निसर्ग ओरबडून खाल्ल्याने वारंवारचा कोरडा आणि ओला दुष्काळ नेतोय वाळवंटाकडे

By गजानन दिवाण | Published: September 15, 2019 08:01 AM2019-09-15T08:01:06+5:302019-09-15T08:05:01+5:30

निसर्ग ओरबडून खाल्ला, तर हे असे होणारच !

Drought and floods leads towards desert; If nature screams, it will be like this! | निसर्ग ओरबडून खाल्ल्याने वारंवारचा कोरडा आणि ओला दुष्काळ नेतोय वाळवंटाकडे

निसर्ग ओरबडून खाल्ल्याने वारंवारचा कोरडा आणि ओला दुष्काळ नेतोय वाळवंटाकडे

googlenewsNext
ठळक मुद्देपाण्याचे बजेट निर्माण करायला हवे. जे मला लागते तेच आधी पिकवायला हवे.

- गजानन दिवाण 

महाराष्ट्रात कोल्हापूर, सांगलीकर पूराशी तोंड देत असताना मराठवाडा मात्र दुष्काळाशी लढा देत होता. जमिनीतील पाण्याचा वारेमाप वापर, पावसाच्या पाण्याचे शून्य नियोजन, विविध कारणांनी बिघडलेला जमिनीचा पोत आणि वातावरणातील बदलामुळे हे असे वारंवार होणारच, असा इशारा ‘सेंटर फॉर सायन्स अ‍ॅण्ड एन्व्हायर्नमेंट’च्या महासंचालक आणि ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ सुनीता नारायण यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिला. 

प्रश्न : आपण वाळवंटीकरणाच्या दिशेने जातोय. म्हणजे नक्की काय? 
उत्तर : वाळवंट म्हणजे रेगीस्तान हे सर्वात आधी डोक्यातून काढायला हवे. वाळवंटीकरणाला एका शब्दांत पकडता येत नाही. जमिनीचा बिघडत चाललेला पोत, पावसाच्या-जमिीनतील पाण्याचे शून्य नियोजन आणि वातावरणातील बदल याचा परिणाम म्हणजे वाळवंटीकरण. एकतर पाऊस पडत नाही. पडलाच तर दोन-चार दिवसांत महिनाभराचा कोसळतो. पडलेला हा पाऊस जमीन धरून ठेवत नाही. खतांचा, कीटकनाशकांचा मारा केल्याशिवाय कुठलेच पीक येत नाही. हा सारा प्रवास वाळवंटीकरणाकडेच नेणारा आहे. भारतातील जवळपास ७० टक्के लोकसंख्या शेतीवर वा शेतीशी निगडीत उद्योगांवर अवलंबून आहे. त्यामुळे या वाळवंटीकरणाचा फटका या ७० टक्के लोकांना बसत आहे. रियो कॉन्फरन्सनंतर जगाभरात यावर चिंता व्यक्त केली गेली. वातावरणातील बदल हा चिंतेचा विषय नसून निसर्गाची कुठलीही किंमत मोजून केला जाणारा विकास हा चिंतेचा विषय आहे. हा जेवढा स्थानिक तेवढचा जागतिक पातळीवरचा विषय आहे. जमीन आणि पाण्याचे शून्य नियोजन हेच याला कारणीभूत आहे. सोबत वातावरण बदलाचा परिणामदेखील आहे. 

प्रश्न : वाळवंटीकरणाचे कारण काय? 
उत्तर : अफ्रिकन देश असो वा भारत जमिनीचा आणि पाण्याचा अमर्याद वापर, हेच वाळवंटीकरणाला कारणीभूत आहे. पंजाबमध्ये पाण्याची कमतरता भासत असताना आम्ही तांदळाचे उत्पादन वाढवत आहोत. या पिकाला प्रचंड पाणी लागते. अशा स्थितीत हे पीक घेणे बरोबर आहे का? केरळात तांदूळ घ्यायलाच हवा. अशा पिकांसाठी तेच योग्य ठिकाण आहे. कारण तिथे भरपूर पाणी उपलब्ध आहे. आपल्याकडे जमीन-पाण्याच्या नियोजनाचाच अभाव आहे. जमिनीतील पाणी ओरबडून आणि रासायनिक खते, कीटकनाशकांचा अमर्याद वापर करून आम्ही जमिनीचा पोत बिघडवून टाकला आहे. इथे वातावरण बदल येतो कुठे? असे निर्णय घेऊन वाळवंट आपण स्वत: जवळ करीत आहोत. 

प्रश्न : महाराष्ट्राचे काय चुकले? 
उत्तर : महाराष्ट्रात कोल्हापूर, सांगलीला पूराचा तडाखा बसला. त्याचवेळी मराठवाडा आणि विदर्भात काही भाग दुष्काळाशी तोंड देत होता. वातावरणातील बदलामुळे हे असे होणारच आहे. पण, केवळ तेवढच कारण नाही. पावसाच्या पाण्याचे नियोजन आम्ही अजिबात शिकलो नाही. भूगर्भात असलेल्या पाण्याबाबत तर बोलायलाच नको. जमिनीची अक्षरश: चाळणी करून टाकली. नंतर त्याचे पूनर्भरणही होत नाही. जास्तीचे उत्पादन घेण्याच्या हव्यासातून पीकपद्धत बदलली. कीटकनाशके, खतांनी जमिनीचा पोत बिघडवून टाकला. हे सारे थांबायला हवे. 

प्रश्न : पीकपद्धतीचा दुष्परिणाम कसा?
प्रश्न : मराठवाड्याचेच पाहा. आधी घेतले जाणारे कुठले पीक आता घेतले जाते? वेगवेगळ्या आमिषाला बळी पडून मराठवाडा उसाच्या मागे कधी लागला हे कोणालाच कळले नाही. १५-१५ दिवस नळाला पाणी न येणाऱ्या मराठवाड्याला हे पीक कसे परवडेल? 

प्रश्न : या अडचणींवर उत्तर काय?
प्रश्न : प्रश्न सर्वांनाच समजले आहेत. उत्तर शोधण्याचे काम सुरू आहे. जलपूनर्भरण करायला हवे. जमिनीचा आणि पाण्याचा अमर्याद वापर थांबायला हवा, हे सर्वांनाच ठाऊक आहे. ७० टक्के लोक शेतीवर अवलंबून असताना हे लगेच शक्य आहे का? रासायनिक खते-कीटकानाशकांचा वापर सर्वत्र लगेच थांबविणे शक्य आहे का? त्यामुळे सर्वच पातळीवर सरकारचा विचार सुरू आहे. वातावरणातील बदलावर ठराविक उत्तर जगात कोणालाच सापडलेले नाही. त्यामुळे केवळ आपल्याच सरकारला दोष देऊन चालणार नाही. बदल होतो आहे. पण त्याला वेळ लागेल. 

पाण्याचे नियोजन हवे
महाराष्ट्र असो वा अन्य कुठले राज्य? आपल्या क्षेत्रात पाऊस किती पडतो? जमिनीत पाणी किती? यानुसार पिकांचे नियोजन करायला हवे. पडलेला प्रत्येक थेंब कसा वाचविता आणि वापरता येईल, हे पाहायला हवे. त्यासोबतच जलपूनर्भरणदेखील आवश्यक आहे. पाण्याचे बजेट निर्माण करायला हवे. मराठवाड्यात काहीठिकाणी ते केलेही जात आहे. त्यात त्यांना चांगले यश आले आहे. हे सर्वांनीच करायला हवे. 

शेतकऱ्यांना पैसा नको का? 
उसासारख्या न परवडणाऱ्या पिकातून आम्ही पैसा कमवित नाही, तर नैसर्गिक संपत्तीचे नुकसान करतो आहोत. एवढ्याच पाण्यात पुरेसे पैसे मिळतील, अशी अनेक पिके आहेत. ती आपण घ्यायला हवीत. विकण्यासाठी पिकवून स्वत: खाण्यासाठी विकत घेतल्यापेक्षा जे मला लागते तेच आधी पिकवायला हवे. आधी आम्ही तेच करीत होतो. म्हणून महागाईचा फारसा फटका शेतकऱ्याला बसत नव्हता. आता नोकरदारासोबत तोही भरडला जातो तो यामुळेच.

वातावरणातील बदल, पाण्याचा प्रचंड वापर, पावसाच्या पाण्याचे शून्य नियोजन आणि जमिनीचा  बिघडलेला पोत हेच वाळवंटाचे कारण. 
- सुनीता नारायण,ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ

Web Title: Drought and floods leads towards desert; If nature screams, it will be like this!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.