळे असे विषाणू येथे जास्त निर्माण होतात. पश्चिम व मध्य आफ्रिकेतील शहरांमधील बाजारांमध्ये माकड, वटवाघूळ, उंदीर, पक्षी, अनेक सस्तन प्राणी व कीटक यांची खाद्य म्हणून सर्रास विक्री होते. वन्यप्राण्यांचे हे मटन येथे "बुशमिट" म्हणून खुलेआमपणे विकल्या जाते व गरीब जनतेसाठी अन्नाचा प्रमुख स्त्रोत म्हणून त्यास येथे शासनमान्यता आहे. चीनमधील बाजारांमध्ये तर सरकारच्या प्रोत्साहनामुळे संपूर्ण जगातील बहुतांश वन्यप्राण्यांचे मांस विक्रीसाठी उपलब्ध असते. येथील लोक व सरकार सातत्याने याचे का समर्थन करीत आले याची पार्श्वभूमी पाहूया.

      सन १९८० च्या दशकामध्ये चीनमध्ये भयंकर दुष्काळ पडून ३६ दशलक्ष लोक मृत्युमुखी पडले होते. त्यामुळे चीन सरकारने खाद्यान्नामध्ये देशाला बळकट करण्यासाठी व गरिबांना मांसाहारापासून प्रोटीन मिळावे या हेतूने कोंबडी पालन, डुक्कर पालन यासारख्या खाजगी फार्मसला चालना दिली. मग काही लहान शेतकऱ्यांनी कासव, ससे इत्यादी वन्यप्राण्यांचीही पैदास करणारे फार्म उभे केले. यापुढे जाऊन चीन सरकारने १९८८ साली  "वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट" कायदा आणून वन्यप्राण्यांना चक्क "नैसर्गिक संसाधन" (नॅचरल रिसोर्स) म्हणून घोषित केल्याने चिनी जनता या वन्यप्राण्यांची पैदास करून "रिसोर्स" म्हणून वापरण्यास मोकळे झाले. यामुळे लहान शेतकऱ्यांच्या छोट्या फॉर्मचे वन्यप्राण्यांची कृत्रिम पैदास करणाऱ्या मोठ्या व्यावसायिक फार्ममध्ये रूपांतर झाले. कासव आणि ससा यांच्या फार्म सोबतच आता अस्वलांचे फॉर्म उभारल्या गेले. त्यातून मोठ-मोठे पशुबाजार, मटन मार्केट उभे झाल्याने त्याला आता उद्योगाचे स्वरूप आले. या सर्व गोष्टींमुळे वन्यप्राण्यांच्या आंतरराष्ट्रीय अवैध व्यापाराला चीन सरकारचे प्रोत्साहन मिळत गेले. भारतासह जगात असणारा प्रत्येक वन्यप्राणी अवैधरित्या चीनच्या बाजारपेठेत उपलब्ध होऊ लागला. लवकरच हा व्यापार चीनच्या अर्थव्यवस्थेचा कणा बनला. या गोष्टीचा सन २००० च्या दशकात उद्रेक झाला. सार्स नावाचा विषाणू चीनमध्ये पसरून त्याचे येथे चौदाशे रुग्ण आढळून आले. सन २००३ मध्ये या विषाणूची लागण वटवाघूळ मार्गे उदमांजरामधून झाल्याचे लक्षात आल्याने काही काळ अशा बाजारांवर बंदी आली. "फार्म मध्ये पैदास केलेले वन्यप्राणी खाण्यास सुरक्षित असतात" असे कारण देवून व्यापाऱ्यांनी यावेळी हे बाजार पुन्हा सुरु ठेवण्यास सरकारला बाध्य केले. सन २००४ मध्ये वन्यप्राण्यांचे फॉर्म व हा वन्यप्राणी मटन उद्योग तब्बल १०० अब्जच्या घरात पोहोचला. आता तर चीन सरकारने चक्क वाघ व खवल्या मांजर (पँगोलीन) यासारख्या वन्यप्राण्यांचीही पैदास करून त्यांचे मांस उपलब्ध करून देण्यास परवानगी दिली. त्यामुळे चीनच्या एकूण अर्थव्यवस्थेत वन्यप्राण्यांचे बाजार व मटन उद्योग याचा विक्रमी हिस्सा नोंदविला गेला. चिनी जनतेला वन्यप्राण्यांचे मांस हे निरोगी आरोग्यासाठी, अधिक शक्तिशाली बनण्यासाठी व रोगांचा प्रतिकार करण्यासाठी आपल्या ताटात आवश्यक वाटू लागले. चीनमधील प्राण्यांच्या व्यापाराचा अभ्यास असणारे प्रा. पिटर ली यांच्या मते येथील उच्चभ्रू वर्ग याचा अधिक वापर करतो. त्यातूनच असे संसर्गजन्य/ साथीचे रोग चीनमध्ये निर्माण होवून जगातील अनेक देशांमध्ये सातत्याने पसरू लागले आहे. कोरोना विषाणूने हाहाकार माजविला असताना चीन सरकारने आता हा उद्योग त्वरित बंद केला आहे. परंतु तो कायमचा बंद राहीलच याची अजूनही खात्री देता येणार नाही.

      प्रा. पीटर ली यांच्या मते अशा प्राण्यांचे मांस व रक्त यांचा खाण्यामध्ये वापर होत असल्याने त्यांना शिजविण्यापुर्वीच हे विषाणू एका प्राण्यामधून दुसऱ्या प्राण्यांमध्ये व माणसांमध्ये प्रवेश करतात. त्यामुळे अशा प्रकारचे वन्यप्राण्यांचे फार्म/कत्तलखाने/बाजार हे अशा संसर्गाचे उगमस्थान बनते. प्रसिद्ध प्रायमेटोलॉजिस्ट जेन गुडाल यांच्यासोबत संशोधन केलेल्या इमोरी विद्यापीठातील पर्यावरण शास्त्र विभागाचे प्रमुख थॉमस गेलीप्स त्यांच्या मते "अश्या विषाणूंना वन्यप्राण्यांच्या प्रजातींसारख्या सीमा नसतात. शहरांमध्ये थाटलेले हे बाजार या विषाणूंचा व साथीच्या रोगांचा जगभर प्रसार करणारी ठिकाणे बनतात".  

      सन २००८ साली एक संशोधक जोन्स त्यांच्या चमूने सन १९६० ते २००४ या दरम्यान विषाणूंच्या अश्या संसर्गामुळे झालेल्या सर्व रोगांचा एकत्रित अभ्यास केला. त्यामध्ये अश्या विषाणूंमुळे याकाळात तब्बल ३३५ संसर्गजन्य रोग निर्माण झाल्याचे लक्षात आले. त्यापैकी ६० टक्के आजारातील विषाणू हे वन्यप्राण्यांमधून आल्याचे लक्षात आले. वन्यप्राण्यांमधील काही विशिष्ट प्रजाती या अश्या विषाणूंचे पालक (होस्ट) असतात. परंतु अश्या वन्यजीव अरण्यांमध्ये मानवी हस्तक्षेप वाढून जंगल कटाई, खाणकाम, रस्ते निर्मिती, झपाट्याने होणारे शहरीकरण अश्या गोष्टींमुळे येथील वन्यप्राणी माणसांच्या सानिध्यात अधिक येतात. काही देशांमध्ये त्यांची शिकार होवून ते जिवंत व मेलेल्या स्वरुपात विक्रीसाठी उपलब्ध होतात. जोन्सच्या मते माणूस व वन्यजीव यांच्यामध्ये वाढलेला हा संपर्क या रोगांच्या प्रसारास कारणीभूत आहे. या सर्व संशोधानांवरून एक गोष्ट अधोरेखित होते ती म्हणजे "वन्यप्राणी आपले मित्र आहेत, खाद्य नाही." भारतासारख्या देशांमध्ये त्यांना मित्र मानून त्यांचे संवर्धन केल्या जाते तर आफ्रिका व चीन सारख्या देशात त्यांचा खाद्य म्हणून वापर होतो.

    आफ्रिका व चीनमध्ये असे एकापाठोपाठ विषाणू निर्माण होत असले तरी त्यांचा संसर्ग इतर देशांमध्ये इतक्या झपाट्याने का होतो याचे उत्तरही शोधणे गरजेचे आहे. पृथ्वीवरील जैवविविधतेने संपन्न अभयारण्ये, राष्ट्रीय उद्याने, नैसर्गिक रिझर्व यासारख्या जैविक परिसंस्थांना  खरे तर अशा विषाणूंचा प्रादुर्भाव कमी करणे तसेच नैसर्गिक आपत्तीचा धोका कमी करणाऱ्या व्यवस्था असे म्हटले जाते. मानवी आरोग्य, पाळीव प्राण्यांचे व वन्यजीवांचे आरोग्य हे या जैविक परीसंस्थांच्या सुदृढतेवर अवलंबून आहे अशी "वन हेल्थ" संकल्पना अमेरिकेतील अनेक विद्यापीठांमध्ये आज अभ्यासल्या जातेय. परंतु या महत्वपूर्ण जैविक परिसंस्थांची परिस्थिती जगभर अत्यंत दयनीय आहे. चीन प्रमाणेच बहुतांश पाश्चिमात्य देशांनीही तेथील वने, वन्यजीव व जैविक विविधता सांभाळणाऱ्या या जैविक परीसंस्थांना (निसर्गाला) विकासाच्या गोंडस नावाखाली छळले आहे. हवामान बदल हा त्याचाच परिपाक आहे. थॉमस गेलीप्सच्या मते "बहुतांश भूप्रदेशांमध्ये माणसाच्या विकासाच्या कल्पनांमुळे वन्यप्राणी अधिवास नष्ट झालेत, मानवी वस्त्या वन्यजीव अधिवासांच्या अति जवळ गेल्या व माणूस वन्यप्राण्यांच्या जास्त संपर्कात आला. काही देशांमध्ये हे वन्यप्राणी खाद्य म्हणून थेट माणसाच्या जेवणाच्या टेबलवर पोहोचलेत. जवळपास सर्वच देशांनी निसर्गाचा पुरता "गेम" केलाय व त्यामुळे आज ही भयावह परिस्थिती उभी झाली आहे. पाश्चिमात्य देशांच्या विकासाच्या कल्पना आणि संस्कृती यामुळे निसर्ग साखळी कमकुवत होवून तेथील जैविक परिसंस्थांची अश्या विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्याची क्षमता क्षीण झाली काय हे तपासणेही आता गरजेचे झाले आहे.

     प्रसिद्ध लेखक पाउलो कोएलो माणसाच्या स्वार्थी प्रवृत्तीबद्दल म्हणतो 'पृथ्वीला वाचवा' अशी हाक देणे खरे तर उद्धटपणाचे होईल कारण पृथ्वी ही माणसाच्या उत्पत्तीपुर्वीही अस्तित्वात होती आणि माणसाने तिचा अनादर करणे असेच सुरु ठेवले तर ती लवकरच त्यास हद्दपार करेल!". आज कोरोना विषाणूमुळे संपूर्ण जगात २५ हजारच्या वर लोकांचा बळी गेला व अजूनही हे मृत्युचक्र थांबलेले नाही. यावरून पृथ्वीवरील मानवजात नष्ट करण्यास आफ्रिकेतील गरीबांसाठीचे "बुश मिटचे" (वन्यप्राणी मटणाचे) खुले बाजार तसेच चीनमधील उच्चभ्रूंसाठीचे "वेट मार्केट" (वन्यप्राणी मटण मार्केट) व विकासाच्या नावावर निसर्गाला आव्हान देणारी आमची मानसिकता पुरेसी आहे. असे असेल तर संपूर्ण जगाला संपविण्याचे अधिकार आफ्रिका व चीनसारख्या देशांना व तेथील जनतेला आहे काय याचा विचार करावा लागेल. थॉमस गेलीप्सच्या मते आपणास फारच थोडे विषाणू ज्ञात आहेत. तर लिव्हरपूल विद्यापीठातील "प्रादुर्भाव होणारे पशुआजार" विभागाचे प्रमुख एरिक फेरी यांच्या मते याहीपेक्षा भयंकर विषाणू येणाऱ्या काळात पृथ्वीवर हौदोस घालणार आहेत. यापुढे वारंवार उद्भवणाऱ्या अश्या परिस्थितीवर कायमस्वरूपी उपाय योजण्यासाठी आता जगातील सर्वच देशांना अफिका, चीन सारख्या देशांवर कडक निर्बंध, बंधने लावण्याची गरज निर्माण झाली आहे. असे झाल्यास भविष्यात अशा विषाणूंपासून होणारे संभाव्य दुष्परिणाम टाळता येऊ शकतील.

(लेखक सातपुडा  फाउंडेशन या मध्यभारतातील अग्रगण्य संस्थेचे संस्थापक असून भारत सरकारच्या केंद्रीय वन्यजीव मंडळाचे माजी सदस्य आहे

Web Title: The "Game" of "Nature": The Challenge of Man's Existence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.